डायबिटीस: कारल्याचा, भोपळ्याचा ज्यूस पिऊन कंटाळलात? ५ चवदार भाज्या खा, शुगर राहील कंट्रोलमध्ये..
Updated:August 25, 2025 12:43 IST2025-08-25T12:37:18+5:302025-08-25T12:43:58+5:30

कित्येक मधुमेही असे असतात ज्यांची रक्तातली साखर नेहमीच वाढलेली असते. कारले, भोपळा, मेथी अशा त्याच त्या प्रकारच्या भाज्या खाऊन या लोकांना कंटाळाही आलेला असतो.
म्हणूनच आता थोड्या वेगळ्या प्रकारच्या चवदार भाज्या खाऊन पाहा. या भाज्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी नक्कीच मदत करतील. त्या भाज्या कोणत्या याविषयीची माहिती डॉक्टरांनी diabetesreversaldocto या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे.
त्यापैकी पहिली भाजी म्हणजे तोंडली. तोंडली मधुमेहींसाठी जणू काही इन्सुलिनप्रमाणे काम करतात. तोंडली तुम्ही कच्चीही खाऊ शकता किंवा मग फ्राय करूनही खाऊ शकता.
दुसरी भाजी आहे गवार. गवारमध्ये सोल्युबल फायबर जास्त प्रमाणात असतात. त्यामुळे पचनासाठी तर ती भाजी चांगली आहेच, पण जेवण झाल्यानंतर रक्तातली साखर वाढू नये, यासाठीही ती उपयोगी ठरते.
तिसरी भाजी आहे पडवळ. यात फ्लावोनाईड्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. म्हणूनच गौरी गणपतीच्या नैवेद्यात पडवळीच्या भजींच्या मान असावा.
शेवग्याच्या शेंगाही आठवड्यातून दोन ते तीन वेळा उकडून खायला हव्या. यामुळे शरीरातील ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होतो आणि इन्सुलिन सिक्रिशन वाढते.
पाचवी भाजी आहे दोडक्याची. दोडकं अनेकांना आवडत नाही. पण ते आवर्जून खा. दोडक्याची सालं काढून ती फेकू नका. ती थोडी फ्राय करा आणि त्यात तीळ आणि मीठ घालून त्याची चटणी करा. मधुमेहींसाठी, वेटलॉस करणाऱ्या मंडळींसाठी दोडके अतिशय उपयुक्त ठरते.