Join us
Daily Top 2 Weekly Top 5

उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2026 17:18 IST

1 / 12
उन्हाळ्यात सर्वात कठीण काम कोणतं असेल तर ते म्हणजे स्वयंपाक करणं. या कडाक्याच्या उन्हात कोणालाही किचनमध्ये जावंस वाटत नाही. उष्णतेपासून वाचण्यासाठी अनेक वेळा लोक बाहेरून जेवण मागवतात किंवा मॅगी, ब्रेड, सँडविच यांसारख्या गोष्टी खाऊन दिवस काढतात.
2 / 12
रोज बाहेरून जेवण मागवणं खिशाला परवडणारं नसतं. अशा वेळी तुमच्या किचनला थंड ठेवण्यासाठी काही खास उपाय करणं गरजेचं आहे. सोप्या टिप्स वापरून तुम्ही किचन थंड ठेवू शकता.
3 / 12
किचनमध्ये हवा खेळती राहणं खूप गरजेचं आहे. तेल, धूर आणि गॅसची उष्णता बाहेर जाण्यासाठी खिडकी उघडी ठेवा. शक्य असल्यास एक्झॉस्ट फॅन किंवा चिमणी नक्की सुरू ठेवा. एक्झॉस्ट फॅन गरम हवा बाहेर फेकतो, ज्यामुळे किचनचं तापमान कमी राहण्यास मदत होते.
4 / 12
बहुतेक वेळा दुपारचे जेवण १२ ते १ च्या दरम्यान बनवलं जाते, जेव्हा बाहेर प्रचंड ऊन असते. अशा वेळी किचनमध्ये उभं राहणं कठीण होतं. त्याऐवजी सकाळी १०-११ वाजेपर्यंत किचनमधील सर्व कामं उरकून घेण्याचा प्रयत्न करा.
5 / 12
उन्हाळ्यात जास्त वेळ गॅस सुरू राहील असे पदार्थ टाळा. हलका आणि लवकर पचणारा आहार आरोग्यासाठी उत्तम असतो. आहारात हंगामी भाज्या, फळं, कोशिंबीर आणि दह्याचा समावेश करा. जास्त तेल-मसाल्याचे पदार्थ खाणे टाळा.
6 / 12
किचनमध्ये गरजेपेक्षा जास्त सामान भरून ठेवल्याने अधिक उष्णता जाणवते. ज्या वस्तूंची गरज नाही त्या बाहेर काढा. किचन जेवढं स्वच्छ आणि मोकळं असेल, तितकी हवा खेळती राहील. गॅस आणि ओट्यावरील तेलकटपणा नियमित स्वच्छ करा, कारण चिकटपणामुळेही उष्णता वाढते.
7 / 12
खिडक्यांतून येणारे थेट ऊन रोखण्यासाठी पडदे किंवा रिफ्लेक्टिव्ह शीट्स लावा. यामुळे सूर्याची उष्णता थेट किचनमध्ये येणार नाही आणि वातावरण थंड राहील.
8 / 12
किचनमध्ये एका कोपऱ्यात थंड पाण्याची बादली भरून ठेवा. यामुळे आजूबाजूच्या तापमानात थोडा फरक पडतो. तुम्ही फरशीवर थोडं पाणी शिंपडू शकता, ज्यामुळे पायांना थंडावा मिळेल.
9 / 12
किचनमध्ये छोटी छोटी रोपं लावा. हिरवळ पाहिल्याने मानसिक शांतता मिळते आणि घरातील हवा ताजी राहण्यास मदत होते. यामुळे किचनमध्ये प्रसन्न वातावरण राहतं.
10 / 12
मायक्रोवेव्ह, ओव्हन किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणं गरज नसताना सुरू ठेवू नका, कारण त्यातून मोठ्या प्रमाणात उष्णता बाहेर पडते. खूप जास्त उष्णता असल्यास पोर्टेबल फॅनचा वापर करा.
11 / 12
जुने पिवळे बल्ब जास्त उष्णता निर्माण करतात. त्याऐवजी किचनमध्ये LED लाईट्स लावा. हे लाईट्स कमी उष्णता निर्माण करतात आणि प्रकाशही चांगला देतात.
12 / 12
स्वयंपाक करताना रेशमी किंवा सिंथेटिक कपडे टाळा. किचनमध्ये नेहमी सुती आणि सैल कपडे परिधान करा. सुती कपडे घाम शोषून घेतात आणि तुम्हाला आरामदायी वाटतं.
टॅग्स : किचन टिप्ससमर स्पेशल