किचनमधल्या 'या' वस्तू वर्षांनुवर्षे वापरल्यास होऊ शकतात गंभीर आजार! तुम्हीही ती चूक करता?
Updated:January 31, 2025 13:58 IST2025-01-31T13:46:16+5:302025-01-31T13:58:09+5:30

आपल्याकडची प्रत्येक वस्तू सांभाळून, जपून वापरायची ही सवय खरंच चांगली आहे. पण काही मोजक्या वस्तूंच्या बाबतीत मात्र तुमची हीच चांगली सवय अतिशय घातक ठरू शकते आणि त्याचा थेट तुमच्या आरोग्यावरच परिणाम होऊ शकतो.
म्हणूनच किचनमधल्या धोकादायक ठरू शकणाऱ्या काही वस्तू ठराविक कालावधीनंतर बदलायलाच पाहिजेत. त्या वस्तू नेमक्या कोणत्या ते पाहूया..
सगळ्यात पहिली वस्तू म्हणजे नॉनस्टिक भांडी. जेव्हा तुमच्या नॉनस्टिक भांड्यांवरचं काळं आवरण निघून जायला सुरुवात होईल, तेव्हापासून लगेचच त्या वस्तूंचा वापर थांबवा. कारण तो पदार्थ आपल्या पोटात जाणं अतिशय घातक असून त्यामुळे कॅन्सरचा धोकाही निर्माण होऊ शकतो असं तज्ज्ञ सांगतात.
बाजारात विकत मिळणाऱ्या मसाल्यांची पाकिटं हल्ली प्रत्येक घरात असतात. एकदा फोडलेले मसाले महिनोंमहिने अजिबात वापरू नका. एखाद्या महिन्यात ते पाकिट संपवून टाका. त्यामुळे नेहमी कमी प्रमाणात ते खरेदी करा.
भांडे घासण्याची घासणी किंवा स्क्रब महिन्यातून एकदा बदलायलाच हवा. कारण तो नेहमी वापरून वापरून त्यात अनेक अन्नकण अडकतात. ते व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. काही दिवसांनी ते सडतात, त्यांच्यातून दुर्गंधी येते. त्यामुळे घासणी, स्क्रब काही दिवसांनी बदलायलाच पाहिजेत.
तुमच्याकडचा चॉपिंग बोर्ड लाकडाचा असो किंवा मग प्लास्टिकचा असो तो दर ६ ते ८ महिन्यांनी बदलून टाका. प्लास्टिकचा चॉपिंग बोर्ड एकतर वापरूच नये. तोच वापरत असाल तर मग त्याच्यावर स्क्रॅचेस यायला सुरुवात झाली की लगेच तो बदलून टाकावा.
जुने झालेले प्लास्टिकचे डबे ठराविक काळानंतर बदलायलाच पाहिजेत. जेव्हा त्या डब्यातून एक विशिष्ट प्रकारचा वास यायला सुरुवात होते तेव्हा ते डबे अन्नपदार्थ ठेवण्यासाठी वापरण्यायोग्य राहिलेले नाहीत असे समजावे.
चहाचे गाळणेही वर्षांनुवर्षे वापरू नये. काही महिन्यांनी ते नियमितपणे बदलावे.