1 / 10१. अक्षय्य तृतीयेला सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणाऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक असणारा हा मुहूर्त गाठायचाच असं अनेकांनी ठरवलेलं असतं. वर्षभर थोडं थोडं करत सोनं साठवायचं आणि अक्षय्य तृतीयेला दणक्यात दागिन्याची खरेदी करायची, असं अनेकांचं प्लॅनिंग असतं. तुमचंही असंच प्लॅनिंग असेल आणि यंदा सोन्याचं पारंपरिक गळ्यातलं घ्यायचं असेल तर हे खास महाराष्ट्रीयन दागिने तुम्हाला नक्कीच आवडू शकतात. 2 / 10२. हा सुंदर दागिना म्हणजे महाराष्ट्राची पारंपरिक ठुशी. गळ्याला चिटकून असणारा हा दागिना ४ ग्रॅम सोन्यातही घडवता येतो. मणी पोकळ असल्याने कमी वजनात ठुशी घडविणे शक्य आहे.3 / 10३. ठुशी सारखाच दिसणारा हा दागिना म्हणजे वज्रटीक. ठुशीच्याही वर वज्रटीक घालतात. अगदी गळ्याला चिटकून वज्रटीक घालण्यात येेते.4 / 10४. मोहनमाळ हा एक पारंपरिक महाराष्ट्रीयन दागिना. मोहनमाळेत आता अशा पद्धतीचे अनेक नवे प्रकार आले आहेत. इतर दागिने न घालता एकच मोहन माळ गळ्यात असली तरी गळा अगदी भरून दिसतो.5 / 10५. पोहे हार या दागिन्यालाच काही ठिकाणी श्रीमंत हार म्हणून तर काही ठिकाणी चपला हार म्हणून ओळखले जाते. अगदी एक पासून ते पाच पदरांपर्यंत पोहेहार घडवता येतो. 6 / 10६. छोटे छोटे शिक्के एकत्र करून त्यांच्यापासून घडविण्यात आलेला हा दागिना म्हणजे लक्ष्मी हार. या प्रत्येक शिक्क्यावर लक्ष्मीची नक्षी कोरलेली असते. लक्ष्मीहारातही आता अनेक वेगवेगळे प्रकार आले आहेत.7 / 10७. बकुळ हार या दागिन्याची नजाकतच काही वेगळी आहे. ही छोटी छोटी फुलं गळ्यात अतिशय उठून दिसतात. साधारण पोहेहाराप्रमाणेच याची लांबी असते. तसेच एक ते तीन पदरांपर्यंत तो घडविला जातो.8 / 10८. राणी हार हा दागिनाही हल्ली अनेक तरुण मुलींना आवडतो. लग्नात हौशीने राणी हार घडवून घेतला जातो. काही जणी त्याला छानसं पदक ठेवतात, तर काही जणी तो तसाच घालणे आवडते.9 / 10९. मोत्याची चिंचपेटी हा देखील एक पारंपरिक दागिना. अस्सल माेती लावून सोन्यातही चिंचपेटी घडवून घेण्यात येते.10 / 10१०. चिंचपेटी प्रमाणेच तन्मणी हा मोत्याचा दागिनाही अनेकांच्या आवडीचा. तन्मणीच्या पदकांत तीन, पाच, सात याप्रकारे आवडीनुसार खडे लावले जातात.