Join us
Daily Top 2 Weekly Top 5

प्रत्येक कॉन्फिडंट व्यक्तीला असतात ५ सवयी, पाहा तुम्हाला आहेत का? आत्मविश्वास वाढवायचा तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2026 21:11 IST

1 / 8
अनेकदा आपल्याकडे ज्ञान असतं, उत्तम विचार असतात, पण चार लोकांसमोर ते मांडताना आपले पाय लटपटतात किंवा घसा कोरडा पडतो. 'मी बोललेलं समोरच्याला आवडेल का?' किंवा 'माझं काही चुकलं तर लोक काय म्हणतील?' ही मनातील भीती आणि संकोच आपल्याला नेहमी मागे खेचत असतो. आत्मविश्वासाचा अभाव हा केवळ व्यक्तिमत्त्वावरच नाही तर करिअर, नातेसंबंध आणि आयुष्यातील संधींवरही परिणाम करतो. पण तुम्हाला माहीत आहे का? आत्मविश्वास (Confidence) ही काही जन्मजात मिळणारी गोष्ट नाही, तर ती सरावाने कमावलेली एक कला आहे(5 habits of confident people you should follow).
2 / 8
ज्या व्यक्ती आपल्याला कमालीच्या आत्मविश्वासू वाटतात, त्यांच्याकडे काही विशेष जादू नसते; तर त्यांच्याकडे असतात काही विशिष्ट 'सवयी'... सकारात्मक विचार, योग्य देहबोली आणि स्वतःवरचा ठाम विश्वास या जोरावर कोणतीही व्यक्ती आपली भीती झटकून कॉन्फिडंट बनू शकते.
3 / 8
कॉन्फिडंट लोकांमध्ये काही खास सवयी असतात ज्या त्यांना इतरांपेक्षा वेगळं ठरवतात. मनातील भीती आणि संकोच कसा दूर करावा, आत्मविश्वास वाढवण्यासाठी कोणते बदल स्वतःमध्ये करावेत आणि कॉन्फिडंट लोकांच्या अशा कोणत्या खास सवयी आहेत ज्या तुम्हालाही आयुष्यात पुढे जाण्यास मदत करतील ते पाहूयात...
4 / 8
कॉन्फिडंट लोक कधीही स्वतःवरचा विश्वास तसूभरही कमी होऊ देत नाहीत. असे लोक स्वतःच्या क्षमतेवर पूर्ण भरवसा ठेवतात. एखादी चूक झाली तर ती स्वीकारण्याऐवजी किंवा इतरांना दोष देण्याऐवजी, ते आपली जबाबदारी समजून घेतात आणि त्यातून मार्ग काढतात. याशिवाय, 'लोक काय विचार करतील?', 'मी चुकीचं बोललो तर?' किंवा 'लोक माझ्या बोलण्याकडे लक्ष देतील का?' अशा भीतीपासून ते खूप दूर असतात. लोकांच्या जजमेंटची भीती बाळगण्यापेक्षा ते स्वतःला सिद्ध करण्यावर जास्त भर देतात.
5 / 8
आत्मविश्वासू लोक अपयशाला घाबरत नाहीत, तर ते अपयशालाच यशाची पहिली पायरी मानतात. आपल्या चुकांवर रडत बसण्यापेक्षा, त्या चुकांमधून काय शिकता येईल याकडे त्यांचा कल असतो. भविष्यात अशा चुका पुन्हा होऊ नये, यासाठी ते आपले काम अधिक लक्षपूर्वक आणि एकाग्रतेने करतात. त्यांच्यासाठी भीती ही त्यांची कमजोरी नसून, काहीतरी नवीन शिकण्याची एक संधी असते. स्वतःला अधिक प्रगल्भ करण्यासाठी तुम्ही देखील ही सवय स्वतःला लावून घेतली पाहिजे.
6 / 8
कॉन्फिडंट लोक हे उत्तम वक्ते असण्यासोबतच शांत आणि संयमी श्रोते म्हणूनही ओळखले जातात. ते इतरांच्या बोलण्याकडे पूर्ण लक्ष देतात. मग ती नोकरीची मुलाखत असो, कॉलेजमधील प्रेझेंन्टेशन, ऑफिसची मीटिंग असो किंवा एखादा सामाजिक कार्यक्रम; जेव्हा तुमच्याकडे चांगली मानसिकता आणि समोरच्याच ऐकून घेण्याची क्षमता असते, तेव्हा तुम्ही केवळ आत्मविश्वासाने बोलतच नाही, तर समोरच्या व्यक्तीवर आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप देखील पाडता.
7 / 8
कॉन्फिडंट लोक आव्हानांपासून कधीही पळ काढत नाहीत, उलट ते संकटांचा धैर्याने सामना करतात. मग ते एखादे कठीण संभाषण असो, काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न असो किंवा अपयशाचा सामना करणे असो; आत्मविश्वासू व्यक्ती या सर्व गोष्टींकडे यशाचा मार्ग म्हणून पाहतात. आयुष्यात येणाऱ्या कठीण काळामुळे आणि आव्हानांमुळेच तुम्ही खऱ्या अर्थाने लढायला आणि जिंकायला शिकता.
8 / 8
कॉन्फिडंट व्यक्ती कधीही स्वतःची तुलना इतरांशी करत नाहीत आणि याच कारणामुळे त्यांच्या मनात कोणाबद्दलही मत्सर किंवा हेवा वाटण्याची भावना निर्माण होत नाही. असे लोक आपल्या स्वतःतील गुणांची पारख आणि प्रशंसा करणे जाणतात. सतत इतरांशी तुलना करणं टाळल्यामुळे, ते स्वतःला नकारात्मक ऊर्जेपासून दूर ठेवू शकतात. यामुळे त्यांना स्वतःच्या क्षमतांचा पूर्णपणे वापर करता येतो आणि ते स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करू शकतात.
टॅग्स : मानसिक आरोग्यप्रेरणादायक गोष्टी