1 / 6त्या जिंकल्या’! टी २० विश्वचषक जिंकल्या! पाकिस्तान संघाला मात देऊनच जिंकल्या! हे सारं खरं, पण हे फक्त त्यांचं जिंकणं नाही, त्यांनी स्वत: जिंकून भारतालाही जिंकवलं आणि या देशातल्या चांगुलपणाला आणि क्रिकेटप्रेमालाही!2 / 6भारतीय अंध मुलींनी पहिला टी २० विश्वचषक जिंकला. पंतप्रधानांनी त्यांची भेट घेतली तेव्हा त्यांनी पंतप्रधानांनाही सांगितलं की लोक आमच्या आईबाबांना किती बोलत होते. म्हणाले आधीच अंध, त्यात क्रिकेट खेळणार, हातपाय तुटेल. अजून कशाला तुमचा बोजा वाढवता? पंतप्रधान त्यांना आश्वस्त करत म्हणाले, आता तेच लोक तुमचं कौतुक करतील! आपली मेहनत, आपलं काम हेच आपलं उत्तर!’3 / 6ही चर्चा तिथं संपली तरी त्या मुलींची गोष्ट तिथं संपत नाही. अंध संघात खेळलेल्या या साऱ्या मुली अतिशय गरीब घरातल्या, अनेकजणी मागास म्हणवून आजही हिणवल्या जाणाऱ्या जातीतल्याच. त्यांच्या पालकांना अंध पोर आहे याचाच घाेर इतका होता की त्यांना शिकवणं, जगवणं हे फारच लांबच. तरी या मुली क्रिकेटपर्यंत आणि क्रिकेटप्रेम त्यांच्यापर्यंत पोहोचलंच!4 / 6संघाची कप्तान दीपिका टीसी माध्यमात दिलेल्या मुलाखतीत म्हणालीच की या विजयानं काय बदललं तर बदललं इतकंच की आता आमच्यापैकी प्रत्येकीला आपण दोन वेळा पोटभर जेवू शकतो, जेवायला मिळेल याची खात्री आहे. कारण आमच्यापैकी अशी कुणीच नाही जिला भूक माहिती नाही. जी उपाशी राहिलेली नाही, आता मिळालं नरत जेवायला मिळेल का याची खात्री नाही!5 / 6संघ व्यवस्थापक शिखा शेट्टी सांगतात, या मुलींच्या पालकांना राजी करणं हेच मोठं आव्हान होतं. त्यांनी होकार दिला तर अनेक मुली बुजऱ्या. अनेकींना हिंदीही येत नव्हतं. त्यांच्या भाषा आम्हाला येत नव्हत्या. क्रिकेटचे नियम शिकवणं, त्यांना छान वाटेल असं वातावरण निर्माण करणही अवघड होतं. ग्रामीण भागातल्या या मुली हळूहळू मात्र सगळं शिकल्या आणि जिंकल्याही!6 / 6संघातल्या प्रत्येकीची हीच कथा आहे. वरकरणी पाहिलं तर हा विजय फक्त त्या मुलींचा आणि त्यांच्या जिद्दीचाच नाही. तर तो विजय आहे समाजाच्या बुरसटलेल्या विचारांवर मात करणाऱ्या खिलाडू वृत्तीचा, अंध आहे म्हणून स्वप्नच पाहण्याचा अधिकार नाकारणाऱ्या माणसांना धडा शिकवणाऱ्या मुलींच्या धाडसाचाही!