Corona Virus : कोरोना लहान मुलांवर करतोय ॲटॅक; संसर्ग झाल्यास अशी घ्या खबरदारी, करू नका 'या' चुका
Updated:May 28, 2025 12:36 IST2025-05-28T12:24:36+5:302025-05-28T12:36:14+5:30
Corona Virus : कोरोना व्हायरस पूर्वीसारखा धोकादायक नसला तरी लहान मुलांच्या बाबतीत अजूनही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे.

कोरोनाने पुन्हा एकदा सर्वांचं टेन्शन वाढवलं आहे. वेगाने प्रसार होत आहे. याच दरम्यान कोरोना व्हायरस लहान मुलांवर ॲटॅक करत आहे. त्यामुळे या काळात पालकांनी जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे.
कोरोना व्हायरस पूर्वीसारखा धोकादायक नसला तरी लहान मुलांच्या बाबतीत अजूनही सावधगिरी बाळगणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या मुलाला कोरोना व्हायरसचा संसर्ग झाला तर घाबरून जाण्याऐवजी योग्य आणि अचूक पावलं उचलणं आवश्यक आहे.
मुलांना कोरोना झाला तर काय करावं?
मुलामध्ये ताप, खोकला, घसा खवखवणं किंवा थकवा यासारखी लक्षणं दिसू लागताच, ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.रोगाशी लढण्यासाठी शरीराला पुरेशी विश्रांतीची आवश्यकता आहे. जर मुलाला खेळायचं असेल तर त्याला खेळू द्या. त्यांच्या प्रकृतीची नीट काळजी घ्या.
मुलाला वेळोवेळी पाणी, नारळ पाणी किंवा सूप सारख्या गोष्टी द्या, जेणेकरून शरीरात पाण्याची कमतरता भासू नये.मुलाच्या आहारात पौष्टिक गोष्टींचा समावेश करा. जबरदस्तीने खाऊ घालू नका, पण त्याला उपाशीही ठेवू नका.
कुटुंबातील सदस्यांनी मास्क घालावेत आणि मुलाच्या संपर्कात येण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत. लहान मुलांसाठी चांगल्या दर्जाच्या मास्कचा वापर करावा.
अजिबात करू नका 'या' चुका
मुलाला कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरून जाऊ नका. घाबरण्यामुळे चुकीचे निर्णय घेता येतात. शांतपणे विचार करा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याचं नीट पालन करा.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय मुलांना कोणतीही औषधं देऊ नका. लहान मुलांसाठी औषधांचे प्रमाण आणि प्रकार वेगळे असतात. वैद्यकीय सल्ल्याशिवाय काहीही देणं हानिकारक असू शकतं.
मुलांना आयसोलेट करा, पणं असं करताना मुलांना अजिबात एकटं वाटू देऊ नका. त्यांच्या जवळ बसा, त्यांच्याशी बोला, त्यांना गोष्टी सांगा. त्यांचा मूड फ्रेश ठेवा म्हणजे त्यांना लवकर बरं वाटेल.
स्क्रीन टाईम वाढवू नका. आजारपणात टीव्ही किंवा मोबाईल लक्ष विचलित करतो, परंतु जास्त स्क्रीन टाईम मुलांच्या डोळ्यांवर आणि मेंदूवर परिणाम करू शकतो.
सौम्य लक्षणे दिसल्यानंतर निष्काळजीपणा करू नका. कधीकधी मुलांमध्ये लक्षणं सौम्य असतात, परंतु आजार वाढू शकतो. म्हणून सावधगिरी बाळगणं महत्त्वाचं आहे.
कोरोना व्हायरस बदलत असला तरी लहान मुलांसाठी तो चिंतेचा विषय आहे. त्यांची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. या कठीण काळात त्यांना समजून घ्या. योग्य माहिती आणि धीर धरल्यास तुम्ही प्रत्येक आजारावर मात करू शकता.