सकाळी पोट साफ न होण्याचा त्रास रोजच होतो? 'ही' फळं खा, कॉन्स्टिपेशन कायमचं होईल कमी
Updated:January 19, 2026 14:01 IST2026-01-19T12:07:49+5:302026-01-19T14:01:10+5:30

काही जणांना अपचन, बद्धकोष्ठतेचा खूपच त्रास असतो. त्यामुळे मग त्यांचं पोट साफ होत नाही. हा त्रास कमी करायचा असेल तर काही फळं तुमच्या आहारात नियमितपणे असायला हवीत. ती फळं नेमकी कोणती ते पाहा..
याविषयीची माहिती डॉक्टरांनी getfitwith_drchetana या इंस्टाग्राम पेजवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी सांगितलेलं पाहिलं फळ आहे पेरू. पेरू खाताना तो त्याच्या आता असणाऱ्या बियांसकट खावा. कारण बियांमध्येही भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होऊन पोट साफ होण्यास मदत होते.
पोटाच्या, पचनाच्या कित्येक समस्या कमी करण्यासाठी पपईसुद्धा खूप उपयुक्त ठरते. पपईमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतात. पपईमध्ये असणारे पेपेन पचनक्रिया चांगली होण्यासाठी मदत करतात. शिवाय पपईमध्ये पाणी चांगल्या प्रमाणात असल्याने मल मऊ होण्यास मदत होते.
किवी हे फळ बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी एक उत्तम औषध मानले जाते. पचनक्रियेचा वेग वाढविण्यासाठी किवीमध्ये असणारे एन्झाईम्स आणि साेल्युबल फायबर खूप उपयुक्त ठरतात.
पोट साफ व्हायला ज्यांना नेहमीच खूप वेळ लागतो अशा लोकांनी नियमितपणे सफरचंद खायला हवं. सफरचंदाच्या सालांमध्ये जे फायबर असतं ते पोट साफ होण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं.
पिकलेली केळी देखील फायबरयुक्त असल्याने पचनासाठी मदत करणारी ठरते. याशिवाय केळीच्या सालींमध्येही चांगल्या प्रमाणात फायबर असल्याने त्यांची भाजी करून खाणे आयुर्वेदात पचनासाठी उत्तम औषध मानलं गेलं आहे.