Vidarbha special food : अस्सल वैदर्भीय चवीची झणझणीत मेजवानी, पाहा विदर्भातले खास पदार्थ
Updated:June 29, 2025 16:14 IST2025-06-29T16:05:57+5:302025-06-29T16:14:45+5:30
Vidarbha special food: A spicy feast of authentic Vidarbha flavor, see the special dishes of Vidarbha : विदर्भात केल्या जाणाऱ्या खास रेसिपी. एकदम मस्त आणि सोप्या. महाराष्ट्रातील पारंपरिक पदार्थ.

विदर्भात केल्या जाणाऱ्या पदार्थांची खासियत म्हणजे अगदी साधे असतात. चवीला जेवढे भारी तेवढेच करायला सोपेही असतात. कमी सामग्रीत केले जाणारे असे पदार्थ पाहा जे विदर्भात घरोघरी केले जातात.
भारतात भाताचे विविध पदार्थ केले जातात. तसाच एक चविष्ट पदार्थ म्हणजे विदर्भात केला जाणारा हा भरडा भात. बेसनाच्या पीठात साधे मसाले घालून त्याचे गोळे तयार केले जातात. एका पातेल्यात ते गोळे भात आणि इतर पदार्थ एकत्र शिजवून हा भात तयार केला जातो. झटपट आणि जास्त भांडी न वापरता कोणता पदार्थ करायचा असेल तर हा पदार्थ अगदी मस्त आहे.
विदर्भात भाकरी सगळ्यात जास्त खाल्ली जाते. भाकरीसोबत अगदी मस्त लागणारा पदार्थ म्हणजे अर्थातच पिठलं. चमचमीत आणि छान फोडणी देऊन केलेलं पिठलं विदर्भात घरोघरी केले जाते. हा पदार्थ महाराष्ट्रात फार लोकप्रिय आहे.
वांग्याची भाजी तर आपण खातोच. पण कधीतरी विदर्भ स्टाइल भरली वांगी खाऊन पाहा. ताजा नारळ, भरपूर मसाले, तीळ इत्यादी पदार्थ घालून केला जाणारा हा पदार्थ चवीला एकदम भारी आहे. वांग आवडत नसेल तरी भरलं वांग नक्की आवडेल. लहान वांगी वापरुन हा पदार्थ केला जातो.
पिठलं आणि झुणका एकच असे अनेकांना वाटते. मात्र झुणका सुका असतो. त्याची चवही वेगळी असते. महाराष्ट्रात झुणका सगळीकडे खाल्ला जातो. मात्र विदर्भात केला जाणारा झुणका चवीला वेगळा असतो. ठिकाणानुसार पाककृती बदलते. बेसनाचे पीठ, मिरची, लाल तिखट, मोहरी, कोथिंबीर, कांदा वापरुन हा झुणका केला जातो.
तांदळाची भाकरी, ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी, इत्यादी विविध प्रकारच्या भाकरी विदर्भात केल्या जातात. भातही आवडीने खाल्ला जातो. मात्र पोळी, भातापेक्षा भाकरी जास्त खाल्ली जाते. आकाराला मोठ्या असलेल्या भाकऱ्या केल्या जातात.
सांबार वडी हा विदर्भातील एक झक्कास पदार्थ आहे. सांबार म्हणजे कोथिंबीर. विदर्भात कोथिंबीरीला सांबार म्हटले जाते. बेसन, मैदा, भरपूर मसाले, दाण्याचे कुट आणि इतर पदार्थ वापरुन सांबार वडी केली जाते. या वडीला पुडाची वडी असेही म्हटले जाते.
बटाटा, वांगे, कांदा, टोमॅटो, मसाले आणि इतर पदार्थ वापरुन केली जाणारी आलुवांग्याची भाजी विदर्भात फार प्रसिद्ध आहे. करायला अगदी सोपी असलेली ही भाजी मस्त विविध चवींचा खजिनाच आहे. वांगी बटाटा रस्सा जसा असतो काही त्याच प्रकारे ही भाजी केली जाते.
तर्री पोह्यांबद्दल ऐकले नाही असे नेमकेच कोणी असेल. नागपूरच्या गल्लोगल्लीत हा पदार्थ पहायला मिळतो. फोडणीचे पोहे आणि चण्याच्या उसळीचे हे कॉम्बिनेशन एकदम चमचमीत आणि झणझणीत लागते. घरी करायलाही हा पदार्थ अगदी सोपा आहे.
कढी म्हणजे आहाहाहा!! आमटी नको, भाजी नको फक्त कढी केली तरी वाटी भरुन प्यायली जाते. मात्र विदर्भात कढी जरा वेगळी केली जाते. उडदाच्या डाळीचे मसाले घातलेले वडे केले जातात. गरमागरम कढीत ते सोडले जातात. वरतून मस्त लसणीची फोडणी दिली की मग कढी एकदम भारी लागते.
बाजरी, नाचणी, गहू अशा विविध पीठांचा धपाटा करायची पद्धत फारच मजेशीर आहे. कांदा, कोथिंबीर, मसाले घालून केला जाणारा हा पदार्थ एकदम मस्त लागतो. लोणी, तूप, दही अशा पदार्थांसोबत मस्त गरमागरम धपाटा खाणे हा विदर्भातील पारंपरिक नाश्ता आहे.