दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी आणलेल्या लाह्या खूप उरल्या? करा ३ चवदार पदार्थ, लाह्या म्हणजे अमृतमय प्रसादच
Updated:October 29, 2025 18:23 IST2025-10-29T16:32:40+5:302025-10-29T18:23:15+5:30

दिवाळीत लक्ष्मीपुजनासाठी साळीच्या लाह्या हमखास आणल्या जातात. त्या लाह्या आपण पुजेपुरत्या वापरतो आणि नंतर त्या तशाच पडून राहतात.
खरंतर साळीच्या लाह्या अतिशय पौष्टिक असतात. थंडीच्या दिवसांत उद्भवणाऱ्या वेगवेगळ्या तक्रारींसाठी त्या औषधाप्रमाणे काम करतात. आजारी व्यक्तीला साळीच्या लाह्यांचे पाणी दिल्यास त्याला तरतरी येते, त्यामुळे साळीच्या लाह्यांना सलाईन म्हणून ओळखले जाते.
या लाह्या वाया जाऊ नयेत म्हणून त्यांच्यापासून काही वेगवेगळे पदार्थ तयार करून पाहा. ज्यांना या लाह्या नुसत्या खायला आवडत नाहीत ते ही अगदी आवडीने लाह्यांपासून केलेले पदार्थ खातील.
साळीच्या लाह्यांपासून कोणकोणते वेगवेगळे पदार्थ अगदी झटपट तयार करता येतात ते पाहूया...
या लाह्या कढईमध्ये तूप घालून सोनेरी रंगाच्या होईपर्यंत परतून घ्या. यानंतर त्यांच्यामध्ये आटवलेलं दूध घाला. दुधाला उकळी आली की साखर, वेलची पूड, केशर आणि सुकामेवा घाला. लाह्यांची खमंग खीर तयार.
दुसरा पदार्थ म्हणजे लाह्यांचा चिवडा. लाह्या एका मोठ्या भांड्यात घाला. कढईमध्ये तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद असं सगळं घालून फोडणी करून घ्या. ही फोडणी लाह्यांवर घाला आणि चिमूटभर साखर घालून सगळं व्यवस्थित हलवून घ्या. लाह्यांचा खमंग चिवडा तयार.
दही थोडं पातळ करून घ्या. त्यात लाह्या घालून त्या दह्यात चांगल्या मिक्स करा. तेल, मोहरी, हिंग, कडिपत्ता, शेंगदाणे, खोबऱ्याचे काप, हिरव्या मिरच्यांचे तुकडे, हळद असं सगळं घालून केलेली फोडणी लाह्यांवर घाला. मस्त दही लाह्या तयार. या लाह्या संध्याकाळी स्नॅक्स म्हणून खायला मस्त आहेत.