1 / 11मराठी नववर्षाची सुरुवात आणि उन्हाळ्याची चाहूल लागली की, जिभेला थंडावा देणाऱ्या एकाच पदार्थाची आठवण येते, तो म्हणजे 'श्रीखंड'. गुढीपाडव्याच्या नैवेद्याच्या ताटात जर श्रीखंड - पुरी असेल, तर जेवणाची रंगत काही औरच असते. गुढीपाडव्याच्या सणानिमित्त प्रत्येक घराघरांत हमखास श्रीखंड तयार केलं जातं. गार, गोड आणि केशर - वेलचीचा सुगंध असलेलं श्रीखंड जेवणाची चव अनेकपटीने वाढवते(tips to make creamy shrikhanda at home).2 / 11मात्र श्रीखंड बनवताना त्याची टेक्स्चर क्रिमी, मऊ आणि परफेक्ट असणे खूप महत्त्वाचे असते. अनेकांना वाटतं की, विकतसारखं घट्ट आणि क्रिमी श्रीखंड घरी बनवणं कठीण आहे. पण योग्य पद्धत आणि काही छोट्या टिप्स लक्षात ठेवल्या तर अगदी घरच्याघरीच चक्का पाडण्यापासून ते केशर - वेलचीचा सुवास येण्यापर्यंत सर्वकाही परफेक्ट करू शकता. यंदाच्या पाडव्याला घरगुती श्रीखंडाचा आस्वाद घेण्यासाठी पाहा खास टिप्स... 3 / 11श्रीखंडासाठी घट्ट आणि ताजे दही वापरणे खूप महत्त्वाचे असते. दही जास्त आंबट नसावे, नाहीतर श्रीखंडाची चव बदलू शकते. श्रीखंडासाठी दही लावताना ते जास्त आंबट नसावे. ताजे आणि साय असलेल्या दुधाचे दही वापरल्यास चक्का अधिक मऊ आणि चविष्ट होतो.4 / 11 दही स्वच्छ कापडात बांधून ६ ते ७ तास टांगून ठेवा, जेणेकरून त्यातील पाणी पूर्णपणे निघून जाईल. यामुळे श्रीखंड अधिक घट्ट आणि क्रिमी बनते. रात्रभर ते टांगून ठेवावे, जेणेकरून चक्का घट्ट होईल.5 / 11साखर थेट घालण्याऐवजी पिठीसाखर वापरल्यास ती पटकन मिसळते आणि श्रीखंड अधिक स्मूद होते. साधारणपणे १ कप घट्ट चक्क्यासाठी पाऊण ते एक कप पिठीसाखर लागते. पण जर दही थोडे आंबट असेल, तर साखरेचे प्रमाण थोडे वाढवावे लागते. साखर नेहमी चाळून वापरावी जेणेकरून गुठळ्या होणार नाहीत.6 / 11 श्रीखंडामध्ये गुठळ्या राहू नयेत आणि ते अगदी मऊ स्मूद व्हावे यासाठी चक्का आणि साखर एकत्र केल्यावर ते मिश्रण पुरणयंत्रातून किंवा साध्या स्टीलच्या चाळणीतून हाताने घासून गाळून घ्या. यामुळे श्रीखंडाला विकतसारखेच टेक्श्चर येते. 7 / 11जर तुमचा चक्का जास्त आंबट झाला असेल, तर तो फेटण्यापूर्वी त्यात थोडी दुधाची साय (Fresh Cream) किंवा २ चमचे मलई घाला. यामुळे चक्का मऊ होतो आणि त्याचा अति-आंबटपणा कमी होतो.8 / 11केशर थेट घालण्याऐवजी कोमट दुधात १० ते १५ मिनिटे भिजवून घाला. यामुळे रंग आणि सुगंध अधिक चांगला येतो.9 / 11 श्रीखंडात वेलची पूड सोबतच अगदी चिमूटभर जायफळ पूड घाला. यामुळे श्रीखंडाची चव कित्येक पटीने वाढते.10 / 11 ड्राय फ्रूट्सचे काप श्रीखंडात घालण्यापूर्वी थोडे तुपावर परतून घेतले तर ते खाताना अधिक कुरकुरीत लागतात.11 / 11 श्रीखंड तयार झाल्यावर किमान १ ते २ तास फ्रीजमध्ये थंड होऊ द्या. थंडगार श्रीखंड आणि गरमागरम पुऱ्या हे सर्वात भारी कॉम्बिनेशन आहे.