भारतात स्वयंपाकासाठी लोकप्रिय असलेले ६ खाद्यतेल, पाहा कोणत्या तेलामुळे वाढतं वजन-कोणतं चांगलं..
Updated:June 24, 2025 16:17 IST2025-06-24T16:09:23+5:302025-06-24T16:17:27+5:30
6 cooking oils popular in India, see which oil causes weight gain - which is good : भारतात या तेलाना आहे भरपूर मागणी. पाहा कोणते तेल आहे चांगले आणि किती प्रकार आहेत.

स्वयंपाक करताना आपण विविध पदार्थ वापरतो. त्यातील काही पदार्थ रोज वापरले जातात. मीठ, हळद, तिखट असे पदार्थ रोज खाल्ले जातात. जेवण तयार करण्याची सुरवात तेलाने होते. रोज काही चमचे का होईन तेल तर वापरले जातेच.
घरोघरी वेगवेगळ्या पदार्थांचे खाद्य तेल वापरले जाते. तेलाची चव घरोघरी वेगळी असते. त्यामुळे अन्नाची चवही वेगळीच येते. सगळ्यांनाच सगळ्या चवीचे तेल पचत नाही. जे तेल घरी रोज वापरले जाते त्याची आपल्याला सवय होते.
भारतात सूर्यफूल तेल मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. या तेलात जीवनसत्त्व 'ई' मोठ्या प्रमाणात असते. तसेच पॉली-अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. भारतात महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये याचा अधिक वापर जास्त केला जातो.
दुसरे फार वापरले जाणारे तेल म्हणजे शेंगदाण्याचे. मोनो-अनसॅच्युरेटेड फॅट्स आणि इतर काही गुणधर्मांनी भरलेले हे तेल महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान आदी राज्यांमध्ये जास्त प्रमाणात वापरले जाते. रंगाला जरा इतर तेलांपेक्षा गडद असते.
कॅल्शियम, मॅग्नेशियम, अँटीऑक्सिडंटस आदी गुणांनी परिपूर्ण असे तीळाचे तेल आरोग्यासाठी चांगले मानले जाते. तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आदी राज्यांमध्ये तीळाचे तेल मोठ्या प्रमाणात वापरले जाते. महाराष्ट्रात विदर्भ आणि मराठवाडा या भागांत तीळाचे तेल वापरले जाते.
नारळाचे तेल आपल्या महाराष्ट्रात भरपूर वापरले जाते. तसेच दक्षिण भारतात नारळाचे तेल खुप वापरतात. केसांसाठी आणि त्वचेसाठी नारळाचे तेल अगदी पौष्टिक आहे. नारळ तेलात सॅच्युरेटेड फॅट्स असतात. नारळ तेल तळणीसाठी वापरले जाते.
पूर्व भारतात मोहरीचे तेल वापरले जाते. पचनासाठी तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी हे तेल फार उपयुक्त असते. त्यात ओमेगा-३ फॅटी अॅसिड, एलिसिन असते. युपी, बिहार, बंगालसारख्या ठिकाणी या तेलाशिवाय स्वयंपाकच केला जात नाही.
पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स, जीवनसत्त्व 'के' अशा गुणधर्मांनी परिपूर्ण आणि लो कोलेस्ट्रॉल असलेले तेल म्हणजे सोया तेल. सोयाबिनचे हे तेल जास्त मध्य प्रदेश, राजस्थान , गुजरात आदी ठिकाणी वापरले जाते. पापड करण्यासाठी तसेच तळणीसाठी हे तेल जास्त वापरले जाते.