Join us

नथीचा नखरा श्रावणात साजरा! पेशवाई ते कारवारी पाहा नथींचे ६ प्रकार- नथीची पारंपरिक नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2025 14:31 IST

1 / 8
बाजारात काय नवीन? हा म्हणजे महिलांचा अगदीच आवडीचा प्रश्न. काही सणवार आले असतील तर आपल्या मैत्रिणीला घेऊन बाजारातून एक फेर आपण नक्कीच मारतो. यंदा काय वेगळ्या दागिन्यांची चंगळ आहे का जुनीच डिझाइन आहेत याची चौकशी एकदा करायलाच हवी.
2 / 8
काही दागिने आपण ठराविक सणांना घालतो. अगदी लहान पूजेसाठी ते लग्नसमारंभासाठी कानातले तर घालतोच मात्र एखादा मराठमोळा सण असेल तर नाक कसं रिकामं ठेऊन चालेल? नाकात सुंदर अशी नथ हवीच. आजकाल नथींचे अनेक नवीन प्रकार आले आहेत. तरी आपल्या पारंपरिक प्रकारांचा साज काही औरच असतो.
3 / 8
नऊवारी साडी तसेच ठसठशीत काठाची भरलेली साडी असेल तर नाकात मोठी मोत्याची पेशवाई नथ एकदम मस्त दिसेल. यामध्ये लहान नथही असते. पेशवाई नथीचे खासियत म्हणजे त्यावरील बारीक कलाकुसर. नाक टोचलेले असेल तर खरी पेशवाई नथ घालण्यात फारच सुख आहे.
4 / 8
सर्वसामान्य जी नथ जास्त वापरली जाते ती म्हणजे मराठा नथ. मराठ्यांच्या काळात ही नथ महिला वापरत असत म्हणून तिला मराठा नथ नाव पडले. मराठी नथ असे समजून सगळ्या सारख्याच असतात अशी गफलत करु नका. मराठा नथ आणि पेशवाई नथ जरा सारख्याच असल्या तरी त्यात फरक आहे. लाल खडे, हिरवे खडे आणि मोती असा साज या नथीचा असतो.
5 / 8
कारवारी नथीचे सौंदर्य म्हणजे आहाहा!! तसा हा फार लोकप्रिय आणि प्रसिद्ध दागिना नाही. तळ कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात अशी नथ पाहायला मिळते. कारवारच्या जवळपास आजकाल हा दागिना कमी पहायला मिळतो. मात्र एकेकाळी महिला प्रत्येक सणाला या पद्धतीची नथ घालत असत.
6 / 8
नाजूक, सुंदर फक्त साडीच नाही तर पारंपरिक कोणत्याही पोशाखावर मस्त दिसणारी नथ म्हणजे बानू नथ. मध्यंतरी या नथीची भरपूर मागणी बाजारात होती. आजही महिला आवडीने ही नथ वापरतात. महाराष्ट्रात हा प्रकार फार लोकप्रिय आहे. लग्नातही नवरी ही नथ वापरते. या नथीचे उपप्रकारही आहेत.
7 / 8
जरा लहान मोती असलेली अर्धगोलाकार आणि अगदी सुबक अशी नथ म्हणजे कोल्हापूरी नथ. आकाराने मोठी असलेली कोल्हापूरी नथही मिळते. मात्र लहान छान नाका लगत बसणारी कोल्हापूरी नथ सगळ्या महिलांना सुंदर दिसते. एखादी कोल्हापूरी नथ दागिन्यांच्या डब्यात असायला हवीच.
8 / 8
सध्या ऑक्सिडाईज नथ फार लोकप्रिय आहे. अर्थात पूर्वीपासून विविध समाजात अशी नथ महिला घालत असत. त्यामुळे चंदेरी रंगाची नथही पारंपरिक प्रकारात येते. ही नथ साध्या कॉटनच्या साडीवर अगदी सुंदर दिसते. तरुणी आजकाल या प्रकारचीच नथ वापरतात.
टॅग्स : दागिनेमहाराष्ट्रमहिलाश्रावण स्पेशल