perfect recipe for Maharashtra dish- masalebhat | मसाले भात ‘गचका’ होतो? परफेक्ट मसालेभात करायचाय?- फक्त या 8 गोष्टी करा
मसाले भात ‘गचका’ होतो? परफेक्ट मसालेभात करायचाय?- फक्त या 8 गोष्टी करा

ठळक मुद्देमसालेभाताची चव उगीच जिभेवर रेंगाळत नाही.

-सखी ऑनलाइन टीम

मसाले भात हा टीपीकल मराठी पंक्तीतला मानाचा पदा्र्थ. फ्राइड राइस आणि पुलाव आपण बाहेर खातोच. पण अजूनही मसालेभात, त्यावर मस्त ओलं खोबरं, कोथिंबीर आणि सोबत कढी आणि जिलबी असेल तर तृप्त होतो जीव.  अजूनही  लग्नात केलेल्या मसाले भाताची चव हवहवीशी वाटतेच.  
मसाले भात एकतर खावा तो लग्नाच्या पंक्तीतला नाहीतर आपल्या घरचा. कारण मसाले भाताला विशिष्ट चव आणि रंग असल्याशिवाय मजा येत नाही. मसाले भात हा नीट जमून येणं फार गरजेचं असतं. यात फक्त भरपूर भाज्या घातल्या, मसाले ओतले की झाला तयार असं नाही. तेल,पाणी, भाज्या, मीठ आणि मसाला हे योग्य मापातच पडलं तर मसाले भाताची म्हणून असलेली चव आणि रंग उतरतो. 
मसाले भातात भाज्या घातल्या जातात म्हणून तो काही पुलाव होत नाही. पण मसाले भातातलं पाण्याचं प्रमाण चुकलं तर मात्र मसाले भाताची खिचडी होण्याचा धोका असतोच.  आणि गचका होतो. त्यात काही मज्जा नाही. परफेक्ट मसाले भात करण्याची एक विशिष्ट पध्दत आहे. सहज सोप्या गोष्टी करुन पहा. तुमचाही मसालेभात फक्कड जमून येइल!

मसालेभात करताना...

1)  मसालेभात हा नीट शिजलेलाही हवा पण तो चिकट आणि मऊ असता कामा नये.  मसालेभात हा मोकळा तर व्हायला हवा पण पुलावाइतका मोकळा नको म्हणून यासाठी मध्यम लांबीचा म्हणजे कोलम किंवा चिनूर सारखा तांदूळ योग्य ठरतो. 


2)  मोड आलेली कडधान्यं किंवा तोंडली, फ्लॉवर, वांगी, फरसबी, मटार, वांगी गाजर यासारख्या भाज्या घालून किंवा आपल्या आवडीच्या भाज्या घाऊन मसालेभात बनवला जातो. 


3) मसाले भात नीट शिजावा, पुरेसा , मोकळा व्हावा आणि त्यातल्या भाज्या, कडधान्यंसुद्धा योग्य तेवढीच  ( गाळ नको) शिजावीत यासाठी एक सोपी पद्धत आहे. 


4. सर्वात प्रथम तांदूळ धुवून ठेवावे. प्रेशरपॅनमध्ये फोडणी करून भाज्या/कडधान्यं त्यात टाकून चांगले परतून घ्यावे. मग त्यात तांदूळ घालून थोडा वेळ परतावे. काजू, दाणे घालायचे असल्यास ते घालून जरा परतावे. मग त्यात तांदळाच्या दुप्पट पाणी आणि भाज्या/कडधान्यं घातलेली असतात म्ह्णून त्यासाठी थोडं जास्त पाणी घालून मिश्रण ढवळावं. त्यात मसाला, मीठ, थोडं ओलं खोबरं घालावं. पाण्याला उकळी आली की प्रेशरपॅनचं झाकण लावून शिट्टी लावावी आणि गॅस एकदम मंद ठेवावा. साधारण दहा ते बारा मिनिटांनी गॅस बंद करावा.

 
5) गॅस बंद केल्या केल्या प्रेशरपॅनचं झाकणं लगेच उघडू नये. मसाले भात पुरेसा मोकळा होण्यासाठी पॅनमधील वाफ जिरून जाणंही गरजेचं असतं. म्हणून गॅस बंद केल्यावर 10 मीनिटांनी प्रेशर पॅन उघडावा.  


6)मसालेभात करताना घड्याळीकडे बारकाईनं लक्ष हवं. दहा मिनीटांपेक्षा जास्त वेळ प्रेशर पॅन गॅसवर ठेवल्यास भात खाली लागण्याची शक्यता असते. 

7) मसाले भातात गोडा मसाल्यासोबत ताजा ताजा तयार केलेला मसाला टाकल्यास भातास उत्तम चव येते. यासाठी लवंग, दालचिनी, वेलची, धने, सुक्या लाल मिरच्या, जिरे या सामग्रीची आवश्यकता असते.  

 

8) अती मसालेदार किंवा अती तिखट मसाले भात खाल्ला जात नाही. त्यामुळे बेताचं मीठ आणि बेताचा मसाला हेच उत्तम मसालेभाताचं सिक्रेट आहे. 

Web Title: perfect recipe for Maharashtra dish- masalebhat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.