PCOD is not a lifestyle decease but bad lifestyle makes it happen. | केव्हाही जेवण, व्यायामाला नकार आणि वाट्टेल तेव्हा झोप? -चुकीच्या जीवनशैलीची PCOD त्रिसुत्री

केव्हाही जेवण, व्यायामाला नकार आणि वाट्टेल तेव्हा झोप? -चुकीच्या जीवनशैलीची PCOD त्रिसुत्री

ठळक मुद्देउत्तम आहार, उत्तम व्यायाम यांचा फायदाच होतो.

डॉ. यशपाल गोगटे ( हार्मोन तज्ज्ञ)

पीसीओडी होवूच नये यासाठी काळजी घेता येते का? प्रतिबंधात्मक उपाय करता येतात का? त्याचा उपयोग पीसीओडीवर किती आणि कसा होतो? आणि मुख्य म्हणजे वयात येणार्‍या मुलींच्या आरोग्यावर त्याचा कसा परिणाम होतो? या प्रश्नांचा विचार करतानाच हे लक्षात घ्यायला हवं की पीसीओडीची समस्या आज पूर्वीच्या तुलनेत बर्‍याच महिला आणि मुलींमध्ये जास्त आढळते. पण म्हणून पीसीओडी म्हणजे आधुनिक जीवनशैलीचा आजार आहे असं म्हणून चालणार नाही. आधुनिक जीवनशैलीपेक्षाही चुकीची जीवनशैली आणि पीसीओडी यांचा जवळचा संबंध असतो. 
पीसीओडी का होतो याचं नेमकं कारण डॉक्टर, संशोधक शोधत आहेत. पण काही गोष्टींचा अंदाज घेऊन पीसीओडीची शक्यता मात्र नक्कीच चाचपता येते. 
1) पीसीओडी हा आजार बर्‍याच अंशी अनुवांशिक आहे. ज्या कुटुंबात मधुमेह या आजाराचं प्रमाण जास्त आहे, त्या कुटुंबातील मुलींना हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. त्यामुळे हा आजार जवळ जवळ जन्मापासूनच सुरूवात होते. 
2) खासकरून जन्मतर्‍ कमी वजनाच्या  ( अडीच किलोपेक्षाही कमी वजनाच्या )  तसेच जन्मतर्‍ अधिक वजनाच्या  ( साडेतीन किलोपेक्षा जास्त वजनाच्या ) मुलींना भविष्यात पीसीओडी हा आजार होण्याची शक्यता खूप जास्त असते. 
3) ज्या मुलींना लवकर पाळी येते किंवा ज्या मुली लवकर वयात येतात त्यांनाही पीसीओडी होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे यापैकी कोणतंही लक्षण आपल्या ‘फॅमिली हिस्ट्री’त असेल तर त्या कुटुंबातील मुलींना पीसीओडीचा धोका असतो. 
4)  मुलींची जीवनशैलीही लहानपणापासूनच आरोग्यदायी ठेवणं गरजेचं असतं.या मुलींच्या बाबत योग्य आहार आणि नियमित व्यायाम या बाबी खूप महत्त्वाच्या असतात. 
5) पीसीओडीचा आजार होवूच नये म्हणून सुरूवातीपासून अमूक गोष्टींची काळजी घ्या, तमूक नियम पाळा अशी काही मार्गदर्शक तत्त्वं नाहीत. पण पीसीओडी असतानाही वजन नियंत्रणात ठेवलं, पौष्टिक आणि संतुलित आहाराचं सूत्र पाळलं तर पीसीओडीमुळे उदभवणारे  मधुमेह, हदयरोग या आजारांना टाळता येऊ शकतं. 

6) आहाराचे नियम पाळताना तंतूमय पदार्थाचं सेवन जास्त प्रमाणात करायला हवं. कारण त्यामुळे सतत क्रियाशील राहण्यास शरीराला ऊर्जा मिळते. फळांचं सेवन करणंही महत्त्वाचं. कारण फळांमुळे लठठपणा, हदयरोग आणि इतर आरोग्यविषयक समस्यांवर नियंत्रण मिळवता येतं. 
7) पीसीओडी होवू नये किंवा झालेला पीसीओडी कायमचा बरा होणं या गोष्टी शक्यतेच्या चौकटीत येत नसल्या तरी वजन आटोक्यात ठेवणं, प्रथिनयुक्त आणि कबरेदकं असलेले पदार्थ सेवन करणं, संतुलित आहार  घेणं आणि नियमित व्यायाम करणं या त्रिसूत्रीच्या आधारावर पीसीओडीवर नियंत्रण मात्र नक्कीच ठेवता येतं.  
8) पीसीओडीची समस्या असूनही मुलींना आणि महिलांना त्यांचं सामान्य जीवन आनंदानं जगता येतं. 
9) पीसीओडीबाबत आणखी एक गैरसमज आहे की पीसीओडीचा नवरा बायकोच्या लैंगिक जीवनावर परिणाम होतो. खरंतर हे सत्य नाही. या समस्येमुळे लैंगिक जीवनावर फारसा परिणाम होत नाही. 
10) खरंतर पीसीओडीचा थेट परिणाम लैंगिक जीवनावर होत नाही. पण पीसीओडी आणि लैंगिक जीवन यांचा अप्रत्यक्ष संबंध मात्र आहे. जसे पीसीओडी समस्येमुळे गर्भधारणा लवकर होत नाही. त्यामुळे नवरा बायकोत एकमेकांना दोष दिले जातात. यामुळे भांडणं होतात. नकोच काही करायला अशी भावना दोघांमध्ये निर्माण होते. त्यामुळे निर्माण होणार्‍या कलहाचा परिणाम लैंगिक जीवनावर होतो इतकंच. पण इथेही जर संयम ठेवला आणि डॉक्टरांचा सल्ला घेतला तर  नातेसंबंधात गंभीर परिस्थिती उद्भवत नाही. 

( शब्दांकन -माधुरी पेठकर)

Web Title: PCOD is not a lifestyle decease but bad lifestyle makes it happen.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.