Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासाचा ताण आणि परीक्षेचं टेंशन विसरतील मुलं, परीक्षा काळात रिलॅक्स होण्यासाठी ५ गोष्टी सोप्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2026 18:24 IST

yoga to improve memory and concentration for kids : yoga for stress relief during board exams : best yoga poses for students during exams : योगासनांचा सराव केल्यामुळे मुलांवरील ताण कमी होतो, मन रिलॅक्स राहतं, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते.

१०वी आणि १२वीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. या काळात फक्त अभ्यासाचाच नाही, तर निकालाचा आणि भविष्याचाही प्रचंड मानसिक ताण मुलांवर असतो. तासंतास एकाच जागी बसून अभ्यास केल्यामुळे डोळ्यांना थकवा येणे, पाठदुखी आणि चिडचिड होणे अशा अनेक लहान - मोठ्या समस्या मुलांमध्ये नकळतपणे दिसून येतात. सतत अभ्यास, झोपेची कमतरता, अपेक्षांचा भार आणि निकालाची भीती यामुळे मुलं मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होतात. अशा काळात फक्त अधिक अभ्यास करण्यापेक्षा मन शांत ठेवणं, एकाग्रता वाढवणं आणि शरीर व मेंदूला योग्य पद्धतीने  आराम देणं तितकंच गरजेचं असतं. अशा परिस्थितीत, पालकांनी मुलांच्या मनाची एकाग्रता आणि शांतता टिकवून ठेवण्याकडे विशेष लक्ष दिले पाहिजे(yoga for stress relief during board exams).

अभ्यासाच्या या धावपळीत 'योग' हा विद्यार्थ्यांसाठी एक उत्तम सोबती ठरू शकतो. योगासनांमुळे केवळ शरीराला आराम मिळत नाही, तर मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळून स्मरणशक्ती सुधारण्यासही मदत होते. योग्य पद्धतीने योगासनांचा सराव केल्यामुळे मुलांवरील ताण कमी होतो, मन रिलॅक्स राहतं, स्मरणशक्ती वाढते आणि अभ्यासात लक्ष केंद्रित करण्यास मदत होते. परीक्षा काळात मुलांना टेन्शन-फ्री ठेवण्यासाठी आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी (best yoga poses for students during exams) कोणती योगासनं फायदेशीर ठरतात, ते पाहूयात. 

परीक्षा काळात मुलांनी नेमकी कोणती योगासनं केल्याने होईल फायदा... 

१. वृक्षासन (Vrikshasana) :- वृक्षासन हे आसन केल्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते आणि शरीराचा तोल सांभाळल्यामुळे मनाला स्थिरता मिळते. सर्वातआधी योगा मॅटवर सरळ उभे राहा. आता आपला उजवा पाय गुडघ्यात दुमडून त्याचा तळवा डाव्या पायाच्या मांडीला टेकवण्याचा प्रयत्न करा. या दरम्यान शरीराचे संपूर्ण वजन डाव्या पायावर संतुलित ठेवा आणि सरळ उभे राहण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर श्वास घेत दोन्ही हात डोक्याच्या वर नेऊन नमस्काराच्या मुद्रेत जोडा. या स्थितीत साधारण ३० ते ६० सेकंद राहा. आता हळूहळू श्वास सोडत पुन्हा मूळ स्थितीत परत या. हीच प्रक्रिया दुसऱ्या पायाने देखील करा. ही क्रिया साधारण ३ ते ५ वेळा पुन्हा करा.

दहावी-बारावीच्या परीक्षेला जाणाऱ्या मुलांसाठी आईबाबांनी म्हणावे ‘हे’ जादूई शब्द, ताण कमी-रिझल्ट मनासारखा...

२. ताडासन (Tadasana) :- ताडासन केल्याने शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि थकवा दूर होऊन मनाला नवीन उत्साह आणि फ्रेशनेस देखील मिळतो. हे आसन करण्यासाठी जमिनीवर ताठ उभे राहून दोन्ही हात नमस्काराच्या मुद्रेत जोडा. आता हळूहळू आपले दोन्ही हात वरच्या दिशेला सरळ करा. त्यानंतर आपल्या पायाच्या टाचा वर उचलण्याचा प्रयत्न करा आणि शरीराचा संपूर्ण भार चवड्यांवर द्या. काही सेकंद या स्थितीत राहिल्यानंतर पुन्हा सामान्य स्थितीत परत या. ही प्रक्रिया किमान १० ते १५ वेळा पुन्हा करा.

तुम्ही ५ गोष्टी करत नसाल तर कडक डाएट आणि भरमसाठ व्यायाम करुनही नाही होणार वेटलॉस!

३. पश्चिमोत्तानासन (Paschimottanasana) :- पश्चिमोत्तानासन हे आसन मेंदूला शांत ठेवण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. सर्वात आधी योगा मॅटवर सुखासनात बसा आणि पाय समोरच्या बाजूला सरळ करा. दोन्ही पायांच्या टाचा आणि पंजे एकमेकांना जुळलेले असावेत. आता श्वास सोडत पुढच्या बाजूला वाका आणि दोन्ही हातांनी पायांचे अंगठे पकडण्याचा प्रयत्न करा. आपले कपाळ गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा आणि कोपर जमिनीवर टिकवा. या मुद्रेत १ ते २ मिनिटे थांबल्यानंतर पुन्हा मूळ स्थितीत परत या. ही प्रक्रिया ३ ते ५ वेळा करा.

४. हलासन (Halasana) :- हे आसन पाठ आणि मानेचा ताण कमी करण्यास मदत करते. योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. आपले हात शरीराजवळ ठेवा आणि तळवे जमिनीच्या दिशेला असावेत. श्वास घेत पाय हळूहळू वर उचला आणि ९० अंशाचा कोन तयार करा. आता श्वास सोडत आपली पाठ वर उचलून पाय डोक्याच्या मागच्या बाजूला नेऊन जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत ३० सेकंद राहा आणि पुन्हा हळूहळू मूळ स्थितीत परत या. ही क्रिया ३ ते ५ वेळा पुन्हा करा.

मिरर वर्क साडी आणि ब्लाऊजची 'एव्हरग्रीन' फॅशन! आरशांच्या नक्षीने उजळून निघेल सौंदर्य - मिरर वर्क साड्यांचे मनमोहक प्रकार...  

५. सर्वांगासन (Sarvangasana) :- योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. आपले पाय वरच्या दिशेला उचला आणि दोन्ही हातांनी कंबरेला आधार द्या. या दरम्यान आपले पाय एकदम सरळ असावेत. या स्थितीत ३० ते ५० सेकंद थांबल्यानंतर सामान्य स्थितीत परत या. ही प्रक्रिया ३ ते ५ वेळा करा. परीक्षेच्या काळात या योगासनांच्या नियमित सरावामुळे विद्यार्थ्यांना मानसिक शांतता मिळते आणि त्यांचा आत्मविश्वास वाढतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Beat Exam Stress: 5 Yoga Poses for Instant Relaxation & Focus

Web Summary : Exams bring stress. Yoga helps students relax, focus, and improve memory. Vrikshasana, Tadasana, Paschimottanasana, Halasana, and Sarvangasana are beneficial. Regular practice boosts confidence and reduces anxiety.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंपरीक्षा