Join us

मुलांचे खेळ वेगळे-मुलींचे वेगळे हे कुणी ठरवलं? मुलांनी भातुकली खेळली तर आईबाबा का रागवतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2024 15:35 IST

मुलामुलींचे खेळ, रंग, वस्तू वेगळ्या करुन आपण त्यांना नक्की काय शिकवतो आहोत?

ठळक मुद्देपालकांनीही हे लक्षात ठेवावं की आपण आपल्या मुलांना नक्की काय शिकवतो आहोत.

-डॉ. योगिता आपटे

“असा रडत काय बसलायस? मुलगी आहेस का?”“वर तोंड करून उलट उत्तर देऊ नकोस. मुलीच्या जातीने खाली मान घालून रहावं.”“तुला कोणी सांगितलं पाणी आणून द्यायला? जा ताईला सांग. ही कामं मुलांनी करायची नसतात.”“तायडे जरा कणीक भिजवून दे. दादाला जेवायला वाढ.”“बॉईज कधी पिंक कलर घालतात का?”“असा टायगर आणि डायनॉसॉरचा प्रिंट? दादाचा टीशर्ट घातलायस की काय?”“मुली कधी क्रिकेट खेळतात का? जा तिकडे भातुकली नाहीतर असलं काहीतरी खेळा!”“तू मुलींमध्ये कशाला जातोस खेळायला?”

- असं एक तरी वाक्य तुम्ही आत्तापर्यंत ऐकलंच असेल. अनेक मुलांना मुलींच्यात जाऊन लंगडी-पळी खेळतो किंवा दोरीच्या उड्या मारतो म्हणून मित्र चिडवतात. मुलींना म्हणतात क्रिकेट मुलींचा खेळ नाही, जा तू भातुकली खेळ मुलांना म्हणतात, मुलींसारखा काय भातुकली खेळतोस? मुलींसारखा काय रडतोस?लहान मुलं असतात पण त्यांचे खेळ, खेळण्यांचे रंग, वस्तू सगळं वेगळं करुन टाकले जाते. 

का असे?मुळात मुलींचे खेळ आणि मुलांचे खेळ, मुलींचे कपडे आणि मुलांचे कपडे, मुलींचे रंग आणि मुलांचे रंग, मुलींची कामं आणि मुलांची कामं, मुलींची कार्टून्स आणि मुलांची कार्टून असं काही असू शकतं का?मुलांचे खेळ म्हणजे काय? तर जे खेळ फक्त मुलगेच खेळू शकतात, मुली खेळूच शकत नाहीत असे खेळ! असे काही खेळ असणं शक्य तरी आहे का?लोक म्हणतात की क्रिकेट आणि फुटबॉल हे मुलांचे खेळ आहेत. पण या दोन्ही खेळांच्या तर मुलींच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. लोक म्हणतात की कुस्ती आणि बॉक्सिंग हे काय मुलींचे खेळ आहे का? पण आपल्या भारतातल्या मुली या खेळांमध्ये आंतरराष्ट्रीय मेडल्स घेऊन येतात. मेरी कोम, फोगट बहिणी, साक्षी मलिक या काय मुलगे आहेत का? जर जगभर मुली हे खेळ व्यावसायिक पातळीवर खेळतात तर मग ते खेळ ‘मुलांचे’ कसे झाले?

तर आपल्या आजूबाजूला सामान्यपणे क्रिकेट कोण खेळतं? तर मुलगे. आणि म्हणून आपल्याला आणि मोठ्या माणसांनाही असं वाटतं, की हे मुलांचे खेळ आहेत. पण खरं तर तसं काही नसतं. कुठलाही खेळ कोणीही खेळू शकतं. पण त्यातसुद्धा होतं काय माहितीये का? त्यातल्या त्यात मुलींनी मुलांचे खेळ खेळले ना, तर लोक कमी बोलतात. काही वेळा तर आधी चिडवतात, पण नंतर त्या मुली मुलांसारख्या ‘डॅशिंग’ आहेत म्हणून त्यांचं कौतुकसुद्धा करतात. पण भातुकली सारखे मुलींचे खेळ तर मुलांना खेळूच देत नाहीत. इतर मुलंसुद्धा त्यांना चिडवतात. असं का ?

भातुकली, बाहुली, लंगडी, ठिक्कर हे खेळ खेळणं यात काय वाईट आहे? तर त्यात काहीही वाईट नाही. त्याही खेळातून आपण काही ना काहीतरी शिकतच असतो आणि ते शिकणंसुद्धा महत्वाचं असतं. जोरात पळता येणं जितकं आवश्यक आहे तितकंच एका जागी बसून शांतपणे, एकाग्रपणे, इतर चार जणांशी जुळवून घेत खेळता येणंसुद्धा महत्वाचं आहे. आणि त्यामुळेच भातुकलीपासून ते फुटबॉलपर्यंत सगळे खेळ बिनधास्त खेळावे. मुलांनीही आणि मुलींनीही!आणि पालकांनीही हे लक्षात ठेवावं की आपण आपल्या मुलांना नक्की काय शिकवतो आहोत.

yogeeta.apte@gmail.com(लेखिका मानसशास्त्रात डॉक्टरेट असून समुपदेशक आहेत.) 

टॅग्स :मुलांमध्ये तारुण्यलहान मुलंशिक्षणपालकत्व