काच घरातील दोन मुले, पण वागणूक मात्र दोघांनाही वेगवेगळी...आपल्यापैकी अनेकांनी अशा कुटुंबांविषयी ऐकले असेल जिथे एक मुलं नेहमी 'आदर्श' मानले जाते, तर दुसऱ्याला सतत दुय्यम वागणूक मिळते. ज्या मुलाला पालकांकडून अवाजवी कौतुक, विशेष सवलती आणि 'कधीही चूक न करणारा' असा दर्जा मिळतो, त्याला मानसशास्त्राच्या भाषेत 'गोल्डन चाईल्ड' असे म्हणतात(effects of golden child syndrome).
वरवर पाहता हे मूल खूप लाडात वाढलेले, यशस्वी आणि भाग्यवान वाटते; मात्र प्रत्यक्षात या विशेष वागणुकीचा परिणाम त्या मुलाच्या मानसिक विकासावर, नातेसंबंधांवर आणि व्यक्तिमत्त्वावर खोलवर होऊ शकतो. पालकांच्या नकळत निर्माण होणारी ही मानसिक चौकट केवळ त्या एका मुलापुरती मर्यादित राहत नाही, तर संपूर्ण कुटुंबातील भावनिक संतुलन बिघडवू शकते. म्हणूनच गोल्डन चाईल्ड सिंड्रोम म्हणजे नेमकं काय, त्याची लक्षणं, कारणं आणि त्यातून निर्माण (how golden child syndrome destroys families) होणारे दुष्परिणाम समजून घेणं आज अत्यंत गरजेचं ठरत आहे.
गोल्डन चाईल्ड सिंड्रोम म्हणजे नेमकं काय ?
'गोल्डन चाईल्ड' म्हणजे असे मूल ज्याला पालक अगदी स्वतःचीच दुसरी प्रतिमा मानतात. हे मूल फक्त एक मूल नसून, ते पालकांच्या 'अहंकाराचे' प्रतीक बनलेले असते.
या सिंड्रोमची काही ठळक वैशिष्ट्ये....
१. जर मुलाने वर्गात पहिला क्रमांक पटकावला, तर पालकांना असे वाटते की जणू त्यांनीच यश मिळवले आहे.
२. या मुलाच्या प्रत्येक चुकीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते.
३. त्याच्या छोट्याशा यशाचेही मोठे भांडवल करून ते सर्वांना वाढवून सांगितले जाते.
४. त्या मुलाला सतत असे भासवले जाते की तो कुटुंबातील सर्वात खास आणि महत्त्वाचा घटक आहे.
अशा परिस्थितीत त्या मुलांची स्थिती नेमकी कशी होते ?
१. प्रत्यक्षात, त्या मुलावर नेहमी 'परफेक्ट' दिसण्याचे आणि वागण्याचे प्रचंड मानसिक दडपण असते.
२. त्याला स्वतःच्या मर्जीने जगण्याची परवानगी नसते; त्याला फक्त तेच करावे लागते ज्याने त्याचे पालक आनंदी होतील.
३. एखादी चूक होईल की काय, ही भीती त्याला सतत सतावत असते.
४. या सगळ्यात त्याची स्वतःची स्वतंत्र ओळख किंवा व्यक्तिमत्त्व कधीच तयार होऊ शकत नाही.
५. मोठी झाल्यावर अशी मुले अनेकदा चिंता आणि नैराश्यात जातात.
६. त्यांना सतत असे वाटते की जर आपण यशस्वी झालो नाही, तर कोणीही आपल्यावर प्रेम करणार नाही.
फक्कड मसाला चहा करण्याचं टपरीवाल्यांचं १ सिक्रेट, आलं-वेलची-चहामसाला, ‘असा’ करा मस्त चहा...
संपूर्ण घरांतील नातेसंबंधावर होतो वाईट परिणाम...
१. हा सिंड्रोम केवळ त्या एका मुलाचे आयुष्य खराब करत नाही, तर संपूर्ण कुटुंबाला वाळवीसारखा पोखरून काढतो.
२. जेव्हा एका मुलाला 'राजा' आणि दुसऱ्याला 'प्रजा' सारखी वागणूक दिली जाते, तेव्हा त्यांच्यातील प्रेमाची जागा मत्सर आणि द्वेष घेतो. यालाच 'सिब्लिंग रायव्हलरी' (Sibling Rivalry) म्हणतात, जी आयुष्यभर संपत नाही.
३. घरातील इतर मुले स्वतःला निरुपयोगी आणि कमी लेखू लागतात. यामुळे त्यांचा आत्मविश्वास पूर्णपणे नष्ट होतो.
४. अशा घरांमध्ये प्रेम हे 'अटींवर' आधारित असते. "जर तू चांगले काम केलेस, तरच आम्ही तुझ्यावर प्रेम करू" ही विचारसरणी नात्यांमधील ओलावा आणि जिव्हाळा संपवून टाकते.
यावर उपाय म्हणून पालकांनी काय करायला हवं ?
पालकांना हे समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे की मुले ही त्यांची 'ट्रॉफी' किंवा प्रदर्शनाची वस्तू नाहीत. प्रत्येक मुलाचे स्वतःचे गुण आणि दोष असतात. 'गोल्डन चाईल्ड सिंड्रोम' संपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे दोन्ही मुलांमध्ये समानता.
१. मुलांवर त्यांच्या यशासाठी किंवा त्यांनी केलेल्या उत्तम कामगिरीसाठी नाही, तर ते तुमचे मूल आहेत म्हणून, त्यांच्या 'असण्या'साठी प्रेम करा.
२. घराला स्पर्धेचे मैदान करु नका; त्याऐवजी घर म्हणजे मुलांसाठी एक सुरक्षित जागा म्हणून राहू द्या.
३. एका मुलाला विशेष आणि दुसऱ्याला दुय्यम लेखणे थांबवून, दोघांच्याही व्यक्तिमत्त्वाचा आदर करा.
