- निकिता परदेशी (समुपदेशक)
सैफ अली खानचा लेक इब्राहिम अली खान सध्या कायम सोशल मीडियात दिसतो. तरुण मुला-मुलींना आवडतोही. त्याचं दिसणं, तब्येत, लूक्स यांची चर्चा होते; पण त्यानं अलीकडेच एका मुलाखतीत सांगितलं की त्याचं लहानपण सोपं नव्हतं. त्याला बरेच दिवस कमी ऐकू यायचं. बोलण्यातही त्यामुळे अडचण यायची. शब्द फुटत नसत किंवा जरासा तोतरेपणाही होता. जन्मत: काविळीचं प्रमाण वाढलेलं असल्यानं त्याच्या ऐकणं आणि बोलणं या क्षमतांवर परिणाम झाला होता. वयाच्या १४ व्या वर्षी त्याला शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवण्यात आलं, तिथं एकटेपणामुळं त्याची ही समस्या बरीच वाढली होती. पुढे त्यानं व्यवस्थित स्पीच थेरपी घेतली, अनेकांकडे उपचार करून घेतले आणि त्यामुळे त्याचा तो त्रास कमी झाला. अजूनही त्यावर उपचार करून उच्चार, बोलणे सुधारेल यासाठी त्याचे प्रयत्न सुरूच असल्याचे त्यानं सांगितलं. या त्रासामुळं त्याला स्वत:सह इतर प्रश्नांशीही झगडावं लागल्याचं तो सांगतो(speech & hearing most common disorder in kids).
-कल्पना करा ज्यांच्याकडे सर्व आर्थिक सुविधा उपलब्ध असतात त्याही घरात मुलांना कमी ऐकू येणं, लवकर आणि नीट बोलता न येणं याविषयी प्रश्न निर्माण होतात. होईल वयासोबत बरं असं वाटतं; पण तसं नसतं, मुलांना नीट ऐकू न येणं ही समस्या मोठी आणि वेळीच लक्ष घालून सोडवण्याची आहे. नाही तर त्यामुळं त्यांच्या बोलण्यावर परिणाम होतो. आत्मविश्वासावर परिणाम होतो आणि इतरांशी जमवून घेणं, आपल्या वयाच्या मुलांसोबत जमवून घेणं, शिक्षण, अभ्यास या साऱ्यावर परिणाम होतो.
अनेक पालकांना अजूनही त्यातलं गांभीर्य समजत नाही. बरेच पालक तर आपल्या मुलाला असा काही त्रास नाही असाच विचार करून समस्या नाकारतात. त्यामुळं आपल्या मुलांना लहानपणी असा काही त्रास जाणवलाच तर वेळीच योग्य उपचार ही त्यांच्या भविष्यासाठी फार मोठी मदत आहे.