Join us

१८ ते २४ वयोगटातील तरुणांच्या हातातल्या स्मार्ट फोनने केला कहर, संशोधक म्हणतात मनाचे आजार...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2022 11:28 IST

२०१० नंतर आणि मुख्यत: कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले

ठळक मुद्दे२०१० नंतर आणि मुख्यत: कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले मनाने दुर्बलता येते आणि त्याचा परिणाम म्हणजे लहानसहान गोष्टींवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते

मोबाईल हा आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. आपल्यापैकी अनेकांचा सर्वाधिक वेळ हा मोबाईलवर जात असल्याने आपण आयुष्यातील इतर अनेक गोष्टींना मुकतो. आपल्यापैकी अनेकांचा दिवसातील सर्वाधिक वेळ हा स्मार्टफोनवर जात असल्याने मानसिक आणि शारीरिक तक्रारींचा सामना आपल्याला कमी वयातच करावा लागतो. सोशल मीडियाची विविध माध्यमे आणि त्याद्वारे जगाशी कनेक्ट राहताना आपला स्वत:शी आणि आपल्या जवळच्या लोकांशी असलेला कनेक्ट कमी होतो असे अभ्यासकांचे म्हणणे आहे. १८ ते २४ वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये स्मार्टफोन हातात असण्याचं प्रमाण खूप जास्त आहे. 

(Image : Google)

स्पेन लॅबने केलेल्या एका सर्वेक्षणानुसार, सतत स्मार्टफोन वापरल्याने या वयोगटातील मुले समाजापासून तुटल्यासारखी वागतात. याचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम होत असल्याचे या संशोधकांचे म्हणणे आहे. या लॅबमध्ये मुख्य संशोधक म्हणून काम करत असलेल्या तारा त्यागराजन म्हणतात, या वयोगटातील मुलांच्या हातात दिवसातील ८ ते १० तास मोबाईल असतो, त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष संवाद कमी होतो. एकदा मुलाने वयाची १८ वर्षे पूर्ण केली की त्याने जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबाला आणि मित्रमंडळी किंवा इतर लोकांशी प्रत्यक्ष संवाद करायला हवा आणि सोशल मीडियावरचा वेळ कमी व्हायला हवा. आपल्याकडे सध्या नेमके उलटे होते आणि त्याचा तरुणांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होतो. 

(Image : Google)

प्रत्यक्ष संवादामुळे मुलांना चेहऱ्यावरचे हावभाव, स्पर्श, देहबोली, भावनिक संवाद या गोष्टी समजतात. पण संवाद नसेल तर ते समाजापासून तुटलेले राहतात. त्यामुळे मनाने दुर्बलता येते आणि त्याचा परिणाम म्हणजे लहानसहान गोष्टींवरुन आत्महत्या करण्याचे प्रमाण वाढते. २०१० नंतर आणि मुख्यत: कोरोना काळात स्मार्टफोनच्या वापराचे प्रमाण तरुणांमध्ये वाढले आहे. त्यामुळे लोकांचे मानसिक स्वास्थ्य मोठ्या प्रमाणात बिघडल्याचे समोर आले आहे. ३४ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणावरुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या वापरामुळे तरुणांमध्ये नको ते विचार येणे, आत्मविश्वास, स्वत:विषयीचे मत, खऱ्या जगापासून असणारे तुटलेपण, नैराश्य, नातेसंबांधातील तणाव, इतर ताण, आत्महत्येची भावना यांसारख्या गोष्टींच्या प्रमाणात वाढ झाली. 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंस्मार्टफोन