आजकाल प्रत्येक घराघरात हमखास एक चित्र सारखं दिसतं ते म्हणजे लहान मुलं हातात मोबाईल घेऊन अंगठा वर - खाली फिरवत रिल्स पाहण्यात दंग असतात. एकामागून एक येणारे चटपटीत व्हिडिओ मुलांना एका वेगळ्याच काल्पनिक जगात घेऊन जातात. आजच्या डिजिटल युगात मोबाईल, टॅब आणि सोशल मिडियाचा वापर लहान मुलांच्या डेली लाईफस्टाईलचा भाग बनला आहे. विशेषतः रील्स पाहण्याची सवय अनेक मुलांना नकळतपणे लागते. काही सेकंदांचे व्हिडीओ, सतत बदलणारा कंटेंट आणि रंगीत दृश्ये यामुळे मुलांचे लक्ष पटकन वेधले जाते. परंतु ही सवय केवळ करमणुकीपुरतीच मर्यादित न राहता हळूहळू त्यांच्या वागण्या - बोलण्यात, अभ्यास आणि मानसिक आरोग्यावर देखील परिणाम होऊ लागतो(small kids watching reels disadvantages).
अनेक पालकांना वाटतं की मूल मोबाईलमध्ये व्हिडिओ पाहतंय म्हणजे ते शांत आहे, पण ही शांतता वादळापूर्वीची असू शकते. रिल्सची सवय ही फक्त वेळ वाया घालवणारी गोष्ट नसून, ती मुलांच्या स्वभावात बदल घडवणारी प्रक्रिया असते. यासाठीच, पालकांनी वेळेतच ही सवय मुलांना लागली आहे की नाही हे ओळखणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. मुलांमध्ये रिल्स पाहण्याची सवय (5 signs showing lack of attention in kids due to overuse of social media) कशी ओळखावी आणि त्याची सुरुवातीची लक्षणे कोणती, याबाबत जाणून घेणे आज प्रत्येक पालकासाठी गरजेचे आहे.
मुलांना सतत रिल्स पाहण्याची सवय लागली आहे हे कसे ओळखावे?
आजच्या डिजिटल युगात मुलांच्या हातात स्मार्टफोन असणे ही आता सामान्य बाब झाली आहे. इंटरनेट असो किंवा अभ्यास, जवळपास प्रत्येक गोष्टीसाठी मुले मोबाईलवरच अवलंबून राहू लागली आहेत. मात्र याच दरम्यान सोशल मीडियावरचे रील्स आणि शॉर्ट्स पाहण्यात मुलांचा मोठा वेळ जात असल्याचे दिसून येते. केवळ १५ ते ३० सेकंदांचे व्हिडीओ सतत पाहण्यामुळे मुलांना झटपट मनोरंजनाची सवय लागते आणि हीच सवय हळूहळू इन्स्टंट डोपामिन अॅडिक्शनमध्ये रूपांतरित होते.
दिसतात मुख्य ५ लक्षणं...
१. लक्ष केंद्रित न होणं :- सोशल मीडियावरचा कंटेंट इतक्या वेगाने बदलत असतो की मुलांचे लक्ष काही सेकंदांतच दुसऱ्या गोष्टीकडे वळते. त्यामुळे मुले सतत नवीन काहीतरी पाहण्याच्या शोधात असतात. जर तुमचे मूल गृहपाठ करताना किंवा तुमच्याशी बोलताना वारंवार मोबाईल तपासत असेल, खिडकीबाहेर पाहत असेल किंवा चुळबुळ करत असेल, तर हे लक्ष विचलित होण्याचे स्पष्ट लक्षण आहे. याचा अर्थ असा की मुलाची एका गोष्टीवर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करण्याची क्षमता कमी होत चालली आहे.
२. काम टाळण्याची सवय :- अटेन्शन स्पॅन कमी होण्याचे आणखी एक मोठे लक्षण म्हणजे काम पुढे ढकलणे. ज्या कामांसाठी थोडी मानसिक मेहनत घ्यावी लागते – जसे की गणिताचे प्रश्न सोडवणे किंवा अभ्यास – अशा वेळी मुले ती कामे टाळू लागतात. अशा वेळी त्यांचे मन ताणापासून पळ काढण्यासाठी सोशल मीडियाकडे वळते. “फक्त ५ मिनिटे रील्स पाहतो” असे म्हणत सुरुवात होते, पण हे ५ मिनिटे कधी तासांत बदलतात ते कळतही नाही. हीच सवय पुढे जाऊन मुलांच्या अभ्यासावर आणि मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम करू शकते.
ऐन चाळिशीत कँसर होण्याची ५ प्रमुख कारणं! दिवसभरात करताय 'या' चुका - दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात...
३. कामावर लक्ष केंद्रित न करता येणे :- रील्स आणि शॉर्ट्सपहाण्याच्या सततच्या सवयीमुळे मुलांची संयमशक्ती (पेशन्स) कमी होत चालला आहे. एखाद्या कामाचा निकाल ६० सेकंदांत मिळाला नाही, तर मुले लगेच कंटाळतात. मग ते गोष्ट ऐकणे असो, बोर्ड गेम खेळणे असो किंवा एखादा छोटा प्रोजेक्ट पूर्ण करणे असो – जर एका मिनिटापेक्षा जास्त वेळ लक्ष केंद्रित करता येत नसेल, तर हा मुलांवर डिजिटल ओव्हर - एक्सपोजरचा थेट परिणाम मानला जातो.
४. अभ्यासात अडथळा :- डीप रीडिंगसाठी शांतता आणि लक्ष स्थिर असण्याची गरज असते. मात्र सोशल मिडियाचे व्यसन लागलेली मुले अभ्यास वाचण्याऐवजी फक्त वरवर पहातात त्यामुळे शब्दांचा अर्थ समजण्यात, वाक्ये समजून घेण्यात अडचण येते. लेखन करतानाही त्यांचे लक्ष वारंवार भरकटते, ज्याचा परिणाम हस्ताक्षर, शब्दलेखन आणि व्याकरणातील चुका वाढण्यात दिसून येतो.
५. वेळेचे भान न राहणे :- मूल फोन हातात घेतल्यावर वेळेचे भान राहात नसेल तर यालाच 'टाइम ब्लाइंडनेस' असे म्हणतात. सोशल मीडियाचे अल्गोरिदम अशा पद्धतीने तयार केलेले असतात की वापरकर्त्याला वेळ कसा निघून जातो, हेच कळत नाही. त्यामुळे मुलांना ठरलेल्या वेळेचे भान राहत नाही आणि अभ्यास, खेळ तसेच झोपेच्या वेळेवरही त्याचा वाईट परिणाम होतो.
यावर उपाय म्हणून नेमकं काय करावं ?
या समस्येवर उपाय म्हणजे पूर्णपणे मोबाईल फोन वापरण्यावर बंदी घालणे नव्हे, तर मुलांना डिजिटल शिस्त शिकवणे गरजेचे असते.
१. नो-स्क्रीन झोन ठरवा :- जेवताना आणि झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन पूर्णपणे बंद ठेवा.
२. चांगल्या सवयी लावा :- पेंटिंग, वाचन, खेळ किंवा हस्तकला अशा अॅक्टिव्हिटीजला प्रोत्साहन द्या, ज्यामध्ये मुलांना जास्त वेळ लक्ष केंद्रित करावे लागते.
अशा छोट्या पण फायदेशीर सवयींमुळे मुलांना रिल्स आणि शॉर्ट्सच्या अतीवापरापासून दूर ठेवता येऊ शकते.
