Join us

'एकुलत्या एक' मुलांची घुसमट, एकेकटं लाडात वाढलेलं मूल मोठं होऊन आईबाबांना सांभाळतं का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2025 18:31 IST

single child responsibility towards parents : effects of being an only child : आई-वडील व त्यांचं एकुलतं एक अपत्य. या कुटुंबातली मुलं मोठी होतात, तेव्हा आपल्या 'एकुलत्या एक'पणामुळे अनेक प्रश्नांना सामोरी जातात.

 प्रियदर्शिनी हिंगे (स्त्री प्रश्नांच्या अभ्यासक)

“आई हॉस्पिटलमध्ये दाखल होती. बाबांना घरी ठेवून मी नोकरीवर गेले होते. संध्याकाळी घरी परतले तेव्हा ते चक्कर येऊन पडलेले होते. आजही तो क्षण मनात घर करून राहिला आहे. काही केल्या मला तो विसरता येत नाही. मी एक वाईट मुलगी आहे असं मला सतत वाटतं राहतं,” असं म्हणणारी साक्षी जोशी (वय ३२), आयटी (single child responsibility towards parents) क्षेत्रात काम करणारी एकुलती एक मुलगी.साक्षीसारखी असंख्य मुलं-मुली अपराधी भावनेने वावरतात. कारण? त्यांना त्यांच्या आई-वडिलांची काळजी तर घ्यायची आहे, मात्र ते जमत मात्र नाही. भारतातील कुटुंबव्यवस्था (effects of being an only child) झपाट्याने बदलत गेली. शहरात स्थायिक झालेली लहान कुटुंबं, करिअरला प्राधान्य देणारे आई-वडील व त्यांचं एकुलतं एक अपत्य हे आपल्या समाजाचं सद्य चित्र. या कुटुंबातली मुलं मोठी होतात, तेव्हा आपल्या 'एकुलत्या एक'पणामुळे अनेक प्रश्नांना सामोरी जातात.

उशिरा लग्न किंवा आई-वडिलांच्या काळजीने लग्नच न करण्याकडे ओढा, करिअरची ओढाताण आणि सामाजिक एकटेपणा... त्यांच्या घुसमटीची कारणं अनेक!भारतीय जनगणनेनुसार २०२१ पर्यंत शहरी भारतात प्रत्येक ५ पैकी एका कुटुंबात एकच मूल आहे, तर नॅशनल सॅम्पल सर्व्हे (NSS) च्या २०१९ च्या अभ्यासानुसार, ८४% एकुलती मुलं त्यांच्या वृद्ध पालकांची काळजी एकट्यानेच घेतात. त्यात बहुतांश वेळा, विशेषतः मुलींना, आपलं करिअर मागे ठेवावं लागतं. आई-वडिलांच्या औषधोपचारांपासून, डॉक्टरांच्या भेटी, इन्शुरन्स क्लेम्स, आर्थिक नियोजन आणि आई-वडिलांची मानसिक गरज या सर्व जबाबदाऱ्या या एकेकट्यांच्याच खांद्यावर येतात. हे करत असताना करिअर आणि व्यक्तिगत नात्यांतील झगडा असतोच.

लिंक्डइनच्या २०२१ च्या सर्व्हेनुसार, ३० वयोगटातील ३८ % व्यावसायिकांनी पालकांच्या काळजीसाठी पदोन्नती किंवा नोकरी नाकारली. त्यात एकुलत्या मुलांचं प्रमाण अधिक आहे. काही कंपन्या 'फॅमिली लिव्ह', 'केअरगिव्हर सपोर्ट' अशा योजना राबवतात, पण प्रत्यक्षात फार कमी लोकांना त्याचा लाभ होतो. तेही काही ठराविक क्षेत्रात; त्यामुळे अनेकांना करिअर आणि कुटुंब यामध्ये निवड करावी लागते आणि ती निवड नेहमी मनःपूर्वक होतेच असं नाही. उतारवयातल्या आई-वडिलांची काळजी नाकारून ही (एकेकटी) मुलं आपल्याच करिअरचा विचार करतात, म्हणून या मुलांना आपला समाज लगेच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करतो. पालकही हा विषय समजून घेऊन बोलण्याच्या मनःस्थितीत असतातच असं नाही. वयानुसार किंवा बऱ्याचदा पालकांचा स्वभाव चिडचिडा होतो. या टप्प्यात येणाऱ्या अडचणींचा सामना करण्याची मुलांची तयारी नसेल, तर सर्व गणितं बिघडतात आणि त्याचा फटका सर्वांनाच बसतो. यातून तयार होणारा 'गिल्ट' हा सांगायचा कोणाला? सोबतीला, आधाराला भावंडंही नसतात.“आम्ही आयुष्यभर खस्ता खाल्ल्या त्या तुझ्यासाठी” हे पालकांचं वाक्य सातत्याने कानावर पडणारा तो एकुलता एक मुलगा किंवा मुलगी खचून जातात. मुलगा असेल तर लग्न केल्यावर “ही तुझी जबाबदारी” असं पत्नीला सांगून मुलगे यातून मोकळे होतात. सुनांना ही जबाबदारी झटकता येत नाही. मग ताण वाढतो आणि शेवटी कुटुंब कलह सुरू होतो. अनेकदा मुली मात्र आपल्या पालकांच्या घराजवळच आपलं घर घेऊन त्यांची जबाबदारी घेतात; पण त्यांचा जोडीदार या जबाबदारीत सहभागी नसेल, तर सासरची व माहेरची जबाबदारी पेलता पेलता त्या खचून जातात.“चहा घेतल्याशिवाय मला दिवस सुरू करता येत नाही, ती स्वयंपाकीण उशिरा येते आणि चहा अगदी पाणचट बनवते, तुझ्या हातच्या चहाची चव त्याला नाही,” हे दोन मुलांच्या शाळेची तयारी करणारी मुलगी जेव्हा ऐकते, तेव्हा आपण आपल्या एकट्या राहणाऱ्या ८० वर्षीय वडिलांची इच्छा पूर्ण करू शकत नाही, या अपराधी भावनेतून ४० वर्षांच्या मुलीचे डोळे भरून येतात. अशा परिस्थितीत नेमकं कोण बरोबर आणि कोण चूक हे शोधण्यापेक्षा यावर काय उपाय शोधता येईल, याकडे पाहायला हवं. हे सत्य स्वीकारून समाजाने, सरकारी धोरणांनी आणि कार्यालयीन व्यवस्थांनी एकुलत्या मुलांच्या हक्कांना आणि गरजांना महत्त्व देणं आवश्यक आहे. सहकार्य, समजूत आणि आधार यामुळे ही लढाई थोडी सुसह्य नक्कीच होऊ शकते.

कसा काढता येईल?

1. वडिलधाऱ्यांसोबत सुरुवातीपासूनच खुली चर्चा करत राहा.2. त्यांच्या आर्थिक-वैद्यकीय गरजांबद्दल स्पष्ट भूमिका घ्या. चांगली सपोर्टिंग सिस्टम तयार करा.3. ऑनलाइन सेवा आणि तंत्रज्ञान वापरणं उपयुक्त ठरेल.4. शक्य तिथे कामाच्या ठिकाणी लवचिकता मिळेल का पाहा.5. मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करता समुपदेशकांशी बोलणं, थेरपी घेणं मुलं आणि आई-वडील दोघांसाठीही गरजेचं आहे.6. सरकारनेही येणाऱ्या प्रश्नाच्या स्वरूपाचा अंदाज घेत कम्युनिटी किचन, कम्युनिटी लिव्हिंग यावर विचार करायला हवा.एकुलता एक असणं ही केवळ कौटुंबिक रचना नाही, ती एक भावनिक अवस्था आहे. कधी खंबीर, कधी थकलेली.priya.dhole@gmail.com

English
हिंदी सारांश
Web Title : Only children's struggles: Can they care for aging parents alone?

Web Summary : The increasing number of only children face immense pressure caring for aging parents. They grapple with career sacrifices, emotional burdens, and societal expectations. Support systems, open communication, and flexible work policies are crucial to alleviate their struggles.
टॅग्स :पालकत्वलहान मुलं