सध्याच्या काळात स्त्री प्रेग्नंन्ट असताना, बाळाचा सर्वांगीण विकास आणि व्यवस्थित वाढ होण्यासाठी खूप काळजी घेतली जाते. इतकंच नाही तर याचबरोबर खास बाळ व आई यांचे आरोग्य व इतर गोष्टींच्या चांगल्या विकासासाठी गर्भ संस्कार किंवा यांसारख्या वेगवेगळ्या अनेक गोष्टी केल्या जातात. यापैकीच गर्भधारणे दरम्यान गाणी गाणे, ऐकणे ही देखील त्यापैकीच एक नॅचरल थेरपी...'गर्भधारणा' हा प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा काळ असतो. या काळात आईने घेतलेली प्रत्येक काळजी, तिचे बोलणे आणि तिचे विचार थेट बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करतात. गर्भधारणेदरम्यान आईने गाणे गाणे किंवा संगीत ऐकणे हे फक्त आईच्याच नाही, तर बाळाच्या भावनिक आणि शारीरिक विकासासाठी ही एक फायदेशीर आणि नैसर्गिक 'थेरपी' ठरते(Singing during pregnancy benefits).
आईच्या आवाजातील गोडवा आणि गाण्यांचे शांत करणारे स्वर गर्भाशयातील बाळाला सुरक्षिततेची भावना देतात. आईच्या गाण्यामुळे बाळाच्या ऐकण्याच्या क्षमतेला आणि भाषा केंद्रांना उत्तेजन मिळते, ज्यामुळे बाळाच्या मेंदूचा लवकर विकास होण्यास मदत होते. तसेच, जन्मानंतरही हे गाणे आई आणि बाळाच्या नात्याला अधिक घट्ट करते. गर्भवती आईने रोज हलकी, मधुर गाणी गाणं किंवा ऐकणं हे केवळ तिला रिलॅक्स करत नाही, तर बाळाच्या मानसिक, भावनिक आणि मेंदूच्या विकासासाठीही खूप फायदेशीर ठरते. गर्भधारणेदरम्यान आईने गाणी का गावीत, याचे फायदे काय आहेत आणि या साध्या कृतीमुळे बाळाच्या आरोग्यावर व भावनिक कल्याणावर (music therapy for pregnant women) नेमका कसा सकारात्मक परिणाम होतो, याबद्दलची अधिक माहिती घेऊयात...
गर्भधारणेदरम्यान आईने गाणी का गावीत, याचे फायदे नेमके काय...
'The Brain Maze' या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेली माहिती तसेच या विषयावर 'युनिव्हर्सिटी ऑफ बार्सीलोना' यांनी केलेल्या अभ्यासानुसार, गर्भावस्थेत असताना आणि बाळाच्या जन्मानंतर त्याला गाणे ऐकवल्याने बाळाच्या मेंदूचा विकास आणि एकूणच व्यक्तिमत्वावर सकारात्मक परिणाम होतो, हे सिद्ध झाले आहे.
१. गाण्यामुळे गर्भाचे ऐकण्याची शक्ती आणि भाषा केंद्रे यांचा विकास उत्तम पद्धतीने होतो. ज्यामुळे बाळाला आईच्या आवाजाशी आणि ध्वनीच्या नमुन्यांशी लवकर ओळख निर्माण करण्यास मदत होते. बाळ आईच्या आवाजातील स्वर आणि ध्वनी नमुने गर्भाशयात असतानाच ओळखायला लागते, ज्यामुळे जन्मानंतर भाषा शिकण्याची प्रक्रिया सोपी होते.
२. बाळासोबतच आईला देखील याचा खूप फायदा होतो. गाणी गाण्यामुळे आईचा स्ट्रेस आणि चिंता कमी होते, ज्यामुळे अधिक शांत आणि आरोग्यदायी गर्भधारणा होते.
३. जन्मानंतर, पालकांनी गायलेल्या गाण्यामुळे बाळाला शांतता मिळते, त्याच्या भावना स्थिर होतात आणि पालकांशी असलेले नाते अधिक मजबूत होण्यास मदत मिळते. गर्भधारणेदरम्यान गाणे गाण्याची सवय आई आणि बाळाचे नाते जन्म होण्यापूर्वीच घट्ट करते. जन्मानंतर जेव्हा आई तेच गाणे गाते, तेव्हा बाळ लगेच शांत होते, कारण त्याला तो आवाज आणि ती चाल ओळखीची वाटते.
४. आईचा आवाज बाळासाठी सर्वात शांत आणि सुरक्षित ध्वनी असतो. जेव्हा आई गाते, तेव्हा बाळाला गर्भाशयात असतानाच शांतता आणि सुरक्षिततेची भावना अनुभवायला मिळते.
५. आई शांत आणि आनंदी राहिल्यास, तिच्या शरीरातून स्रवणारे हॅप्पी हार्मोन्स बाळापर्यंत पोहोचतात, ज्यामुळे आरोग्यदायी व हेल्दी पद्धतीने गर्भधारणा होते.
६. अभ्यासातून हे समोर आले आहे की, शांत संगीत किंवा गाणे ऐकल्याने नवजात बाळाची झोपण्याची पद्धत सुधारते. तसेच, गाण्यामुळे बाळाची हृदयाची गती आणि पचनक्रिया स्थिर ठेवण्यास मदत होते.
