पॅरेण्टिंग स्टाईल हल्ली खूप बदललेली आहे. २० वर्षांपुर्वी ज्या पद्धतीने मुलांना सांभाळलं जायचं किंवा मुलं जशी मोठी व्हायची तशी आताची पिढी नाही. त्यामुळे मुलांना समजून घेणं, त्यांना वाढवणं, करिअरमध्ये एका यशस्वी टप्प्यावर त्यांना आणून ठेवणं या प्रत्येकामध्ये पालकांची भूमिका खूप मोठी आणि क्लिष्ट झाली आहे. पालकांच्या कोणत्याही लहानशा कृतीचा मुलांवर काय परिणाम होईल किंवा पालकांची कोणती गोष्ट मुलं कोणत्या पद्धतीने घेतील हे काही सांगता येत नाही. याविषयीच सांगते आहे भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झा..(Sania Mirza Shard Her Parenting Tips)
Serving It Up With Sania या पॉडकास्टमध्ये फुटबॉलपटू सुनील छेत्री यांनी सानियाची मुलाखत घेतली. यामध्ये तिला पालकत्त्वाविषयी प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी ती म्हणाली की तिच्या मुलासोबत ती वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळते. मग त्यापैकी काही मैदानी खेळ असतात तर काही बैठे खेळ.
आता सर्वसामान्य पालकांची अशी मनस्थिती असते की ते जेव्हा मुलांसोबत खेळतात तेव्हा ते जाणूनबुजून हरतात आणि मुलांना ते जिंकल्याचा आनंद मिळवून देतात. नेमका याच गोष्टीला सानियाने विरोध केला आहे. ती म्हणते की मुलांशी खेळताना तुम्ही वारंवार स्वत:हून हरू नका. यामुळे मुलांना नेहमी जिंकण्याचीच सवय लागते आणि मग जेव्हा खऱ्याखुऱ्या खेळात ते हरतात तेव्हा तो पराभव पचवणं कठीण होतं.
त्यामुळे मुलांशीही नेहमीच प्रतिस्पर्धी असल्यासारखे खेळा. ते चांगले खेळले तर नक्कीच त्यांचं मोकळ्या मनाने कौतूक करा. पण ते हरले तर मात्र खूप समजुतीने घ्या आणि त्या पराभवातून त्यांना त्यांची चूक कुठे झाली, हे समजावून सांगा. यामुळे ते आपलाही पराभव होऊ शकतो, हे स्विकारतील.
मनाने पक्के होत जातील आणि हळूहळू आत्मविश्वासही वाढत जाईल. ही गोष्ट खरोखरच पालकांनी लक्षात ठेवण्यासारखीच आहे. कारण काही मुलांच्या बाबतीत आपण असं बऱ्याचदा पाहातो की खेळात समोरचा व्यक्ती जिंकत आल्याचं पाहून मुलांची चिडचिड सुरू होते, ते चिटिंग करायला सुरुवात करतात किंवा मग खेळ अर्धवट सोडून निघून जातात. अशा पद्धतीने आपल्याही मुलाने वागू नये असं वाटत असेल तर सानियाने दिलेला सल्ला पालकांनी गांभिर्याने घ्यायलाच हवा...
