प्रियांका गायधनी (समुपदेशक)
मुलं मोठी होतात. तसे पालकांना बाकीचे लोक घाबरवू लागतात की, आता टीनएज सुरू होणार तुमच्या घरात... इतके दिवस बरं होतं, आता पाहा मुलं कशी वागू लागतील. मग आई-वडीलही जरा बारकाईनं पाहू लागतात. १२/१३ वर्षांचा मुलगा कधी एकदम लहान मुलासारखा वागतो तर कधी एकदम मोठ्यांसारखा.मुलगी वयात यायला लागते, काही बोलावं तर एकदम चिडते-रडते.(parenting tips, Why do teenagers fight with their parents, why are they constantly so angry and frustrated?)कधी पालकच त्यांना सांगतात की, ‘आता तू मोठा झाला आहेस’ किंवा मुलींना म्हणतात, ‘आता मोठी झालीस तू, पाळी यायला लागली. आता शहाण्यासारखं वाग.’ आणि मुलं म्हणतात की, ‘आम्ही मोठे आहोत, आम्हाला लहानांसारखं सतत सूचना देऊ नका.’त्यावरून वाद व्हायला लागतात. काही घरांत तर मोबाइलवरुन सतत वाद होतात. जरा हातातला स्क्रीन बाजूला केला की मुलं चिडतात. वैतागतात. आईबाबा काहीही बोलले तरी त्यांना राग येतो.
मुलं अशी का वागतात? का चिडतात?
१. काही मुलं अतिक्रियाशील म्हणजे हायपर ॲक्टिव्ह असतात. अशा मुलांच्या वागण्यात कधी मोठं कधी लहान अशी अदलाबदल सारखी पाहायला मिळते.२. काही मुलं सतत गोंधळलेली असतात. मोठं होताना त्यांनाही नेमकं आपलं काय बदलतं आहे, हे चटकन कळत नाही.३. काही मुलांना मोठ्या मुलांसारखंच वागावंसं वाटतं, त्यांना आपण आता मोठे झालो आहोत, या भावनेनं बरं वाटतं.४. मुलींना मासिक पाळी सुरू होणं, मुलांचा आवाज बदलणं, हे सारे बदल त्यांच्यासाठीही अवघडच असतात. पण नीट सांगता येत नाहीत.५. काही मुलं वेळेवर झोपत नाहीत. कमी झोप झाल्यानंही मुलं हट्टी, रडी, चिडकी होतात.
अशावेळी...१. पालकांनी मुलांना सतत सूचना देऊ नये. जरा त्यांचं ऐकायची सवय करावी. ओळखावं की, नेमका कशाचा त्यांना त्रास होत असेल.२. शरीरात होणाऱ्या बदलांविषयी मोकळेपणानं बोलावं. शास्त्रीय माहिती द्यावी, भीती घालू नये.३. वयात येतानाचा काळ मुलांसाठीही थोडा कठीण असतो, हे पालकांनीही समजून घेऊन संवाद सुरू ठेवावा. दोषारोप टाळावे.४. मुलांना आनंदच नाही तर आव्हान वाटेल, काही ॲडव्हेंचर वाटेल अशा उपक्रमात भाग घेऊ देणंही या वयात सेंस ऑफ अचिव्हमेंटसाठी महत्वाचं असतं.