डॉ. लीना मोहाडीकर
तारुण्यात प्रवेश केलेल्या मुलींच्या मानसिकतेत मुलांपेक्षा बरीच तफावत असते. वयात येणाऱ्या बहुतेक मुली स्वतःच्या कल्पनेतल्या ‘परिकथेतील राजकुमारा’ बद्दलची शृंगार स्वप्न बघण्यात गुंग असतात. बरोबरच्या मुलांबद्दल सुद्धा आकर्षण वाटत असतं. उत्तेजना वारंवार वाढत जाऊ लागल्या की काहीजणी स्वतःच्या लैंगिक अवयवांना स्पर्श करून आनंद मिळवतात. सहसा मुली ते कोणाला सांगत नाहीत. त्यातही महिलांच्या हस्तमैथुनाविषयीचे गैरसमज मुलींमध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. हस्तमैथुनाने स्त्रीत्व कमी होईल, तोंडावर मुरूम येतील, वंध्यत्व येईल वगैर वगैर. अनेकदा क्लिनीकमध्येही अशाप्रकारचा सल्ला घ्यायला मुली येतात. पण लैंगिकता शिक्षण देताना अशा हस्तमैथुनातील निर्धोकता मुलींनाही समजावणं आवश्यक आहे.
तरुणींच्या मनात सेक्सबद्दलची भावना जागृत होत असली तरी बहुतेकींना त्याची भीती वाटते किंवा तेवढं धैर्य होत नाही. पण आपल्या सौंदर्याचं इतर तरुणांनी कौतुक करावं ही उर्मी त्यांच्यात उसळत असतेच. चित्रपटातील अगदी कोवळ्या तरुण-तरुणींचे प्रेमप्रसंग बघून काही मुली बिनधास्त होतात आणि मग मुलांबरोबर फिरायला जाणं, पब मध्ये जाऊन धमाल करणं, सहली, पार्ट्या यात मुलांबरोबर बाह्य शृंगार आणि मग शरीर संबंध असं घडू शकतं. त्यातून गर्भधारणा झालीच तर मग साहजिकच गर्भपाताचा पर्याय स्वीकारला जातो.
(लेखिका लैंगिकतातज्ज्ञ आहेत.)