Join us

Monsoon picnic : पावसात स्वत:सह मुलांचा जीव धोक्यात घालणारे पालक, पावसाळी सहलीलाच जाताय की..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2025 17:30 IST

Monsoon picnic and risk in rainy season, how to take care : Monsoon picnic : पावसात भिजायला जावं, सहलीला जावं असं वाटण्यात चूक नाही, पण कुटुंबाचाही विचार करा.

-आदित्य घोडके (गिर्यारोहक)

आला आला वारा, संगे पावसाच्या धारा..असं वातावरण सध्या आहे. पावसाळी पर्यटन वाढलेले आहे. भर पावसात अनेकजण डोंगरदऱ्यात फिरायला जातात. धबधब्यांखाली डुंबतात. सारं छानच असतं, पण अचानक दुर्घटनेची बातमी येते आणि भीती दाटून येते. पावसाळी पर्यटन, गडकिल्ल्यांवर लांबच लांब रांगा, लहान लेकरांना घेऊन जाणारे पालक हे सारं धास्ती वाटावी असंच आहे. पावसात भिजावं, फिरावं असं वाटणं चूक नाही, पण अतिधाडस जिवावर बेतू शकतं.योग्य ती काळजी घेतली, आपल्या जवळपासच्या सुरक्षित जागी जाऊन शांतपणे खबरदारी घेऊनच काही गोष्टी केल्या तर धोका कमी होतो.(Monsoon picnic and risk in rainy season, how to take care)

 

 

पावसात फिरायला जाताना काय काळजी घ्यायला हवी?

१. धोक्याच्या जागा, ओढ असलेलं पाणी, इथं जाणंच टाळायचं. समजा गेलेच पाणी लांबून पाहायचं. सुरक्षित जागा सोडायची नाही. स्थानिकांचं ऐकायचं. धोक्याच्या पाट्या वाचायच्या. काही नाही होणार हा भ्रम सोडून द्यायचा.२. खूप धुकं असेल, दृश्यमानता कमी असेल तर जायचं नाही. रात्री तर नाहीच नाही, अन्यथा वाट चुकण्याची, पाय घसरण्याची भीती असते.३. पावसामध्ये सर्वांत जास्त आकर्षण असते ते धबधबे आणि प्रवाहांचे, पण ते लांबून पाहावे, जवळ जाऊ नयेच.

४. माहितगार व्यक्तीसोबतच फिरायला जा, स्थानिक गाईड सोबत घ्या. त्यांचं ऐका.५. मुलांनाही शिकवा की निसर्गाचा आदर कसा करायचा. काही तोडायचं नाही, मोठ्यानं ओरडायचं नाही, पळायचं नाही.६. बूट चप्पल चांगले वापरा.७. आपल्या सुरक्षिततेपेक्षा महत्त्वाचं काही नाही. तेच आपण आपल्या मुलांनाही शिकवलं पाहिजे. निसर्ग सुंदर आहेच, तो लांबून शांतपणे अनुभवावा.८. पावसात अचाट साहस, धाडसाच्या नावाखाली चुकीच्या गोष्टी अजिबात करू नयेत. मुलं पालकांना पाहून शिकतात त्यामुळे पालकांनीच सजग राहावं.९. गर्दी हमखास होते त्यादिवशी पावसाळी सहलीला जाणं टाळावं.१० दर सुटीच्या दिवशी जायलाच हवं पावसात असं नाही. कधीतरी रजा घेऊन गर्दी नसेल त्यादिवशी, नीट माहिती काढून खबरदारी घेऊन जाणंच उत्तम.

टॅग्स :पालकत्वट्रेकिंगपाऊसमोसमी पाऊस