Join us
Daily Top 2Weekly Top 5

टॉपर मुलांना जास्त छळते Anxiety, पालक आणि शिक्षकांची चूक-६ गोष्टी वाढवतात मुलांचं जीवघेणं प्रेशर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2026 17:18 IST

Mistakes of parents and teachers-6 things increase the pressure and anxiety in topper students : अभ्यात हुशार मुलांच्या मनात या गोष्टींमुळे निर्माण होते एंक्झायटी.

अनेकदा असं गृहीत धरलं जातं की हुशार, टॉपर किंवा कायम चांगले गुण मिळवणारे विद्यार्थी मानसिकदृष्ट्या खूप मजबूत असतात. त्यांना भीती, असुरक्षितता किंवा एंक्झायटी काहीही होत नाही. पण ही समजूत चुकीची आहे. शैक्षणिकदृष्ट्या उत्तम कामगिरी करणारे विद्यार्थीही मोठ्या प्रमाणावर एंक्झायटीचा सामना करत असतात. फरक इतकाच की त्यांची चिंता बहुतेक वेळा दिसून येत नाही. ती आतल्या आत वाढत जाते.  आणि तज्ज्ञ सांगतात की हादेखील एक काळजीचा विषय आहे.

प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. चांदनी तुगनैत यांनी हिंदूस्तान हिंदीला दिलेल्या माहितीनुसार टॉपर विद्यार्थ्यांमध्ये एंक्झायटीचं पहिलं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे सतत चांगली कामगिरी करण्याचा दबाव. एकदा 'टॉपर'चा टॅग लागला की त्याच्याकडून अपेक्षा वाढतात. अपेक्षांचं ओझं होतं. शिक्षक, पालक आणि कधी कधी तो स्वतःही "यावेळी कमी गुण आले तर?" या भीतीत राहतो. ही भीती अपयशाची नसून, स्व प्रतिमा ढासळण्याची असते आणि त्यामुळे मनावर मोठा ताण येतो.

दुसरं कारण म्हणजे परफेक्ट इमेजच्या नावाखाली वाढणारी चिंता. अनेक हुशार विद्यार्थी स्वतःकडून फार जास्त अपेक्षा ठेवतात. चूक होणं, मागे पडणं किंवा सरासरी कामगिरी करणं त्यांना मान्य नसतं. प्रत्येक गोष्ट उत्तमच हवी, ही मानसिकता हळूहळू एंक्झायटीत रुपांतरित होते. थोडीशी चूकही त्यांना मोठं अपयश वाटू लागते. 

तिसरं कारण म्हणजे सतत तुलना होणं. टॉपर विद्यार्थ्यांची तुलना इतरांशी, मागील निकालांशी किंवा भविष्यातील स्पर्धकांशी केली जाते. ही तुलना इतरांमध्ये आणि त्या मुलामध्ये दुरावा निर्माण करते. एकतर त्याचे रुपांतर अहंकारात होते नाहीतर एकटेपणात.  

चौथं कारण म्हणजे पालक आणि समाजाच्या अपेक्षा. अनेकदा पालक नकळत मुलांवर आपल्या स्वप्नांचं ओझं टाकतात. 'तूच आमची आशा आहेस' हे वाक्य मुलाला किती निराशा देतं याचा त्यांना अंदाजच नसतो. अशी वाक्ये विद्यार्थ्यांच्या मनात भीती निर्माण करतात. समाजात मिळणारी प्रशंसा टिकवून ठेवण्याचं दडपणही एंक्झायटी  वाढवू शकतं. 

पाचवं कारण आहे भविष्याबद्दलची अनिश्चितता. आज चांगले गुण मिळाले तरी पुढे योग्य कॉलेज, करिअर, नोकरी मिळेल का याची खात्री नसते. 'जर सगळं बिनसलं तर?' हा विचार हुशार विद्यार्थ्यांनाही सतावत राहतो आणि सतत चिंता निर्माण करतो.

सहावं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे आतून असुरक्षित वाटणं. बाहेरून आत्मविश्वासू दिसणारे अनेक टॉपर विद्यार्थी आतून स्वतःबद्दल शंका धरुन असतात. 'माझं यश खरंच माझ्या कुवतीमुळे आहे का?' किंवा 'पुढच्यावेळी मी हे टिकवू शकेन का?' असे प्रश्न त्यांच्या मनात सतत फिरत राहतात. यालाच मानसशास्त्रात ‘इम्पोस्टर सिंड्रोम’ म्हणतात, जो एंक्झायटीला खतपाणी घालतो. 

डॉ. चांदनी तुगनैत यांच्या मते, एंक्झायटी  ही फक्त कमकुवतपणाची खूण नाही, तर ती जास्त जबाबदारी, जास्त अपेक्षा आणि जास्त विचार करण्याचाही परिणाम असू शकते. त्यामुळे हुशार विद्यार्थ्यांकडे फक्त त्यांच्या गुणांसाठी न पाहता, एक विद्यार्थी म्हणून पाहणे गरजेचे आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Anxiety torments toppers; parents', teachers' mistakes increase children's deadly pressure.

Web Summary : Toppers face anxiety due to performance pressure, perfectionism, and constant comparisons. Parental expectations, future uncertainties, and self-doubt worsen the issue. They need understanding, not just focus on grades. Recognize their struggles beyond academic achievements.
टॅग्स :पालकत्वपरीक्षासोशल व्हायरलविद्यार्थी