Join us  

लग्नानंतर १८ वर्षे वाट पाहिली, आता आईबाबा झालो! अपूर्व अग्निहोत्री सांगतो, मनातली सल, लोकांचे टोमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2023 11:56 AM

Journey of Apurva Shilpa Agnihotri become Parents After 18 Years : शिल्पा आणि अपूर्व अग्निहोत्रींनी लग्नानंतर १८ वर्षे आईबाबा होण्याची वाट पाहिली, आता त्यांची लेक घरी आल्यावर ते सांगतात आपण काय काय सोसलं.

मूल व्हावं म्हणून १८ वर्षे त्या दोघांनी वाट पाहिली. वैद्यकीय मदत घेतली पण यश आलं नाही. शेवटी जशी देवाची इच्छा म्हणून त्यांनी प्रयत्न सोडून दिले. हताश वाटत होतंच, पण मूल हवं ही भावना मात्र दोघांनाही अस्वस्थ करत होती. म्हणून मग त्यांनी मूल दत्तक घेण्याचा निर्णय घेतला आणि लग्नानंतर १८ वर्षांनी त्यांची लेक घरी आली. इशानी तिचं नाव. अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि शिल्पा सकलानी यांचा आईबाबा होण्याचा हा प्रवास. लेक घरी आली डिसेंबरमध्ये आता इतक्या दिवसांनी अपूर्वनेही गुड न्यूज शेअर केली आहे आणि आपण आईबाबा होताना काय काय सोसलं याची गोष्टही सांगितली आहे. (Journey of Apurva Shilpa Agnihotri become Parents After 18 Years).

अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानी ही छोट्या पडद्यावर गाजलेली जोडी. या दोघांनी २००४ मध्ये लग्नगाठ बांधली. त्या दोघांनाही मूल हवंच होतं. शिल्पा तर आईपणाच्या अनुभवासाठी आसूसलेली होती असं अपूर्व सांगतो. पण लग्नानंतर एक ना दोन १८ वर्षे वाट पाहिली तरी त्यांना मूल झालं नाही.  आता त्यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे. ईशानी असं तिचं नाव.  लेक घरी आली. वयाच्या ५० व्या वर्षी अपूर्व बाप झाला आणि त्यानं आपला हा आनंद एक व्हिडिओ शेअर करत वाटूनही घेतला. याशिवाय ‘टाइम्स ग्रुप’शी बोलताना हा १८ वर्षांचा प्रतीक्षाकाळ आपल्यासाठी किती अवघड होता याची वेदनाही अपूर्वने सांगितली आहे. 

(Image : Instagram)

अपूर्व सांगतो, कितीतरी जण या वेदनेतून जातात. मूल हवं असतं पण होत नाही, अपडाऊन होतात. वेदना होतात. काळीज तुटतं. कितीदा आपण आशा लावून बसतो आणि अपयशच येतं. दोष तरी कुणाला देणार? तक्रार तरी किती करणार? आपल्या अवतीभोवतीची माणसं आपलं भलंच चिंततात पण त्यांचाही एकच प्रश्न असतो का होत नाही मूल? काय सांगणार? ते प्रश्न छळतात. मनातला यातना होतात. अजून निगेटिव्ह वाटतं. आपल्यात काहीतरी उणीव आहे असं वाटतं. सगळं आहे आपल्याकडे पण पोकळी जाणवते. हे सारं आम्हीही सोसलं. शेवटी देवावर सोडून दिलं. स्वीकारलं जे आहे ते. लोकांकडे आहे ते आपल्याकडे नाही असं वाटून किती तक्रार करणार? दहापैकी ६ गोष्टी तर देवानं दिल्या, त्याचे आभार मानून शेवटी आम्ही वास्तव स्वीकारलं.

(Image : Instagram)

मूल दत्तक घ्यायचं ठरवलं, त्यानंतरही वाट पाहिली. आणि शेवटी देवानं आमचं ऐकलं, आमची लेक घरी आली.मूल होत नाही, कितीदा अपयश येतं, आईबाबा होण्यासाठी आसूसलेली जोडपी मोडून पडतात. इतरांचे टोमणे ऐकतात.ते सारं किती अवघड असतं याची व्यथाच अपूर्वने मांडली आहे. दत्तक आईबाबा होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आणि आनंदानं लेकीसोबत आता नव्या आयुष्याला सुरुवात केली आहे.

(Image : Instagram)

टॅग्स :पालकत्वसोशल मीडियाप्रेग्नंसीसोशल व्हायरललहान मुलं