Join us  

मुलांना सतत सर्दी-कफ होतो, प्रतिकारशक्ती कमी पडते? डॉक्टर सांगतात, यामागचं नेमकं कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2023 10:08 AM

Is It Normal to Have Repeated Cough Cold in Children : सतत सर्दी-कफ होतो म्हणजे मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते?

ठळक मुद्देएखादा व्हायरस शरीरात गेला की मुलं त्याच्याशी प्रतिकार करतात तेव्हा त्यांना सर्दी-कफ होतो. . कफामुळे पुरेसा श्वास घेता येत नसल्याने मुलं अस्वस्थ होतात आणि मग कुरबूर करतात.

जरा हवा बदलली की मुलांना सर्दी आणि कफ होतो. इतकेच नाही तर डे केयर किंवा शाळेत जायला लागल्यावर मुलांना एकमेकांच्या वासानीही लगेच सर्दी होते नाहीतर ताप येतो. मुलं महिन्यातून २ वेळा तरी सर्दी-खोकल्याने किंवा तापाने आजारी असतात. सतत आजारी पडतात म्हणजे आपल्या मुलाचे नीट पोषण होत नाही, त्याची प्रतिकारशक्ती इतर मुलांपेक्षा कमी आहे अशी चिंता पालकांना सतावते. मग मुलांना मागे लागून खूप खायला देणं, मुलांना सतत सर्दी होते म्हणून डॉक्टरांकडे नेणं किंवा त्यांची प्रमाणापेक्षा जास्त काळजी घेणं असं काही ना काही पालक करत राहतात. प्रतिकारशक्ती कमी असल्याने मुलं सारखी आजारी पडतात मग ती वाढवण्यासाठी काय करावं असा प्रश्नही अनेक पालकांना पडतो. 

आता सर्दी-ताप, कफ किंवा खोकला होणे हे नेहमीपेक्षा थोडे वेगळे असले तरी लहान मुलांच्या बाबतीत ते सामान्य असते. अनेकदा मुलं सर्दीनी इतकी हैराण होतात की त्यांना नीट झोप येत नाही की जेवण जात नाही. कफामुळे पुरेसा श्वास घेता येत नसल्याने मुलं अस्वस्थ होतात आणि मग कुरबूर करतात. अशावेळी अनेक मुलं आई-बाबांना चिकटून राहतात. पालकांना घरातली कामं, ऑफीसची कामं आणि दुसरीकडे मूल असं चिकटून बसत असल्याने आणि नीट खात पीत नसल्याने काहीच सुचत नाही. मात्र मुलांना सर्दी-कफ होणे हा कोणताही आजार नसून हे त्यांचे आरोग्य उत्तम असल्याचे लक्षण आहे असे डॉक्टर सांगतात. प्रसिद्ध डॉ. पार्थ सोनी यांनी याविषयी माहिती देणारा एक व्हिडिओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला असून त्यांनी यामध्ये अतिशय उपयुक्त माहिती आपल्याशी शेअर केली आहे. 

मुलांना सतत सर्दी-कफ का होतो म्हणजे नेमके काय होते?

सतत सर्दी आणि कफ होण्याचं कारण व्हायरल इन्फेक्शन्स असतात. वातावरणात लाखो- करोडो व्हायरस असतात पण त्या प्रत्येक व्हायरससाठी लस अस्तित्त्वात नसते. अशावेळी एखादा व्हायरस शरीरात गेला की मुलं त्याच्याशी प्रतिकार करतात तेव्हा त्यांना सर्दी-कफ होतो. एकदा एका व्हायरसच्या विरोधात अँटीबॉडीज तयार झाल्या की पुढच्या वेळी त्या व्हायरसशी मुलं लढतात पण पुढच्या वेळी दुसरा व्हायरस शरीरात जातो आणि पुन्हा सर्दी-ताप होतो. अशाप्रकारे मुलाच्या शरीरात विविध प्रकारच्या व्हायरसच्या अँटीबॉडीज तयार होतात आणि त्यांची प्रतिकाशक्ती वाढत जाते. मूलाला सर्दी-कफ होतो म्हणजेच त्याची प्रतिकारशक्ती चांगली आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. 

 

टॅग्स :पालकत्वलहान मुलंसंसर्गजन्य रोगआरोग्य