प्रत्येक पालकाला वाटते की आपल्या मुलाने शाळेत आणि अभ्यासात उत्कृष्ट कामगिरी करावी. मुलांना हुशार बनवण्यासाठी फक्त कठोर अभ्यास पुरेसा नसतो; त्यासाठी काही विशिष्ट आणि चांगल्या सवयींची गरज असते. मुलांना अभ्यासात अव्वल बनवण्यासाठी पालकांनी त्यांना लहानपणापासूनच 'या' ५ महत्त्वपूर्ण सवयी लावणे आवश्यक आहे. ज्यामुळे मुलांची प्रगती होईल आणि त्यांना चांगल्या सवयीसुद्धा लागतील.
१) नियमित अभ्यासाची सवय
मुलांना रोज ठराविक वेळेत अभ्यास करण्याची सवय लावा. नियमितपणा यशस्वी होण्याचा पाया आहे.रोजच्या रोज शाळेत शिकवलेले धडे त्याच दिवशी वाचून काढल्याने विषय अधिक चांगला समजतो आणि परीक्षेच्या वेळी जास्त ताण येत नाही आणि रोज मुलं अभ्यासाशी जोडलेले राहतात त्यामुळे परीक्षेच्यावेळी अभ्यासाचा लोड येत नाही.
२) उद्दिष्ट्ये निश्चित करणे आणि वेळापत्रक
मुलांना छोटी उद्दिष्ट्ये निश्चित करायला शिकवा त्यांना स्वतःचे साधे वेळापत्रक बनवायला मदत करा. खेळायला, जेवण करायला आणि झोपायला योग्य वेळ देऊन अभ्यासाची वेळ निश्चित करा. वेळेचं व्यवस्थापन शिकल्यास सर्व कामे वेळेत पूर्ण होतात.
३) एकाग्रता आणि शांत वातावरण
अभ्यास करताना टीव्ही, मोबाईल किंवा इतर मन विचलित करणाऱ्या गोष्टींपासून दूर राहावे.अभ्यासासाठी घरात एक शांत (Quiet) आणि योग्य जागा निश्चित करा, जिथे मुलाची एकाग्रता टिकून राहील. जर मुलं अभ्यास करताना फोन घेत असतील तर त्यांचं लक्ष विचलित होऊ शकतं.
४) प्रश्न विचारण्याची सवय
मुलांनी मनात शंका किंवा प्रश्न असल्यास ते लगेच शिक्षक किंवा पालकांना विचारावेत.प्रश्न विचारल्याने संकल्पना स्पष्ट होतात आणि विषयाची समज वाढते. जिज्ञासू वृत्ती अभ्यासासाठी नेहमीच चांगली असते. मुलांनी प्रश्न विचारल्यास पालकांनी न वैतागता व्यवस्थित उत्तरं द्यायला हवीत.
५) पुनरावृत्ती आणि सराव
शिकलेल्या गोष्टींची ठराविक अंतराने पुनरावृत्ती करणे खूप महत्त्वाचे आहे. यामुळे माहिती दीर्घकाळ लक्षात राहते. गणिते किंवा कठीण विषयांचा वारंवार सराव करायला सांगा. सराव परीक्षा दिल्यास वेळेचे व्यवस्थापन आणि परीक्षेची भीती कमी होते.
