आजच्या स्पर्धात्मक काळात पालक आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत थोडे जास्त जागरुक आणि सतत मुलांच्या अभ्यासाची काळजी घेणारे देखील असतात. मुलांचा अभ्यासाचा भार हलका व्हावा तसेच मुलं अभ्यासात नेहमी इतरांपेक्षा पुढे असावं, म्हणून आजकाल सर्रास पालक क्लासेस, ट्युशन लावतात. पण, अनेकदा योग्य ट्युशन न मिळाल्यास किंवा जास्त फी मुळे पालकांचा हिरमोड होतो. तसेच, ट्युशनवर अवलंबून राहिल्याने मुलांमध्ये स्वतःहून अभ्यास करण्याची सवय बिघडते. अशा परिस्थितीत, प्रत्येकवेळी मुलांना ट्युशन किंवा क्लासेसला पाठवणे सहज शक्य होईलच असे नाही(effective home study tips for children).
योग्य पद्धतीने आणि थोड्या शिस्तीने व्यवस्थित घरीच मुलांचा अभ्यास घेतला, तर त्यांना एक्स्ट्राच्या क्लासेस, ट्युशनची गरजही लागत नाही. घरातच योग्य वेळापत्रक, अभ्यासाची मजेशीर पद्धत आणि पालकांचा थोडा वेळ दिला, तर मुलं स्वतःच स्वतःचा अभ्यास करुन अधिक आत्मविश्वासू आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करु शकतात. मुलांना ट्युशन किंवा क्लासेसला न पाठवता कोणते खास आणि सोपे उपाय आहेत, ज्यांच्या मदतीने मुलांसाठी तुम्ही घरीच उत्तम अभ्यासाचे वातावरण (how to teach children at home without tution) तयार करू शकता ते पाहूयात...
ट्युशनशिवाय मुलांचा अभ्यास घरच्याघरीच कसा घ्यावा ?
१. अभ्यासाची वेळ आणि जागा निश्चित करा :- सर्वातआधी मुलांसाठी घरी अभ्यासाची एक निश्चित वेळ आणि जागा ठरवा. ज्याप्रमाणे ट्युशन क्लासमध्ये वेळ निश्चित असतो, अगदी तसेच घरीही एक रूटीन खास मुलांसाठी तयार करा. यामुळे मुलांच्या मनात अभ्यासाविषयी एक प्रकारची शिस्त तयार होईल आणि आपले मुलं त्या नेमून दिलेल्या वेळेला आवडीने अभ्यासाला बसतील.
किशोरवयीन मुलांना आईवडीलच शत्रू का वाटतात? मुलं दुरावणार नाहीत, पालकांनी टाळावी ‘ही’ १ चूक...
२. छोटे-छोटे ब्रेक द्या :- अभ्यासादरम्यान मुलांना मध्ये छोटे-छोटे ब्रेक देणे खूप महत्त्वाचे असते. सतत तासंतास एकाच जागी बसून अभ्यास करत राहिल्याने मूल थकून जाते आणि त्याचे लक्ष विचलित होऊ लागते. यासाठीच दोन अभ्यासांच्या सेशनमध्ये ५ ते १० मिनिटांचा ब्रेक दिल्याने त्यांच्या मेंदूला रिफ्रेशमेंट मिळते आणि मुलं पुन्हा अभ्यास करण्यासाठी तयार होते.
३. मुलांना घराबाहेर खेळायला पाठवा :- फक्त अभ्यासच नाही, तर मुलांनी घराबाहेर जाऊन मैदानी खेळ खेळणे देखील तितकेच महत्त्वाचे असते. मैदानी खेळ किंवा बाहेरच्या ॲक्टिव्हिटीजमुळे मुलांची ऊर्जा टिकून राहते आणि त्यांचा मानसिक विकास देखील होतो. जेव्हा मूल खेळून आल्यानंतर अभ्यास करते, तेव्हा त्यांचे अभ्यासातील लक्ष आणि स्मरणशक्ती या दोन्ही गोष्टी सुधारतात.
४. सतत अभ्यासाचा सराव करत रहा :- शाळेतून घरी आल्यावर मुलांकडून अभ्यासाची रिव्हिजन करून घेणे गरजेचे असते. दिवसभर शाळेत जे काही शिकवले आहे, त्याची सतत उजळणी किंवा सराव केल्यास ते जास्त काळ लक्षात राहते. पालकांनी मुलांना फक्त 'वाचायला' न सांगता, त्यांना 'लिहायला' देखील सांगावे. लिखाणामुळे लक्षात ठेवण्याची क्षमता अनेक पटींनी वाढते.
आजीआजोबांच्या सहवासात वाढलेल्या मुलांमध्ये असतात ६ गुण! मायेसोबतच मिळते जीवाभावाची मैत्रीही...
५. मुलांची परीक्षा घ्या :- आठवड्यातून एकदा मुलांची छोटी परीक्षा घ्या. यामुळे फक्त मुलांची प्रगती किती झाली आहे, हेच कळणार नाही, तर त्याला कोणत्या विषयांमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे, हे देखील समजून येईल. इतकेच नाही तर परीक्षेच्या निमित्ताने अभ्यास केल्याने पुन्हा एकदा मुलांची उजळणी होतेच, या सरावाच्या निमित्ताने मुलांकडून अभ्यासाचा सराव केला जातो, तसेच मुलं परीक्षेसाठी तयार होतात.
