सध्याच्या डिजिटल युगात मुलांना जेवताना टीव्ही, मोबाईल किंवा टॅबलेट पाहण्याची सवय लागणे ही पालकांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरली आहे. साधारणपणे प्रत्येक घरातील मुलं ही आजकाल टीव्ही, मोबाईल पाहिल्याशिवाय जेवतच नाहीत. काही मुलांना तर तासंतास हातात मोबाईल, टँबलेट घेऊन बसायची वाईट सवय लागते. इतकंच नाही तर अनेकदा काही पालक जेवण भरवताना मुले शांत राहावीत म्हणून पालकही नाईलाजाने त्यांच्या हातात मोबाईल, टॅबलेट देतात मात्र, या सवयीमुळे मुलांचे लक्ष अन्नाऐवजी स्क्रीनवर केंद्रित होते, ज्यामुळे त्यांना अन्न चघळणे, चव घेणे किंवा भूक लागणे किंवा भूक नसणे या नैसर्गिक भावनांची जाणीवच होत नाही. जेवताना स्क्रीन (how to reduce screen time for babies) पाहिल्याने मुलांचे पचन बिघडू शकते, त्यांना जास्त खाण्याची किंवा कमी खाण्याची सवय लागू शकते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कुटुंबासोबतचे संवाद साधण्याचे आणि जेवणाचा आनंद घेण्याचे महत्त्वाचे क्षण हिरावले जातात(no screen during mealtime tips).
सतत स्क्रीन पाहण्याची मुलांची ही सवय पुढे जाऊन कायमची सोडायला लावणं अधिक कठीण होतं. पण थोडेसे बदल, योग्य सवयी आणि पालकांनी केलेले काही छोटे उपाय या सवयीला सहज मोडू शकतात. मुलांना जेवणाकडे लक्ष देण्यासाठी, स्क्रीनपासून दूर ठेवण्यासाठी आणि हेल्दी ईटिंग हॅबिट्स विकसित करण्यासाठी पालकांनी कोणते सहजसोपे उपाय करावेत ते पाहूयात... पीडियाट्रिशियन संतोष यादव यांनी त्यांच्या इंस्टाग्राम व्हिडिओमध्ये एक अतिशय सोपा उपाय सांगितला (how to stop baby watching TV while eating) आहे ते उपाय नेमके काय ते पाहूयात...
मुलांना स्क्रीन पाहण्याची सवय का लागते ?
डॉक्टर यादव सांगतात की, मुले टीव्ही, लॅपटॉप, मोबाईल, टॅबलेट काहीही असो त्यावर सगळ्यात जास्त करून कार्टून्सच पाहतात. कार्टून्स खूप वेगाने चालतात, ते रंगीत असतात आणि त्यांचा आवाज देखील खूप मोठा असतो. याचा अर्थ, त्यामध्ये वेगवान हालचाल आणि मनोरंजक आवाज असतात, जे मुलांच्या मेंदूमध्ये डोपामिन नावाचे हॅप्पी हार्मोन्स फार मोठ्या प्रमाणावर तयार करतात. याच कारणामुळे मुलांना टीव्ही किंवा मोबाईल पाहण्याचा आनंद मिळतो आणि ते वारंवार ते पाहण्याचा हट्ट करतात.
सतत स्क्रीनला चिकटून बसण्याची मुलांची ही सवय सोडवण्यासाठी काय करावे ?
१. व्हिडिओचा वेग कमी करा :- सर्वातआधी टीव्ही किंवा मोबाईलवर सुरु असलेल्या कार्टूनचा वेग 1X वरून कमी करून 0.75X किंवा 0.5X करा. यामुळे व्हिडिओ थोडा हळू होईल आणि त्याची रंजकता कमी होईल. मुलाला तितकी मजा येणार नाही आणि हळूहळू त्याची आवड कमी होईल.
२. व्हिडीओचा आवाज कमी करा :- कार्टूनचा मोठा आवाज मुलांना सर्वात जास्त आकर्षित करतो. जर तुम्ही आवाज हळूहळू कमी करत गेलात, तर मुलांना कार्टून्स पाहण्यात कमी मजा येऊ लागते किंवा कार्टून्स पाहण्याचा कंटाळा येऊ लागतो आणि मुलं स्वतःच कार्टून्स किंवा सतत स्क्रीन पहाण्याच्या सवयीपासून स्वतःला लांब ठेवेल.
३. कंटेंट बदला :- कार्टूनऐवजी मुलांना ॲनिमल प्लॅनेट, ॲनिमल सफारी किंवा निसर्गाशी संबंधित व्हिडिओ दाखवा. हे व्हिडिओ मुलांना नवीन गोष्टी शिकवतात, त्याचबरोबर, ते शांत आणि हळू गतीचे असतात, ज्यामुळे मुलांचे लक्ष हळूहळू स्क्रीनवरून दूर होऊ लागते.
४. पालकांनी मुलांसोबत राहावे :- कार्टून्स किंवा मुलं जर कोणत्याही प्रकारची स्क्रीन पाहात असतील तर अशावेळी पालकांनी त्यांच्या सोबतचे राहावे, त्यांचा बाजूला बसून ते पाहात असलेला कन्टेन्ट पाहावा. मुलांना स्क्रीन एकटे असताना पाहायला देऊ नका. अशावेळी पालकांनी त्यांच्यासोबत बसावे, गप्पा माराव्यात आणि व्हिडिओवर चर्चा करावी. यामुळे मुलांना स्क्रीनपेक्षा तुमच्या सहवासात जास्त मजा येऊ लागेल आणि हळूहळू त्यांना तुमचा सहवास आवडेल आणि त्यांची स्क्रीन पाहण्याची सवय कमीमी होऊ लागेल.
जर तुम्हाला तुमच्या मुलाने जेवण करताना टीव्ही पाहू नये असे वाटत असेल, तर त्याला अचानक थांबवण्याऐवजी या चार छोट्या-छोट्या बदलांनी सुरुवात करा. अशाप्रकारे हळूहळू त्याचे लक्ष खाण्यावर आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्यावर जाईल. त्यामुळे तुम्हीही आजपासूनच या ट्रिक्स आजमावून पाहू शकता.
