सकाळी वेळेवर शाळेत पोहोचण्यासाठी मुलांना झोपेतून उठवणे म्हणजे पालकांसाठी मोठे कठीण काम...अनेकदा मुलं सकाळी झोपेतून उठायला खूप वेळ लावतात, चिडचिड करतात किंवा कितीही सांगितलं तरीही बिछाना सोडत नाहीत. परिणामी, मुलं रोज शाळेत उशिरा पोहोचतात. मुलांना एकदा का अशाप्रकारे उशिरा उठण्याची सवय लागली की, मुलं रोज तीच तीच गोष्ट पुन्हा करतात आणि ती सवय त्यांच्या अंगवळणी पडते. मुलं गाढ साखरझोपेत असताना मुलांना झोपेतून उठवणे अवघड जात असले तरी मुलांना वेळेवर शाळेत पाठवणे देखील तितकेच गरजेचे असते. ही रोजची समस्या तणावमुक्त आणि सोप्या पद्धतीने कशी हाताळायची? असा कॉमन प्रश्न अनेक पालकांना पडतो. मुलांच्या या सवयीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी आणि त्यांना वेळेवर उठण्याची आवड निर्माण करण्यासाठी काही सोपे उपाय करणे आवश्यक असते(how to make kids wake up early).
पॅरेंटिंग कोच रिद्धी देवरहा यांनी त्यांच्या इंस्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. रिद्धी सांगतात की, या टिप्स फॉलो केल्यास तुमचं मूल न रडता, आरडाओरडा करता स्वतःहून लवकर उठण्याची सवय स्वतःच लावू शकतात. मुलांनी सकाळी अंथरुणातून स्वतःहून वेळेत लवकर उठावे यासाठी पॅरेंटिंग कोच (how to make kids wake up early for school parenting coach shares tips) यांनी सांगितलेल्या काही खास टिप्स पाहूयात...
मुलांनी सकाळी अंथरुणातून स्वतःहून वेळेत लवकर उठावे यासाठी टिप्स...
१. मुलांसाठी एक मॉर्निंग रुटीन सेट करा :- पॅरेंटिंग कोच सांगतात की, जेव्हा मुलांची सकाळ आनंदी आणि चांगली असते, तेव्हाच ते सहजतेने लवकर उठतात. तुम्ही सकाळी घरात त्यांच्यासाठी थोडेसे मजेदार आणि आनंदी वातावरण तयार करू शकता. उदाहरणार्थ, त्यांच्या आवडीचे गाणे लावणे, मुलासोबत थोडा डान्स करणे, किंवा त्यांच्या आवडत्या खेळण्यासोबत खेळणे इत्यादी. यामुळे मुलांना आनंदाने उठण्याची सवय लागेल.
२. मुलांचे एक फिक्स रुटीन ठेवा :- जर मुलांच्या झोपण्याची आणि उठण्याची एकच निश्चित वेळ ठरवली गेली असेल तर मुलांना देखील वेळेत झोपण्याची आणि उठण्याची चांगली सवय लागेल. मुलांच्या झोपण्याची ही सवय रोज बदलत राहिली, तर मुलांचे शरीरही गोंधळून जाते. मुलांसाठी एक असे रुटीन तयार करा की मूल रोज एकाच वेळी झोपेल आणि एकाच वेळी उठेल. यामुळे त्याचे बॉडी क्लॉक व्यवस्थित सेट होईल आणि तो आपोआप वेळेवर जागा होईल व झोपेल.
३. मॉर्निंग मोटिवेशन द्या :- पॅरेंटिंग कोच रिद्धी पुढे सांगतात की, मुलांना सकाळी उठल्यावर एखादं छोटंसं मोटिवेशन देणं खूप महत्त्वाचं आहे. उदाहरणार्थ—त्यांच्या पसंतीचा नाश्ता तयार करून ठेवणे, उठताच एखादा गोंडस स्टिकर किंवा छोटासा रिवॉर्ड देणे, किंवा शाळेनंतर एखादी मजेदार अॅक्टिव्हिटी/प्लॅन करणे. यामुळे मुलांना सकाळी उठण्याची सकारात्मक भावना निर्माण होते आणि ते उत्साहाने दिवसाची सुरुवात करतात.
४. ओरडणे किंवा मारणे टाळा :- मुलं सकाळी वेळेत उठत नाहीत म्हणून मुलांना ओरडणे किंवा मारणे हे चुकीचे आहे. सकाळ-सकाळ ओरडल्याने किंवा ओरडून उठवल्याने मुलांची चिडचिड होऊ शकते. याऐवजी, त्यांना शांतपणे आणि प्रेमाने उठवा. त्याचबरोबर, सकाळी होणारी धावपळ कमी करण्यासाठी मुलाचे बॅग, युनिफॉर्म आणि डबा यांची तयारी रात्रीच करून ठेवा. यामुळे सकाळची घाईगडबड कमी होईल आणि मूल देखील तणावमुक्त राहील.
