Lokmat Sakhi >Parenting > घरोघर मुलं चिडकी! किरकोळ गोष्टींवरुन मुलं चिडतात, आदळआपट करतात-किंचाळतात! पाहा काय चुकतंय..

घरोघर मुलं चिडकी! किरकोळ गोष्टींवरुन मुलं चिडतात, आदळआपट करतात-किंचाळतात! पाहा काय चुकतंय..

Parenting Tips: घरोघर मुलं हट्टीच नाही तर चिडकी होत आहेत, मुलांना रागही लवकर येतो, पाहा त्याची कारणं..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2025 15:59 IST2025-07-02T15:58:47+5:302025-07-02T15:59:57+5:30

Parenting Tips: घरोघर मुलं हट्टीच नाही तर चिडकी होत आहेत, मुलांना रागही लवकर येतो, पाहा त्याची कारणं..

how to handle Anger Issues in Kids, what are the Causes, Symptoms and Treatment for anger in kids | घरोघर मुलं चिडकी! किरकोळ गोष्टींवरुन मुलं चिडतात, आदळआपट करतात-किंचाळतात! पाहा काय चुकतंय..

घरोघर मुलं चिडकी! किरकोळ गोष्टींवरुन मुलं चिडतात, आदळआपट करतात-किंचाळतात! पाहा काय चुकतंय..

Highlightsकारणं अनेक आहेत; पण वास्तव एकच मुलांना राग येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.

निशांत महाजन (समूपदेशक)

काही महिन्यांपूर्वी ॲडोलसन्स ही अमेरिकन वेबसिरीज जगभर गाजली. १३ वर्षांचा एक मुलगा, त्याच्यावर आपल्याच वर्गातील एका मुलीचा खून केल्याचा आरोप असतो. अतिशय साधासा गरीब दिसणारा इनोसंट चेहऱ्याचा मुलगा आपल्या समवयस्क मुलीचा खून करतो आणि पुढे पालक, थेरपिस्ट त्यानं असं का केलं हे उलगडत जातात, असं साधारण ते कथासूत्र. कुणाला वाटेलही की हा कथाकल्पनाविलास असू शकतो;
पण नुकतीच एक घटना अमेरिकेत ॲरिझोना राज्यात घडली. इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या एका मुलीने आपल्याच वर्गातील काही मित्र-मैत्रिणींना हाताशी धरून एका तिच्याच वयाच्या मुलाचा शाळेतल्या बाथरूममध्ये खून करण्याचा प्लान तयार केला. सगळ्यांची वय दहा ते अकरा वर्षे. या मुलीचं ज्या मुलावर प्रेम होतं, तो आपल्याला फसवून दुसऱ्याच मुलीच्या प्रेमात आहे, असं तिला समजलं आणि भयंकर राग आला. मग वर्गातल्याच काही मुलांसोबत त्याला मारून टाकायचा कट शिजला. काही मुलं त्यात जायला तयार नव्हती; पण बाकीच्यांनी तुझ्यात हिंमत नाही, तू बावळट आहेस, तुला मैत्रीला जागता येत नाही, असं काय काय सांगितलं. आपण ‘असे’ नाहीत हे सिद्ध करण्यासाठी अजून काही तयार झाले. इतकंच नाही तर तो खून हा खून नसून त्या मुलानं आत्महत्या केली आहे हे भासवण्यासाठी त्यांनी एक चिठ्ठीही तयार ठेवली होती. एका पालकांच्या हा प्रकार लक्षात आला, त्यांनी शाळेत धाव घेतली. मुलांना खरं-खाेटं विचारण्यात आलं आणि सगळा तपशील पुढे आला.

 

आता प्रश्न असा की, या घटना फक्त अमेरिकेत घडतात का? तर नाही. जगभर सर्वत्र घडतात. भारतातही घडतात. आई-वडील मोबाइल घेऊन द्यायला नाही म्हणाले ते भाजीच आवडली नाही, ते मित्राचा राग आला इथपर्यंत अनेक टप्प्यात एकतर मुलं स्वत:ला इजा करून घेतात, आत्महत्या करतात किंवा दुसऱ्यांना इजा पोहोचवतात, अशा बातम्या आपण ऐकतो-पाहतोच.
या घटना वाचल्या की हाच प्रश्न पडतो की, मुलांना इतका प्रचंड राग का येतो आहे?
वय वर्षे १० ते १८ या वयातल्या मुलांना प्रचंड राग येणं, संतापानं त्यांनी आदळआपट करणं, इतरांना किंवा स्वत:ला मारणं हे जगभरच घडते आहे. त्यावर जगभर अभ्यास सुरू आहे. गेल्या वर्षी इटालीत झालेला एक अभ्यास जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रसिद्ध झाला. त्यांचं म्हणणं आहे की, ओव्हरप्रोटेक्टिव्ह पॅरेण्टिंग जगात सर्वत्रच होतं आहे आणि ज्या मुलांची पालक अति काळजी घेतात, ज्यांचं मन जपतात, तीच मुलं जास्त संतापतात, जास्त चिडतात आणि अपेक्षाभंगाने जास्त लवकर कोसळतात. दुसरा येल विद्यापीठाचा एक अभ्यास सांगतो की, बाकी कुठल्याही कारणापेक्षा स्मार्टफोन हेच मुलांच्या भयंकर रागाचं खरं कारण आहे!

 

स्मार्टफोनमुळे मुलं चिडकी!

१३ ते १७ वर्षे वयातली मुलं थोडी रागीट असतात, वयात येतानाच्या हार्मोनल असंतुलनाशी झगडत असतात. बंडखोर असतात हे आतापर्यंत मानलं जात हाेतं. आजही ती कारणं तशीच असली तरी आता वय वर्षे दहानंतर ते १८ पर्यंतची टीनएजर मुलं हातात स्मार्टफोन घेऊन बसलेली असतात आणि स्मार्टफोनचा अतिवापर हेच मुलांच्या रागाचं प्रमुख कारण असल्याचं येल विद्यापीठाचा अभ्यास सांगतो.
या अभ्यासातील काही निरीक्षणं महत्त्वाची आहेत.
१. सतत डोळ्यासमोर हलणारी दृश्य, गेम्स, व्हिडीओ बांधून घालत असल्याने त्यातून मिळणारा आनंद कमी झाला की मुलांची चिडचिड वाढते.
२. मानसिक स्वास्थ्यावर परिणाम होतो आणि अन्य कोणत्याही गोष्टीतून अपेक्षित आनंद मिळत नसल्याने पालकांसह समवयस्कांशीही संवाद कमी होतो आहे.
३. एकूण शारीरिक स्वच्छता, शिस्त, एकाग्रता यावरही परिणाम होत आहे.
४. प्रचंड आक्रमक होणारी मुलं आपल्या मनाविरुद्ध एकही गोष्ट सहन करू शकत नाहीत. त्यामुळे ती आक्रस्ताळेपणा करतात.
५. मुलं चिडू नयेत, शांत राहावी हीच पालकांची प्राथमिकता बनल्याने पालक मुलांशी काही बोलण्यात घाबरतात, धास्तावतात.
काय करता येईल?
खरं तर सोपी उत्तरं या प्रश्नाला नाही.
मुलांचा स्क्रीन टाइम कमी करून त्यांनी जास्तीत जास्त वेळ खेळणं वयात येताना आवश्यक आहे. शारीरिक, मानसिक ऊर्जेला वाट मिळेल, आव्हानं असतील आणि क्षमता वापरता येतील, असं काही मुलांना मिळायला हवं.
दुसरं पालकांनीही मुलांना सतत लहान न समजता, त्यांना वयानुरूप आपापली कामं करू देणं, निर्णय घेऊ देणं आवश्यकच असतं.
मुलांशी बोलत राहणं, हाच एक पर्याय आहे.

 

हेलिकॉप्टर आई-बाबा

हेलिकॉप्टर पॅरेण्टिंग ही संकल्पना काही नवीन नाही. मात्र, नव्या संदर्भात त्याची जास्त चर्चा आहे. एकेक मूल किंवा दोन मुलं. घराचं केंद्रस्थान मुलं बनली आणि आई-बाबांचं जग केवळ मुलांभोवती फिरू लागलं. अवतीभवतीचा समाज, मुलांसाठी धोकादायक घटना, ट्रॅफिकसह वाढत्या गर्दीची भीती यामुळेही पालक मुलांची जास्त काळजी घेतात आणि ओव्हर प्रोटेक्टिव्ह म्हणजेच अति काळजी करणाऱ्या पालकांमुळेही मुलांचीही एन्झायटी वाढते.
अलीकडेच प्रसिद्ध एक अभ्यास सांगतो की, सुमारे ४५ टक्के पालक आजकाल ओव्हर प्रोटेक्टिव्ह आहेत. त्यात वडिलांपेक्षा आयांचं प्रमाण तुलनेने जास्त आहे.
अजून एक मुद्दा म्हणजे जे पालक स्वत: सतत ताण घेतात. ज्यांना आपला राग किंवा भावना नीट नियंत्रित करता येत नाही त्यांच्याही मुलांना जास्त राग येतो.
आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे पालक सतत जगण्याविषयी तक्रार करतात. ज्यांना जगण्यात समाधान कमी दिसतं त्यांचीही मुलं अधिक चिडकी झालेली दिसतात.
कारणं अनेक आहेत; पण वास्तव एकच मुलांना राग येण्याचं प्रमाण वाढलेलं आहे.

 

Web Title: how to handle Anger Issues in Kids, what are the Causes, Symptoms and Treatment for anger in kids

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.