डॉ. संचिता गौर -पाटील (सल्लागार मानसोपचारतज्ज्ञ)
इंटरनेटने अनेक तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत, ज्यामुळे आपले जीवन सुलभ झाले आहे. आता प्रत्येक गोष्ट फक्त एका क्लिकवर उपलब्ध आहे. त्याच डिजिटल जगाचा भाग आहे सोशल मीडिया. इंटरनेटच्या माध्यमातून मनोरंजन, माहिती आणि संपर्काचे माध्यम म्हणून तो काम करतो. ते वापरून मैत्री होण्यासाठी नवीन डिजिटल जग तयार झालं. पूर्वीच्या शाळकरी निबंधांप्रमाणे विचार केला तर ‘सोशल मीडिया शाप की वरदान’ अशी स्थिती नक्की दिसते. सोशल नेटवर्किंग साइट्स म्हणजे अर्थातच व्हॉट्सॲप, फेसबुक, एक्स, स्पॅपचॅट, तर ब्लाॅगसाठीचे यूट्यूब, व्यावसायिक वापरासाठीचे लिंकडिन यासह अनेक सोशल मीडिया पर्याय उपलब्ध आहेत. तरुण मुलं आणि जेन झी यांची माध्यमं अधिक नवीन आणि वेगवान आहेत. याशिवाय गेम्स खेळण्यासाठीचे प्लॅटफॉर्मही वेगळेच आहेत.
विशेषत: कोविड काळात या ऑनलाइन साधनांचा वापर अधिक वाढला. त्या काळात आपल्याला घरातच राहावे लागले आणि सोशल मीडिया वापर वाढत गेला. त्या संकटकाळात आपली एकमेव आशा म्हणजे संपर्कक्षमता होती. पूर्वी जे लोक ऑनलाइन जगाचा भाग नव्हते तेही या काळात ऑनलाइन आले आणि तिथलेच झाले.
सुमारे ५.४२ अब्ज (जागतिक लोकसंख्येच्या ६३.९ टक्के) लोक सक्रियपणे सोशल मीडिया आज वापरतात.
पण त्यामुळे झाले काय?
सोशल मीडिया फायद्याचा असला तरी त्याचा वापर अति होत असल्याचे सर्वत्र दिसते. त्याचे प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. त्यामुळे मानसिक तसेच शारीरिक समस्याही उद्भवू लागल्या आहेत. विशेषत: किशोरवयीन (१३-१७) आणि तरुण/ प्रौढ (१८-२४) वयोगटात तर सोशल मीडिया अतिवापरामुळे मानसिक आजारांमध्ये मोठी वाढ दिसून येत आहे. आणि तेच काळजीचे मुख्य कारण आहे.
तरुण मुलांमध्ये काय लक्षणं दिसतात?
नैराश्य-डिप्रेशन, चिंता-ॲन्झायटी, सामाजिक अलगाव, फोमो म्हणजेच इतर लोकांना आपल्यापेक्षा जास्त आनंदी अनुभव येत आहेत अशी भावना सतत छळणं, निरुपयोगी स्क्रोलिंगद्वारे सतत तात्पुरती समाधानाची आवश्यकता निर्माण होऊन ते माइंडलेस स्क्रोलिंग वाढत जाणं, माणसांसह समवयस्कांशी प्रत्यक्ष संवाद कमी होणं, शरीर प्रतिमेचे प्रश्न, असे अनेक प्रश्न आजकाल तरुणांमध्ये वाढलेले दिसतात.
अधिक धोकादायक परिणाम
-तरुणांना साहस शोधण्याची ऑनलाइन आव्हानं मिळणं. त्यासाठी इतरांचा दबाव वाढणं.
- इतरांप्रमाणे जगणं असावं असं वाटून स्वत:ला कमी लेखत (idealised portrayal) आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होणं.
- चुकीची माहिती आणि फेक न्यूज पसरवणं किंवा ती वाचून त्याचे मुलांवर गंभीर परिणाम होणं.
- सोशल मीडिया वापराचं व्यसन लागणं, अर्थात व्यसनाप्रमाणे दीर्घकालीन वापरातून मिळणाऱ्या डोपामाइनमुळे अधिकाधिक वापराची चटक लागणं. ही रासायनिक प्रक्रिया इतर व्यसनांप्रमाणेच घडते.
-ऑनलाइन गेमिंग, जुगार, डेटिंग आणि ऑनलाइन खरेदी या साऱ्याचंही व्यसन लागण्याचा धोका असतोच.
तरुणांसाठी उपाय काय?
१. डिजिटल जग फायद्याचे आहे, पण योग्य वापर आणि अतिवापर यामध्ये संतुलन राखणं.
२. स्क्रीन टाइम मर्यादित करणं, त्याचं नियमन सांगणारे ॲप वापरणं.
३. किशोरवयीन मुलांना पालकांनी समजावणं की आभासी जग हे लोकांच्या खऱ्या जीवनाचे प्रतिबिंब नसते.
४. कुटुंब आणि मित्रांशी अधिक चांगले संबंध निर्माण करणे, स्क्रीन-फ्री जगणं अधिक सकस आणि अर्थपूर्ण व्हावं यासाठी प्रयत्न करणं.
५. विविध छंद असणं, त्यासाठी वेळ काढणं. त्यात मन गुंतवणं अधिक निकोप.
६. आपले खरे जीवन आपल्या आजूबाजूलाच घडत आहे, स्क्रीनवर नाही ही जाणीव असणं. खोटी आभासी सुरक्षितता आणि आभासी कनेक्ट यातून बाहेर पडून प्रत्यक्ष कनेक्ट आणि प्रत्यक्ष संपर्क, संवाद हीच अधिक निकोप आणि आनंदी जगण्यासाठी आवश्यक गोष्ट आहे.