मुक्ता चैतन्य (संस्थापक, सायबर मैत्र)
भारतीयांचा सर्वसाधारण स्क्रीन टाइम ७ तासांचा आहे. त्यातही पाच वर्षांच्या खालील मुलं कमीत कमी दोन ते अडीच तास स्क्रीनसमोर असतात. जसजसं वय वाढायला लागतं; तसतसा सोशल मीडिया हवा म्हणून, गेमिंगसाठी, चॅटिंगसाठी स्क्रीन टाइम वाढायला लागतो. शिक्षण, करमणूक, संवाद अशा अनेक गरजांसाठी मुलं स्क्रीनसमोर असतात. गेमिंगपासून डेटिंगपर्यंत मुलांच्या डिजिटल आयुष्यात प्रचंड उलथापालथ सुरू आहे. नको त्या वयात नको ते डोळ्यासमोर नाचत राहतं, समवयीनांमध्ये स्वीकारलं जावं यासाठी मुलं प्रयोग करतात, ट्रेंडमध्ये सहभागी होतात; पण हे सगळंच करत असताना पालक-शिक्षक-मुलं आणि एकूण व्यवस्था यांच्यात माध्यम शिक्षणाचा अभाव असल्याने मुलांच्या वागणुकीवर, भावनिक स्थैर्यावर, झोपेवर आणि शारीरिक आरोग्यावर गंभीर परिणाम होतात, होऊ शकतात.
आपल्या मुलाचं वर्तन धोकादायक पातळीवर आहे हे पालक म्हणून आपण कसं ओळखायचं? काय असतात रेड फ्लॅग्ज? जाणून घेऊया!
१. सतत स्क्रीनवर वेळ घालवणे
जर मूल दिवसाचे बरेचसे तास मोबाइल, गेम, यूट्यूब, सोशल मीडिया किंवा OTT वर घालवत असेल आणि त्या शिवाय राहू शकत नसेल, तर ही पहिलीच धोक्याची घंटा आहे. अनेकदा मुलांना स्क्रीन ‘स्विच’ करण्याची सवय असते. म्हणजे टीव्ही बंद केला तर मोबाइल हवा असतो, मोबाइल बंद झाला की टॅब हवा असतो. सतत कुठला तरी स्क्रीन डोळ्यासमोर लागतो. अन्यथा ते मूल अस्वस्थ होतं. विशेषतः जेव्हा अन्न, झोप, शाळेचं काम किंवा मैदानी खेळ हे सगळं बाजूला टाकून फक्त स्क्रीनवर सतत हवा असं होत असेल तर तो एक रेड अलर्ट आहे.
२. स्क्रीन बंद केल्यावर चिडचिड व राग
'स्क्रीन बाजूला ठेव' असं नुसतं म्हटलं तरी काही मुलं रागावतात, चिडतात. मोबाइल काढून घेतल्यावर आणि 'तो आता का पुरे' हे सांगितल्यानंतरही जर मूल रागावत असेल, हट्टाला पेटत असेल, गोष्टी फेकत असेल, रडत असेल किंवा जवळच्यांशी उद्धटपणे बोलत असेल किंवा प्रसंगी अंगावर धावून जात असेल, प्रचंड हिंसक होत असेल तर ते डिजिटल व्यसनाकडे झुकतं आहे, हे लक्षात घ्या.
३. कुणाशीच बोलायला नको
स्क्रीनचा अनुभव हा वैयक्तिक अनुभव असतो. त्यामुळे सतत मोबाइलच्या स्क्रीनसमोर जर मूल असेल तर ते आयसोलेट- एकेकटं होतं. त्या एकटेपणाची त्याला सवय लागते आणि मग चारचौघांच्या बरोबर कुठलीही गोष्ट करण्यात मुलाला रस वाटत नाही. इतर मुलांबरोबर खेळणं, संवाद साधणं, मित्रांबरोबर बाहेर हुंदडणं, घरात गप्पा मारणं, नातेवाईकांकडे जाणं किंवा पाहुणे घरी आल्यावर त्यांच्याबरोबर वेळ घालवणं यातलं काहीही करायला मुलांना आवडत नसेल आणि ती वैतागत असतील तर त्यांच्या वैतागामागे स्क्रीन हे एक कारण असू शकतं.
४. झोपेच्या सवयींमध्ये बदल
अनेकदा मुलं जर सोशल मीडियावर किंवा गेमिंगमध्ये असतील तर ती रात्री जागताना दिसतात. रात्री उशिरापर्यंत फोन वापरणं, झोप न लागणं, सकाळी उठण्यास कंटाळा वाटणं किंवा दिवसभर थकवा जाणवणं ही लक्षणं स्क्रीन टाइमच्या अतिरेकामुळे असू शकतात. स्क्रीनवरील निळा प्रकाश झोपेचं चक्र बिघडवतो, जे बालवयात अत्यंत घातक ठरू शकतं.
५. अभ्यासाचा कंटाळा
ज्या मुलांचा स्क्रीन टाइम खूप जास्त आहे त्या मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नाही. अभ्यास आणि शाळेत जे काही शिकवलं जातं त्यात या मुलांना रस उरत नाही आणि त्यांना अभ्यास नकोसा होतो. त्यापेक्षा 'ऑनलाइन जाऊ' असे विचार त्यांच्या मनात यायला लागतात. मुलाचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होणं, शाळेत लक्ष नसणं, गृहपाठ टाळणं किंवा शिक्षकांकडून सतत तक्रारी येणं आणि प्रत्येक गोष्टीला ऑनलाइन जगाशी जोडण्याची सवय लागणं हा सुद्धा एक महत्त्वाचा रेड फ्लॅग आहे.
६. गुप्तता आणि गोपनीय वर्तन
जर मूल सतत फोन लॉक करत असेल, कोणाला फोनमध्ये डोकावू देत नसेल, ब्राउझिंग हिस्ट्री डिलिट करत असेल आणि कोणाशी बोलतंय हे लपवत असेल तर इंटरनेटवर काहीतरी चुकीचं चालू असल्याचा संशय येऊ शकतो. ते मूल सायबर बुलिंगला सामोरं जातंय का हे बघितलं पाहिजे. अशावेळी सायबरबुलिंग, अश्लील कंटेंट किंवा अयोग्य चॅटिंग याचा धोका असतो. मुलं स्वतःहून त्याच्यासोबत घडत असलेली चुकीची गोष्ट सांगत नाहीत, पण मुलांच्या वर्तनात अशावेळी फरक पडायला सुरुवात होते. तो फरक कशामुळे आहे हे समजून घेऊन मुलांना मदत करणं आवश्यक असतं.
७. भावनिक अस्थिरता
संपूर्ण डिजिटल जग भावनांवर चालतं. त्यामुळे अति स्क्रीन टाइमचा परिणाम भावनांवर होतोच. इन्फ्लुएन्सर्सपासून युट्युबर्सपर्यंत अनेक माणसं, ऑनलाइन जगात दिसणाऱ्या वस्तू, घटना, प्रसंग मुलांवर प्रभाव टाकतात. अशावेळी भावनिक पातळीवर जर मुलं ऑनलाइन जगावर विसंबून राहायला लागली, तर खऱ्या जगातल्या भावना स्वीकारताना त्या मुलांना कदाचित त्रास होऊ शकतो. ज्यामुळे अचानक रडणं, चिडचिड करणं, एकटं राहणं किंवा स्वतःला इजा करण्याच्या भावना मुलांच्या मनात तीव्र होऊ शकतात. हा एक अतिशय गंभीर रेड फ्लॅग आहे.
८. शारीरिक आरोग्य बिघडणं
मूल सतत जर स्क्रीनच्या समोर असेल तर त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो, मानदुखी, पाठदुखी, स्थूलता, हालचालींचा अभाव, अपचन किंवा सतत थकवा हे प्रश्न तयार होतात. त्यामुळे अति स्क्रीनचा परिणाम फक्त भावनांवर आणि वर्तणुकीवर होतो असं नाही, तर त्याचा शारीरिक परिणामही आहे. जो समजून घेणं आणि त्यापासून मुलांना वाचवणं आवश्यक आहे.काहीवेळा मुलांवर डिजिटल जगातून प्रचंड ताण येतो, मुलं तीव्र भावनिक चढ उतार अनुभवतात, अशावेळी समुपदेशक किंवा मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली पाहिजे. सगळे प्रश्न आपले आपल्याला सोडवता येणार नाहीत, त्यासाठी मदतीची गरज असते. ती घेतली पाहिजे.