मुलांच्या वाढीच्या वयात त्यांचं वजन आणि आरोग्याकडे पालकांचे विशेष लक्ष असते. मात्र, "माझं मूल काहीच खात नाही" किंवा "खाऊनही त्याच्या अंगी लागत नाही," ही तक्रार आजकाल घराघरांत ऐकायला मिळते. अशावेळी मुलांच्या वजनाचं पालकांना टेन्शन येणं स्वाभाविक आहे. इतकंच नाही तर कित्येकदा काही पालक अशी देखील तक्रार करतात की, मुलं व्यवस्थित खात असूनही त्यांचं वजन वाढत नाही. सतत बारीक दिसणारी मुलं पाहून पालक चिंतेत पडतात आणि काहीवेळा लगेच सप्लिमेंट्स किंवा बाजारातील हेल्थ ड्रिंक्सकडे वळतात. मात्र, मुलांचं वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट (Healthy weight gain for kids) म्हणजे संतुलित आणि पौष्टिक आहार. योग्य अन्नपदार्थांचा आहारात समावेश केल्यास मुलांची भूक वाढते, शरीराला आवश्यक पोषण मिळते आणि वजनही नैसर्गिकरीत्या वाढण्यास मदत होते(Child weight gain naturally).
मुलांचं वजन वाढवण्यासाठी त्यांना फक्त बाहेरचे जंक फूड किंवा सप्लिमेंट्स देण्यापेक्षा नैसर्गिक आणि सकस आहार देणं हाच सर्वात सोपा आणि सुरक्षित मार्ग आहे. योग्य पोषण मिळाल्यास मुलांची केवळ शारीरिक वाढच होत नाही, तर त्यांची प्रतिकारशक्तीही वाढते. बालरोगतज्ज्ञ डॉ. रवी मलिक यांच्या मते, जर मूल दिसायला खूपच बारीक असेल पण त्याची भूक व्यवस्थित असेल, तर त्याच्या आहारात काही खास पदार्थांचा समावेश केल्याने त्याचे वजन हळूहळू आणि निरोगी पद्धतीने वाढू शकते. तुमच्या मुलाचे वजन निरोगी पद्धतीने वाढवण्यासाठी त्यांच्या आहारात कोणते घरगुती आणि पौष्टिक पदार्थ (Foods for underweight child) असायला हवेत ते पाहूयात...
मुलांचे वजन वाढण्यासाठी त्याच्या आहारात कोणते पदार्थ असावेत ?
१. डाळीमध्ये तूप मिसळून द्या :- डॉ. रवी मलिक सांगतात की, सर्वातआधी तुम्ही कोणतीही डाळ चांगली उकळवून - शिजवून घ्या. डाळ पूर्णपणे मऊ शिजलेली असावी जेणेकरून मूल ती सहज खाऊ शकेल. आता ही डाळ हलकी मॅश करा आणि त्यात थोडे तूप मिसळा. तुपामुळे शरीराला चांगली ऊर्जा मिळते आणि डाळीतून प्रोटीन मिळतात. हे कॉम्बिनेशन मुलांचे वजन वाढवण्यास मदत करते. तुम्ही याचा समावेश रोज किंवा आठवड्यातून अनेक वेळा मुलांच्या आहारात करू शकता.
वजन कमी करा खा खास कोशिंबीर! दररोज फक्त १ वाटी खाऊनही घटेल वजन झरझर, पाहा रेसिपी...
२. पनीर, टोफू आणि अंडी नक्कीच द्या :- डॉक्टर मलिक यांनी सांगितले की, पनीर, टोफू आणि अंड्यामध्ये प्रोटीनसोबतच इतरही आवश्यक पोषक तत्व भरपूर प्रमाणांत असतात. प्रोटीन शरीरातील स्नायूंच्या विकासात मदत करतात आणि निरोगी वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात. आपण मुलांना पनीर भुर्जी, उकडलेले अंडे किंवा टोफूचे सॅलॅड बनवून देऊ शकता. नियमितपणे हे पदार्थ दिल्याने मुलांना ताकद मिळेल आणि वजनही वाढेल.
३. उकडलेला आणि मॅश केलेला बटाटा किंवा रताळे द्या :- बटाटा आणि रताळ हे दोन्ही पदार्थ मुलांच्या आरोग्यासाठी उत्तम मानले जातात. बटाटा आणि रताळं व्यवस्थित उकडून आणि मॅश करून मुलांना खाऊ घाला. यामध्ये फायबर, इन्स्टंट एनर्जी आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स असतात जे शरीराला दीर्घकाळ ताकद देतात. जर बाळ लहान असेल तर हे पदार्थ अगदी मऊ करून द्या जेणेकरून ते सहज खाता येतील. यामुळे वजन हळूहळू वाढवण्यास मदत करते.
४. ड्रायफ्रूट्सची पावडर :- ड्रायफ्रूट्सची पावडर वजन वाढवण्यासाठी खूप फायदेशीर असते. आपण बदाम, काजू किंवा अक्रोडाची पूड तयार करून ठेवू शकता. ही पावडर दूध, दही किंवा डाळीमध्ये मिसळून मुलाला द्या. यामुळे अन्नाची पौष्टिकता वाढते. सुक्या मेव्यामध्ये हेल्दी फॅट्स आणि अनेक आवश्यक जीवनसत्त्वे असतात जी मुलांच्या विकासासाठी आवश्यक असतात.
५. गव्हाच्या पिठाचा शिरा :- डॉ. मलिक यांच्या मते, मुलाचे वजन वाढवण्यासाठी तुम्ही त्याला गव्हाच्या पिठाचा शिरा देखील देऊ शकता. जर मुलाला गोड आवडत असेल, तर तुम्ही त्यात थोडी साखर किंवा गूळ घालून शिरा बनवू शकता. पण लक्षात ठेवा की यात जास्त साखर घालू नका. पीठ आणि तूप हे दोन्ही मिळून शरीराला भरपूर इन्स्टंट एनर्जी देतात. हा पदार्थ मुलांच्या आहारात अधूनमधून देऊ शकता, तो चविष्ट असतो आणि वजन वाढवण्यासही मदत करतो.
६. फुल क्रीम दही आणि फळांचा योगर्ट :- फुल क्रीम दह्यामध्ये केळी, चिकू किंवा आंबा मिसळून घरीच चविष्ट योगर्ट तयार करता येते. दह्यात प्रोटीन आणि कॅल्शियम असते, तर फळांपासून ऊर्जा मिळते. याव्यतिरिक्त ओट्सची खीर किंवा लापशी देखील देऊ शकता, जे शरीराला सतत ऊर्जा पुरवते आणि वजन वाढवण्यास मदत करते.
