Lokmat Sakhi >Parenting > हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण..

हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण..

राणीला आपल्या आई वडिलांकडून जो पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा आणि आधार आपल्या स्वप्नांसाठी झगडणार्‍या, स्वप्न पाहाण्याचं धाडस करणार्‍या प्रत्येक मुलीला मिळावा या इच्छेने आणि तळमळीने राणीनं केलेलं ट्विट चर्चेत आहे. काय म्हणतेय राणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2021 04:53 PM2021-10-28T16:53:49+5:302021-10-28T17:16:55+5:30

राणीला आपल्या आई वडिलांकडून जो पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा आणि आधार आपल्या स्वप्नांसाठी झगडणार्‍या, स्वप्न पाहाण्याचं धाडस करणार्‍या प्रत्येक मुलीला मिळावा या इच्छेने आणि तळमळीने राणीनं केलेलं ट्विट चर्चेत आहे. काय म्हणतेय राणी?

Girls prepare for themselves, not for marriage. Will this tweet of Rani Rampal give strength to the parents of girls ..? | हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण..

हॉकीची राणी पालकांना सांगतेय ही एकच गोष्ट; मुलींच्या लग्नाचा विचार करताय पण..

Highlightsराणी म्हणते, मला यश एका रात्रीत मिळालेलं नाही. त्यासाठी 20 वर्षं झगडावं लागलं.मुलींना केवळ लग्नासाठी मोठं होताना राणीनं आजूबाजूला पाहिलंय, अनुभवलंय. यामुळे अस्वस्थ असलेल्या राणीनं हे ट्विट केलंय.

राणी रामपाल महिला हॉकी टीमची कॅप्टन. तिच्या नेतृत्त्वाखाली भारतीय महिला संघाने टोकियो ऑलिम्पिकमधे उपांत्य फेरीत धडक मारण्याची कमाल केली. तेव्हापासून राणी रामपाल ही सर्व भारतीयांसाठी कौतुकाचा विषय झाली आहे. 26 वर्षाच्या राणीनं नुकतंच केलेलं एक ट्विट वाचून वयाच्या मानानं किती मोठा विचार व्यक्त केल्याचं म्हणत तिच्या ट्विटला लोकांनी कौतुकाचा प्रतिसाद दिला आहे.

राणीनं हे ट्विट भारतातल्या प्रत्येक मुलीच्या पालकांना उद्देशून लिहिलेलं आहे. आपल्या ट्विटमधे तिने लिहलंय की,‘आपल्या मुलीला इतकं स्वावलंबी आणि आत्मनिर्भर करा की तुम्हाला तिच्याशी कोन लग्न करेल ही चिंताच करावी लागणार नाही. तिच्या लग्नाच्या दिवसासाठी पैसे वाचवत बसण्यापेक्षा आज तिच्या शिक्षणावर पैसे खर्च करा आणि महत्त्वाचं म्हणजे तिला लग्नासाठी म्हणून नाही तर स्वत:साठी तयार करा. तिला स्वत:वर प्रेम करायाला शिकवा, तिच्यात आत्मविश्वास निर्माण होईल यासाठी प्रयत्न करा!’

Image: Google

राणीनं जे ट्विटमधे म्हटलंय ती बाब अनेकांच्या मनाला स्पर्शून गेली. थेट पालकांना उद्देशून लिहिण्य़ाचं बळ राणीत आलं कसं? असाही प्रश्न अनेकांना पडला. पण राणीला हे बळ मिळालं ते तिच्या संघर्षातून. हरियाणातल्या कुरुक्षेत्र जिल्ह्यातल्या शहाबादमधे राणीचा जन्म झाला. मुलींसाठी संकुचित असलेल्या वातावरणातच ती लहानाची मोठी झाली. स्वत: मोठं होत असताना आजूबाजूला, कुटुंबात मुलींना मोठं होतांनाही ती पाहात होती. मुलींची कोणतीही स्वप्न न जोपासता त्यांना लग्न करुन त्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी पालकांची चालणारी धडपड बघून राणी तेव्हाही अस्वस्थ होती आणि आजही. राणीनं घरात खूप गरिबी पाहिली, पैशाचे चणचण अनुभवली. लहानपणी तर ती कुपोषितही होती. तुटक्या हॉकी स्टिकनं खेळायला सुरुवात करुन राणीनं ऑलिम्पिकमधे पोहोचण्याचं स्वप्नंही याच गरीबीत पाहिलं. जोपासलं आणि ते पूर्ण करण्यासाठी स्वत:ला मजबूत केलं, तयार केलं. सुरुवातीला राणीच्या वडिलांना ती पाहात असलेलं स्वप्न झेपलं नाही आणि पटलंही नाही. पण राणी आपल्या इराद्यावर ठाम आहे हे बघून वडिलांनी राणीच्या मागे उभं राहाण्याचं ठरवलं. तिच्या वडिलांनी घेतलेल्या भूमिकेवर कुटुंबातील इतर सदस्यांनी आगपखड केली पण वडील राणीच्याच मागे उभे राहिले आणि राणीला आपलं स्वप्न पूर्ण करत इतिहास घडवता आला.

Image: Google

राणीला आपल्या आई वडिलांकडून जो पाठिंबा मिळाला तसाच पाठिंबा आणि आधार आपल्या स्वप्नांसाठी झगडणार्‍या, स्वप्न पाहाण्याचं धाडस करणार्‍या प्रत्येक मुलीला मिळावा या इच्छेने आणि तळमळीने राणीनं हे ट्विट केलं.
राणीनं केलेल्या ट्विटला समाजमाध्यमावर चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तिला प्रतिसाद देताना जे तुझ्या बाबतीत घडलं ते प्रत्येकीच्या बाबतीत घडायला हवं अशी इच्छा अनेकांनी व्यक्त केली आहे. राणीच्या ट्विटला प्रतिसाद देताना एकानं म्हटलं की, ‘ राणी तू जे लिहिलं त्याबद्दल आदर वाटतो. पण तू हे म्हणू शकते कारण तू स्वत: यशस्वी आहे म्हणून. पण त्या हजारो लाखो महिला खेळाडुंचा विचार कर , ज्या आपलं खेळात करिअर करण्याचं, देशासाठी खेळण्याचं स्वप्न पूर्ण करु शकल्या नाहीत. ज्यांना त्यांच्या कुटुंबानं स्वप्नांकडे पाठ फिरवून सामान्य आयुष्य रखडायला भाग पाडलं. खेळाशिवायच्या आयुष्यात बस्तान बसवण्यासाठी ज्या अजूनही झगडता आहेत त्यांचा विचार कर!’

Image: Google

या ट्विट्ला उत्तर देताना राणी म्हणते की,  'मी एका रात्रीत यशस्वी झाले नाही. मला इथवर पोहोचायला 20 वर्ष झगडावं लागलं, कष्ट करावे लागले, अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला, धोके, आव्हानं झेलावी लागली. या संघर्षात अनेक वेळा मला अर्शू ढाळावे लागले, शरीरात असल्या नसलेल्या जोरासकट लढावं लागलं, मला शंकांच्या, टीकेच्या, गरिबीच्या विरुध्द झगडावं लागलं. पण मी केलं आणि माझ्या आई वडिलांनी मला पाठबळ दिलं. मदत केली म्हणून मी आज इथे आहे. आणि हेच स्वप्नं मी इतर मुलींसाठी बघतेय ज्या आपल्या स्वप्नांसाठी संघर्ष करत आहेत.'

Image: Google

राणी रामपालकडून प्रत्येकानं शिकायला हवं. तिचं हे ट्विट प्रत्येक मुलीनं वाचायला हवं. राणीच्या या ट्विटमुळे प्रत्येक मुलीच्य वडिलांना आपल्या मुलीचं स्वप्न पूर्ण करण्याची, त्यासाठी तिच्या मागे उभं राहाण्याची ताकद मिळेल, तेव्हाच भारत बदलेलं म्हणत एकानं तिच्या ट्विटला प्रतिसाद देत काहीतरी चांगलं घडण्याची आशा व्यक्त केली आहे.
तर अनेकांनी राणीच्या ट्विटला प्रतिसाद देताना मुली शिकून सवरुन लव जिहादला बळी पडत असल्याची, त्यांना सुरक्षित वातावरण मिळत नसल्याची खंत व्यक्त केली आहे तर ही जबाबदारी फक्त सरकारची नसून मुलींना निर्भिडपणे पुढे जाण्यास वातावरण तयार करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असल्याचं एकानं म्हणून नागरिक म्हणून असलेल्या जबाबदारीकडे एकाने बोट दाखवलं आहे.

राणीनं पालकांना उद्देशून केलेल्या ट्विटकडे भारतातील मुलींचे पालक नक्कीच सकारात्मकतेनं पाहतील आणि आपल्या मुलींच्या स्वप्नांना बळ देतील अशी आशा अनेकांनी व्यक्त केली आहे.

Web Title: Girls prepare for themselves, not for marriage. Will this tweet of Rani Rampal give strength to the parents of girls ..?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.