अनेकदा पालक म्हणून आपल्याला मुलांच्या छोट्या-छोट्या सवयींकडे किंवा समस्यांकडे लक्ष द्यायला वेळ मिळत नाही. पालक म्हणून आपण बरेचदा मुलानांच्या काही सवयींकडे खूपच दुर्लक्ष करतो किंवा त्याला फारसे महत्व देत नाही. पण, मूल जर रात्री शांतपणे झोपत नसेल आणि त्याला वारंवार लघवी साठी उठावे लागत असेल, तर ही एक आरोग्याच्या दृष्टीने गंभीर गोष्ट असू शकते. रात्रीच्या वेळेस वारंवार लघवीला होणे किंवा अंथरूण ओले करणे हे फक्त सवयीचे लक्षण नसून, त्यामागे शारीरिक, भावनिक किंवा मानसिक अशी अनेक महत्त्वाची कारणे असू शकतात(frequent urination symptoms in children).
एका रात्रीत दोन ते तीन वेळा किंवा त्याहून अधिक वेळा उठून बाथरूमला जाणे, यामुळे मुलांची झोप, अभ्यास आणि एकंदरीत विकासावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे, पालकांनी या समस्येकडे दुर्लक्ष न करता, त्यामागील नेमके मूळ कारण शोधणे गरजेचे असते. अनेक पालकांना वाटतं की हे फक्त पाणी जास्त प्रमाणांत प्यायल्याने किंवा सवयीचा भाग आहे, पण काही वेळा ही लक्षणं आरोग्याशी संबंधित समस्येचं संकेतही असू शकतात. मुलं वारंवार लघवीला उठण्यामागं झोपेचं असंतुलन, ब्लॅडरची समस्या, साखरेचं प्रमाण वाढणं किंवा भावनिक कारणंही दडलेली असू शकतात. मुलांना रात्री - अपरात्री वारंवार लघवीला होणे या सवयीमागची खरी कारणं आणि (child urinating frequently at night) त्यावर उपाय काय असू शकतात ते पाहूयात.
वयानुसार लघवीला जाण्याची वारंवारता खालीलप्रमाणे असू शकते :-
१. १ ते ३ वर्षांची मुले :- दर दोन ते तीन तासांनी.
२. ३ ते ५ वर्षांची मुले :- दररोज अंदाजे सात ते नऊ वेळा.
३. ६ वर्षे आणि त्याहून अधिक वयाची मुले :- दिवसातून साधारणपणे सहा ते आठ वेळा.
मुलांना वारंवार लघवीला होण्याची कारणे नेमकी कोणती ?
१. मूत्राशय जास्त अॅक्टिव्ह असणे :- या स्थितीत, मूत्राशय पूर्णपणे रिकामे असूनही, ते भरलेले असल्याचा किंवा लघवी करण्याची तीव्र इच्छा झाल्याचा संकेत देत राहते. जेव्हा मुलाला योग्य प्रकारे लघवी करण्याची ट्रेनिंग मिळालेली नसते, तेव्हा असे होऊ शकते. मूत्राशय जास्त प्रमाणांत अॅक्टिव्ह असल्याने, मुलांमध्ये तातडीने लघवी करण्याची गरज वाटणे, लघवी कमी प्रमाणात होणे, बाथरूमला जाण्यासाठी रात्री जाग येणे, लघवी बाहेर पडण्याची भीती वाटणे किंवा लघवी रोखून न ठेवता येणे यांसारखी वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं दिसू शकतात.
२. बद्धकोष्ठतेची समस्या :- जर मुलांचे पोट योग्य प्रकारे साफ होत नसेल, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या वरचेवर होत असतील तर शौचाच्या जमा झालेल्या दाबामुळे मूत्राशयावर देखील दबाव पडू शकतो. यामुळे रात्री वारंवार लघवीला जाण्याचे प्रमाण वाढू शकते. यासाठी मुलांच्या आहाराकडे विशेष लक्ष देण्याची गरज असते. योग्य डाएटी चार्टसाठी एखाद्या बालरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
३. मूत्रमार्गाचा संसर्ग किंवा यूटीआय :- यूरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन झाल्यास, मुलांना तातडीने लघवी करण्याची तीव्र इच्छा जाणवू शकते. अशा परिस्थितीत, लघवी करताना वेदना किंवा जळजळ होणे, लघवीचा रंग गढूळ किंवा धुरकट दिसणे, ताप येणे, अचानकपणे अंथरुणातच लघवी होऊन जाणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात.
४. टाईप १ डायबिटीस :- वारंवार लघवी करण्याची इच्छा होणे, हे टाईप १ डायबिटीसच्या सुरुवातीच्या लक्षणांपैकी एक आहे. असे होण्याचे कारण हे आहे की, शरीर लघवीद्वारे जास्तीची साखर शरीराबाहेर टाकण्याचा प्रयत्न करत असते. टाईप १ डायबिटिसच्या लक्षणांमध्ये, वारंवार घसा सुकणे किंवा तहान लागणे, अचानक वजन कमी होणे, नेहमी थकवा जाणवणे, भूक कमी होणे यांसारखी लक्षणं दिसतात.
५. स्ट्रेस देखील असू शकते कारण :- अनेकदा मुलांच्या आयुष्यात मोठे बदल घडत असताना त्यांना स्ट्रेस किंवा तणाव जाणवू शकतो. मुलांवरील अचानक वाढत्या स्ट्रेसच्या परिणामामुळे देखील वारंवार लघवीला जाण्याची इच्छा जाणवू शकते.
डॉक्टरांकडे नेमके कधी जायला हवे ?
मुलांमध्ये रात्री वारंवार लघवीला जाण्याच्या समस्येसोबत खालीलपैकी कोणतीही लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांना भेटणे आवश्यक आहे.
१. लघवी करताना वेदना जाणवणे.
२. दिवसा किंवा रात्री, आपोआप लघवी होऊन जाणे.
३. लघवीतून रक्त येणे.
४. भूक किंवा तहान लागण्याच्या सवयीमध्ये अचानक बदल होणे.
५. वारंवार लघवीला जाण्यामुळे झोप न लागणे.
६. मूड किंवा वर्तनामध्ये वारंवार बदल होणे.
७. ही लघवीची समस्या २ ते ३ आठवड्यांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे.
ट्युशन- क्लासेसचा भार मुलांवर कशाला, घरीही अभ्यास होईल सोपा-५ सोपे उपाय! लागेल अभ्यासाची गोडी!
पालकांनी काय करावे ?
१. मुलांच्या बाथरूमला जाण्याच्या सवयींचा योग्य ट्रॅक ठेवावा.
२. बाथरूमला जाण्याचे एक वेळापत्रक निश्चित करावे, दर दोन ते तीन तासांनी मुलांना लघवी करण्यास पाठवावे.
३. कॅफीनयुक्त पेय, सोडा, किंवा लिंबूवर्गीय ज्यूस मुलांना देणे टाळावे.
४. मुलांना फायबरयुक्त अन्नपदार्थ खायला द्यावे आणि त्यांच्या आहारात पाण्याचे प्रमाण देखील योग्य प्रमाणांत ठेवावे.
५. मुलांना रागावून किंवा ओरडून बोलू नका, त्याऐवजी त्यांच्या समस्येचे मूळ कारण समजून घेण्याचा प्रयत्न करा.
