घरात लहान मूल म्हटलं की थोडा मस्तीखोरपणा आणि हट्ट या दोन्ही गोष्टी असणारच. पण जेव्हा हा हट्ट आरडाओरडा, रडारड आणि चिडचिडेपणात बदलतो, तेव्हा मात्र पालकांचा संयम सुटतो. अनेकदा मुलांना शांत करण्याच्या नादात आपण असे काही वागतो की ज्यामुळे मुलांचा चिडचिडेपणा कमी होण्याऐवजी अधिकच वाढतो. नकळतपणे केल्या जाणाऱ्या पालकांच्या काही 'कॉमन चुका' मुलांच्या स्वभावावर दीर्घकाळ परिणाम करू शकतात. आरडाओरडा करणाऱ्या मुलाला शांत करण्यासाठी पालक अनेकदा ५ अशा चुका करतात, ज्याने मुलांच्या मनात भीती किंवा राग अधिकच वाढतो(parenting mistakes causing child tantrums).
जेव्हा मुलं रडून गोंधळ घालतात किंवा पालकांचे ऐकत नाहीत, तेव्हा ते त्यांच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा वेळी पालकांनी दाखवलेला संयम मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी महत्त्वाचा असतो. परंतु, आजच्या धावपळीच्या काळात पालक ५ अशा चुका करतात ज्या मुलांच्या हट्टीपणाला खतपाणी घालतात. सतत ओरडणे, लगेच हट्ट मान्य करणे किंवा मुलांच्या भावना दुर्लक्षित करणे यामुळे परिस्थिती आणखी बिघडते. त्यामुळे मुलांच्या हट्टी वागण्यामागचं कारण समजून घेणं आणि योग्य पद्धतीने प्रतिसाद देणं अत्यंत गरजेचं असतं. इन्स्टाग्रामवरील प्रसिद्ध पेरेंटिंग कोच रेणू गिरधर यांनी मुलांच्या संगोपनाबाबत अतिशय महत्त्वाची माहिती शेअर केली आहे. मुलांचा हट्टीपणा वाढण्यामागे पालकांच्या ५ प्रमुख चुका कारणीभूत असतात. पालकांकडून होणाऱ्या अशा ५ सामान्य चुका कोणत्या आहेत आणि त्या कशा टाळता येतील, तसेच पालकांच्या वागण्यातील कोणते छोटे बदल मुलांचा चिडचिडेपणा कमी (does your child throw tantrums & lie on the floor) करू शकतात ते पाहूयात.
चूक १ :- मूल हट्ट करत असताना त्याला वारंवार समजावून सांगणे :- जेव्हा मूल एखाद्या गोष्टीसाठी हट्ट धरते किंवा रडते, तेव्हा पालक त्याला लगेच समजावण्याचा प्रयत्न करतात. मात्र, पालकांनी ही गोष्ट समजून घेणे गरजेचे आहे की, मूल जेव्हा जोरात रडते किंवा हट्ट करते, तेव्हा त्याला वारंवार समजावल्यामुळे त्याला खूप जास्त 'अटेंशन' मिळते. मुलाला असे वाटते की, आपण असं वागलो की आई-बाबा आपल्याकडे जास्त लक्ष देतात. अचानकपणे जास्तीचे 'अटेंशन' मिळालेल्या या अटेंशनमुळे मुलाला प्रोत्साहन मिळते आणि त्याचा हट्ट कमी होण्याऐवजी अधिकच वाढतो. अशावेळी मुलाला वारंवार सूचना देण्याऐवजी किंवा समजावण्याऐवजी, त्याला थोडे शांत होऊ द्या आणि मुलं शांत झाल्यावरच त्यांच्याशी बोलायला सुरुवात करा.
मैत्रिणीसाठी मागवला केक पण 'हॅप्पी बर्थडे' ऐवजी केकवर लिहून आलं असं काही की.. वाचून बसेल धक्का!
चूक २ :- चूक २: मुलांच्या भावना समजून न घेणे :- अनेकदा पालक मुलांच्या वागण्याकडे फक्त 'हट्ट' म्हणून पाहतात, पण त्यामागील भावना समजून घेण्यात कमी पडतात. ही एक मोठी चूक ठरते. मुलं जेव्हा हट्ट करतात, तेव्हा त्यामागे भीती, थकवा, भूक किंवा असुरक्षिततेची भावना असू शकते. जेव्हा पालक या भावनांकडे दुर्लक्ष करतात, तेव्हा मुलांना वाटते की त्यांना कोणीही समजून घेत नाहीये. जर पालकांना मुलाच्या चिडचिडेपणामागचे नेमके कारण समजले नाही, तर ते परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळतात. यामुळे मुलांचा राग आणि हट्ट अधिकच तीव्र होतो. मुलावर ओरडण्यापूर्वी ते असं का वागत आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. त्यांना सांगा की "मला समजतंय की तुला वाईट वाटतंय/राग आलाय". त्यांच्या भावनांना नाव दिल्याने मुलं लवकर शांत होतात.
चूक ३ :- चूक ३: मुलांवर ओरडणे किंवा डाफरणे :- जेव्हा मुलं ऐकत नाहीत, तेव्हा अनेक पालकांचा संयम सुटतो आणि ते मुलांवर जोरात ओरडू लागतात किंवा रागावतात. पण ही पद्धत मुलांच्या स्वभावासाठी अत्यंत घातक ठरू शकते. जेव्हा पालक मुलांवर ओरडतात, तेव्हा मुलं घाबरतात आणि आपल्या भावना दाबून ठेवू लागतात. त्यांना वाटतं की आपलं म्हणणं मांडणं चुकीचं आहे. भावना दाबून ठेवल्यामुळे मुलांच्या मनात राग साचत जातो. याचा परिणाम असा होतो की, मुलं भविष्यात अधिकच हट्टी आणि बंडखोर बनतात. ओरडल्यामुळे त्यांच्या वागण्यात तात्पुरता बदल दिसेल, पण त्यांचा मूळ चिडचिडेपणा वाढतच जातो. मुलांनी चूक केली किंवा हट्ट केला तरी पालकांनी शांत राहणे गरजेचे आहे. तुम्ही जितके शांत राहाल, तितक्या लवकर मूल तुमचे ऐकण्याची शक्यता वाढते.
चूक ४ :- चूक ४: मुलांच्या हट्टापुढे झुकणे :- पालक अनेकदा सर्वात मोठी चूक इथेच करतात. जेव्हा मूल खूप वेळ रडते, आरडाओरडा करते किंवा शांत होत नाही, तेव्हा पालक थकतात आणि शेवटी त्याची मागणी पूर्ण करतात. ही कृती मुलासाठी एक चुकीचा संदेश पोहोचवते. मुलाला असा संदेश जातो की, जर आपल्याला एखादी गोष्ट हवी असेल आणि घरचे ती देत नसतील, तर फक्त "रडणे आणि हट्ट करणे" हाच सर्वोत्तम मार्ग आहे. मुलाला कळून चुकते की, कितीही नकार मिळाला तरी शेवटी रडून आपण आपले काम करून घेऊ शकतो. यामुळे मुलाचा हट्टीपणा कायमस्वरूपी स्वभावाचा भाग बनतो. मुलाने कितीही आरडाओरडा केला तरी, जर एखादी गोष्ट त्यांच्यासाठी योग्य नसेल, तर आपल्या निर्णयावर ठाम राहा. त्यांना हे समजू द्या की रडल्यामुळे किंवा हट्ट केल्यामुळे कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही.
चूक ५ :- चूक ५: मुलांवर शिक्का मारणे :- अनेकदा पालक रागाच्या भरात किंवा हतबल होऊन मुलाला ‘हट्टी’ किंवा ‘चिडखोर’ असे लेबल लावतात. इतकेच नाही तर पाहुण्यांसमोर किंवा इतरांसमोर बोलतानाही सहज म्हणतात की, "आमचं मूल खूपच हट्टी आहे, तो कोणाचंच ऐकत नाही." ही चूक मुलाच्या मनावर खोलवर परिणाम करते. जेव्हा मूल वारंवार स्वतःबद्दल 'हट्टी' हा शब्द ऐकते, तेव्हा त्याला वाटते की हीच त्याची ओळख आहे. त्यामुळे तो विचार करतो की, "जर सगळे मला हट्टीच म्हणतात, तर मी तसंच वागायला हवं. मुलाला असे वाटू लागते की आपल्याकडून कोणालाच चांगल्या वागण्याची अपेक्षा नाही. यामुळे तो मुद्दाम अधिक हट्टीपणा करू लागतो आणि सुधारण्याचा प्रयत्न सोडून देतो. मुलाला 'हट्टी' म्हणण्याऐवजी त्याच्या चांगल्या वागण्याचे कौतुक करा. जेव्हा तो एखादी गोष्ट शांतपणे ऐकेल, तेव्हा त्याला शाबासकी द्या. मुलाच्या स्वभावावर शिक्का मारण्यापेक्षा त्याच्या कृतीवर लक्ष द्या.
Web Summary : Parents often make mistakes that fuel children's stubbornness. These include excessive explanations, ignoring feelings, yelling, giving in to demands, and labeling kids. Understanding and addressing the root causes of tantrums with patience is crucial for healthy development and reducing challenging behavior.
Web Summary : माता-पिता अक्सर ऐसी गलतियाँ करते हैं जो बच्चों के जिद्दीपन को बढ़ाती हैं। इनमें अत्यधिक स्पष्टीकरण, भावनाओं को अनदेखा करना, चिल्लाना, मांगें मानना और बच्चों को लेबल करना शामिल है। स्वस्थ विकास और चुनौतीपूर्ण व्यवहार को कम करने के लिए धैर्य के साथ नखरों के मूल कारणों को समझना और संबोधित करना महत्वपूर्ण है।