Join us

पावसाळ्यात सतत बिघडणार नाही लहान लेकरांची तब्येत, डॉक्टर सांगतात ३ गोष्टी नियमित करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2025 18:00 IST

Kids Health Tips for Monsoon: ज्या मुलांची इम्यूनिटी आधीच कमजोर असते, त्यांना तर या दिवसात अधिक अधिक त्रास होतो. अशात घरातील लहान मुलं आजारी पडली तर आई-वडिलांचं कशात लक्ष लागत नाही.

Kids Health Tips for Monsoon: पावसाळा आला की, सगळ्यात जास्त चिंता वाढते लहान मुलांच्या आरोग्याची. कारण लहान मुलांना वातावरण बदलामुळे इन्फेक्शन लवकर होतं. अशात त्यांना सर्दी, खोकला होतो आणि तापानेही ते फणफणतात. या दिवसांमध्ये वायरल इन्फेक्शन, बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन, डेंग्यू, डायरिया, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोकाही वाढतो. 

ज्या मुलांची इम्यूनिटी आधीच कमजोर असते, त्यांना तर या दिवसात अधिक अधिक त्रास होतो. अशात घरातील लहान मुलं आजारी पडली तर आई-वडिलांचं कशात लक्ष लागत नाही. सोबतच सुट्टी घेऊन त्यांची काळजी घ्यावी लागते. यासाठी डॉ. रमन कुमार यांनी द हेल्थ साइट डॉट कॉम सोबत बोलताना काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत. 

स्वच्छतेची काळजी

लहान मुलांची तब्येत चांगली ठेवण्यासाठी घराच्या स्वच्छतेची काळजी घेणं खूप गरजेचं असतं. या दिवसांमध्ये घरात कीटाणू आणि घातक बॅक्टेरिया वेगानं सगळीकडे पसरतात. घरांमध्ये डास येतात. त्यामुळे या गोष्टींचा धोका टाळण्यासाठी स्वच्छता खूप महत्वाची ठरते. मुलं बाहेरून आली की, त्यांचे पाय चांगले धुवा, हात चांगले धुवा. तसेच त्यांची खेळणी किंवा वस्तू वेळोवेळी सॅनिटाइज करा.

कोमट पाणी द्या

पावसाळ्यात वेगवेगळ्या आजारांचं सगळ्यात मुख्य कारण दूषित पाणी असतं. लहान मुलांना याचा फटका जास्त बसतो. अशात या दिवसात त्यांना कोमट पाणी प्यायला द्यायला हवं. असं केल्यानं इन्फेक्शन होण्याचा धोका कमी राहतो. तसेच सर्दीचा त्रासही कमी होतो. त्यांच्या शाळेच्या बॉटलमध्येही कोमट पाणी द्या.

पोषक आहार

पावसाच्या दिवसांमध्ये लहान मुलांना खायला पौष्टिक गोष्टीच दिल्या पाहिजे. तेलकट, भाजलेले, मसालेदार पदार्थ देऊ नये. आहारात व्हिटामिन सी, प्रोटीन, झिंक आणि इतर मिनरल्स असावेत. जर अनहेल्दी फूड्स दिले तर पोटासंबंधी समस्या होऊ शकतात.

टॅग्स :पालकत्वमोसमी पाऊसहेल्थ टिप्स