Join us

रोज काय मुलांना गोष्ट सांगायची, असं म्हणत कंटाळा करताय? गोष्टी ऐकलेली मुलं जास्त हुशार होतात कारण..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 18:33 IST

रात्र झाली की अंथरूणात पडून आजीकडून गोष्टी ऐकत- ऐकत झोपण्याचे सूख काही वेगळेच आहे. हे सुख आपल्या मुलांनाही द्या. कारण..

ठळक मुद्देमुलांसाठी रोज थोडा वेळ काढा आणि त्यांना गोष्ट ऐकवा. तुमच्या या छोट्याश्या कृतीमुळे मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास अधिक जलद होऊ लागतो.

सध्या जे लोक तिशीच्या पुढे आहेत, त्यांच्या पिढीने लहानपणी आजी- आजोबांकडून हमखास गोष्टी ऐकलेल्या आहेत. गोष्टी ऐकण्याची मजा काही वेगळीच असते. वरवर पाहता गोष्ट ऐकणे ही अगदी सामान्य कृती  वाटत असली, तरी त्याचे असंख्य फायदे आहेत. मन लावून गोष्टी ऐकल्याने मुलांची एकाग्रता तर वाढीस लागतेच पण मुले आणि पालक यांचे नाते अधिक घट्ट होण्यासाठीही ही क्रिया नक्कीच उपयुक्त ठरते.

 

हल्ली लहान मुले मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गॅझेट्सच्या जगात हरवून गेली आहेत. त्यांच्या पालकांनाही आता त्यांना गोष्टी सांगायला वेळ राहिलेला नाही. सरळ मोबाईलवर एखादी गोष्ट लावून ती मुलांना ऐकविली जाते. पण असे करण्यापेक्षा मुलांसाठी रोज थोडा वेळ काढा आणि त्यांना गोष्ट ऐकवा. तुमच्या या छोट्याश्या कृतीमुळे मुलांचा मानसिक आणि बौद्धिक विकास अधिक जलद होऊ लागतो. त्यामुळे तुमच्या लाडक्या बाळांसाठी हा प्रयोग नक्कीच करून बघा.

गोष्टी ऐकल्याने मुलांमध्ये दिसून येतात हे बदल१. एकाग्रता वाढतेसध्याची पिढी खूपच चंचल आहे. एक मिनिटभर सुद्धा त्यांना शांत बसवत नाही, अशा स्वरूपाच्या तक्रारी सध्या बहुतांश पालक करत असतात. म्हणूनच मुलांमध्ये असणारी ही अतिचंचलता कमी करण्यासाठी गोष्टी ऐकणे खूप उपयुक्त ठरू शकते. मुले मन लावून गोष्टी ऐकतात तेव्हा ते आपोआपच एकचित्त होतात. ही सवय पुढे अभ्यासातही अतिशय उपयुक्त ठरते.

 

२. कल्पनाशक्तीचा विकास होतोमुले जेव्हा गोष्टी ऐकत असतात तेव्हा ते गोष्टीत असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीरेखेची, प्रत्येक प्रसंगाची स्वत:च्या मनात एक प्रतिमा तयार करत असतात. ही बाब मोबाईल किंवा एखाद्या स्क्रिनवर गोष्ट पाहण्यातून साध्य होत नाही. कारण सगळे समोरच दिसत असल्याने त्यांना त्यापलिकडे जाऊन विचारच करता येत नाही. त्यांच्या मनात कोणतीही प्रतिमा तयार होत नाही. समोरचे दृश्य पाहण्यात ते रंगून गेल्यामुळे इतर कोणताही विचार करू शकत नाहीत. त्यामुळे मुलांच्या कल्पनाशक्तीचा विकास होण्यासाठी त्यांना जरूर वेगवेगळ्या गोष्टी सांगत जा, दाखवू नका. 

 

३. प्रश्न विचारण्याची सवय लागतेकोणतेही लहान मुल गोष्ट ऐकण्यात गढून जाते. गोष्ट सांगताना त्यातल्या काही गोष्टी त्यांच्या बालमनाला कळत नाही. त्यामुळे ते गोष्ट ऐकताना अनेक प्रश्न विचारतात. यातून त्यांची एखाद्या विषयाची उत्सूकता जागृत होते. प्रश्न विचारण्याची आणि एखादा विषय समजून घेण्याची समज वाढत जाते. 

 

४. समज येतेमुलांना जेव्हा तुम्ही प्राणी, पक्षी, ऐतिहासिक, इसापनिती किंवा अशा कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी सांगत जाता, तेव्हा त्या प्रत्येक गोष्टीतून त्यांना एक धडा मिळतो. त्यांना व्यक्त करता नाही आले तरी ते प्रत्येक गोष्टीतून काहीतरी नविन शिकत जातात आणि त्यांचा बौद्धिक, मानसिक कॅनव्हास हळूहळू मोठा होत जातो. त्यांची प्रत्येक विषयातली समज वाढत जाते. त्यामुळे मुलांना छोटीशी का असेना पण वेगवेगळ्या विषयांना स्पर्शून जाणारी गोष्ट नियमितपणे सांगितली पाहिजे. 

 

टॅग्स :पालकत्वशिक्षणरिलेशनशिप