Join us
Daily Top 2Weekly Top 5

Children's Day 2025:'सगळं काही मुलांसाठीच तर करतोय..', असं म्हणत आईबाबांचे मुलांकडे दुर्लक्ष तर होत नाही ना?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2025 18:30 IST

Children's Day 2025: काही अपवाद सोडले तर आज प्रत्येक पालकाची अशीच अवस्था आहे की मुलांसाठीच सगळं करतोय, पण नेमकं त्यांच्यासाठी वेळ देऊ शकत नाहीये...

ठळक मुद्देआततायीपणे उचललेले आपले कुठलेही पाऊल त्यांच्यासाठी आपण करत असलेल्या कष्टांवर पाणी फेरू शकते, याचे भान पालकांनी ठेवायला हवे.

डॉ. संजय जानवळे (एमडी, बालरोगतज्ज्ञ)आपलं सर्वात जास्त प्रेम आपल्या मुलांवर असतं आणि आपण त्यांच्यासाठीच सर्वकाही करत असतो. पण त्या सगळ्या धडपडीमध्ये आपण एवढे अडकून जातो की आपल्याकडे मुलांना द्यायला वेळच उरत नाही. बऱ्याच पुरुषांच्या बाबतीत असं होतं की सकाळी बाबा उठण्याआधी मुलं शाळेत जातात आणि रात्री बाबा घरी येईपर्यत ती झोपून गेलेली असतात. हे असंच होत राहातं, दिवसांमागून दिवस जात राहतात. नकळत त्यांचं बालपण सरतं आणि ते शिक्षणासाठी घर सोडूनही जातात. तेव्हा खाडकन आपले डोळे उघडतात. पण तोपर्यंत वेळ आणि मुलांचं बालपण हे दोन्हीही सरून गेलेलं असतं. 

ती लहानाची मोठी होत असतात तेव्हा आपण तेव्हा त्यांना कधी जवळ घेत नाही. त्यांच्या डोक्यावरून हात फिरवत नाही. मनात प्रेम असूनही ते कधी व्यक्त करत नाही. त्यामुळे आधीच असलेला नात्यातला दुरावा आणखी वाढतो. त्यांच्या भविष्याची आपण चिंता करतो आणि ती करणे स्वाभाविक असते. पण त्यांच्या समस्या कधी नीट जाणून घेतो का? त्यांच्या क्षमता, त्यांची आवड, त्याचा कल याचा कधी बारकाईने अभ्यास करतो का? उलट आपल्या अवास्तव अपेक्षा आणि असुरी आकांक्षेची त्यांना शिकार बनवतो. अनावर हव्यासाचे हे ओझे त्यांना पेलेल का, याचा विचार कधी करतो का? त्यांच्यावर दडपण येते आणि ते आपला आत्मविश्वास गमावून बसतात. कधी त्यांच्याशी मनमोकळा संवाद साधतो का? अथवा अपयशाने खचून न जाता यशासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न कसे करायचे हे शिकवतो का?

 

या सर्व प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न एक पालक म्हणून आपल्याला करावा लागेल.1. प्रत्येक मुल वेगळे असते आणि ते आपली प्रतिकृती नसते. पुरेशी प्रगल्भता त्यांच्यात नसते. आततायीपणे उचललेले आपले कुठलेही पाऊल त्यांच्यासाठी आपण करत असलेल्या कष्टांवर पाणी फेरू शकते, याचे भान पालकांनी ठेवायला हवे. मुलांचे संगोपन हे फक्त कर्तव्य नसून ते कौशल्याने करायचे काम आहे. 

2. आपली मुलं काय खातात? जे खातात ते हेल्दी आहे का? आहारात पुरेशी पोषकतत्वे आहेत का? हे प्रथम पाहा. मुले काहीच खात नाहीत म्हणून काहीतरी खाऊ घालणे व फक्त त्यांचे उदरभरण करणे योग्य नाही. फास्टफूड, जंकफूडच्या अतिरेकी सेवनाने लहान मुलांत वाढलेले लठ्ठपणाचे प्रमाण चिंताजनक आहे.

3. मोबाईल फोन व्यसनाचा तर अतिरेक झाला आहे. मुलांना आपण वेळ दिला नाही, त्यांना योग्य त्या गोष्टींमध्ये गुंतवून ठेवले नाही तर ती मोबाईल पाहणारच. स्वत:ला डिस्टर्ब होऊ नये म्हणून मुलांना चक्क मोबाईल देताना मी अनेक पालकांना पाहिले आहे. मोबाईल दिला नाही तर मुलं काहीच खात नाहीत, असा अनेक पालकांचा सूर असतो. 

4. मुलांना निरोगी राहण्यासाठी, त्यांचे बलसंवर्धन करण्यासाठी व्यायामाची गरज असते. या व्यायामात वयानुसार शारिरीक हालचाली, धावणे, उड्या मारणे, सायकल चालविणे, पोहणे यांचा समावेश असतो. त्यासाठी आपण कधी आपल्या मुलांना जवळच्या एखाद्या मैदानावर घेऊन गेलो आहोत का, याचा विचार करा. रविवारी तर सुट्टी असते, त्यादिवशी तरी मुलांना ट्रेकिंगला घेऊन जा. मुलांना कौतुक, प्रोत्साहनाची गरज असते.

आईबाबांनी काय करावं?

त्यांना प्रयोगांसाठी स्वातंत्र्य द्या. त्यांच्यावर विश्वास टाका.टेन्शन न घेता परीक्षेला समोरे कसे जावे हे शिकवा.यशासाठी त्यांना प्रोत्साहित करताना त्यांच्यावर कुठे दबाव तर येत नाही, याचा विचार करा.मुलाने कमी गुण मिळवले, अपयश आले तर त्याचा अपमान करु नका. अमुक मुलगा खूप हुषार आहे... असं म्हणत त्यांची सतत दुसऱ्यांशी तुलना केल्याने मुलांवर अप्रत्यक्ष दबाव येतो. या दबावाने मुल हळूहळू खचू लागते, म्हणून असे बोलणे टाळा.

मन प्रसन्न ठेवण्यासाठी मुलांना छंद जोपासण्यासाठी मदत करा.त्यांच्यापुढं लहानसहान ध्येय ठेवा व ते साध्य करण्यासाठी मेहनत कशी घ्यायची हे शिकवा.त्यामुळे त्यांना यश येईल व त्यांचा आत्मविश्वास वृद्धींगत होईल.पालकत्व ही अत्यंत सजगतेने पार पाडायची जबाबदारी आहे.या बालदिनी हे संगोपणाचे धनुष्य पेलण्याचे आव्हान पालकांना स्वीकारावे लागेल.

 

 

English
हिंदी सारांश
Web Title : Children's Day: Are parents neglecting kids in the pursuit of 'everything'?

Web Summary : Parents often prioritize their children's future, neglecting their present needs and emotions. Open communication, understanding their interests, and fostering confidence are vital for healthy development. Avoid undue pressure and nurture their unique talents.
टॅग्स :बालदिनलहान मुलंपालकत्व