Join us

मुलांची चित्र हरवली तर? त्यांना मनासारखं जग आपण रंगवू देणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2022 19:32 IST

प्रभात पुष्प : मोठ्या माणसांनी रंग वाटून टाकले पण मुलांना तरी कळू द्या, साऱ्या रंगांसह जग सुंदर आहे!

ठळक मुद्देमुलांची अशी चित्रं समाजाला नवी उमेद देतील.

अश्विनी बर्वे

मुलांच्या हातातच असे रंग, ब्रश आणि भिंतीसारखा मोठा कॅनव्हास मिळाला तर? काही मुलांना मिळाला तर त्यांनी एक संपूर्ण भिंत आपल्या विविध कलाकृतींनी सजवली. प्रत्येकानं आपल्या भावविश्वाला जवळचं चित्र काढलं, त्याला हवा तो रंग दिला. सूर्य, डोंगर, फुलं, पानं, मांजरं, उंदीर, घरं, झाडं, कार्टून असा सगळ्यांचा समावेश असलेली ती भिंत म्हणजे आम्हाला व्यक्त व्हायचे आहे, ही सांगणारी हाक होती. मुलं जेव्हा चित्रे काढत होती तेव्हा ती सगळ्या गोष्टींचे भान विसरली होती. त्या रंगांची, चित्रांची झाली होती. एक लहान दीड-दोन वर्षाची मुलगी तर आपले भावंड चित्र काढत आहे हे पाहून स्वतः चित्र काढायला पुढे झाली. तिच्या हातात रंग आणि ब्रश दिला तेव्हा ती मनापासून त्यात रमली. चित्र काढून एक हात दुखायला लागला, तर दुसऱ्या हातानं कामाला सुरुवात केली. आपण नेहमीच म्हणतो की, मुलं मन लावून काही करत नाहीत, पण ती जेव्हा मन लावून काम करतात, तेव्हा आपणच त्यांना अनेक प्रश्न विचारून भंडावून सोडत असतो. मुलं एखाद्या गोष्टीत व्यग्र असतील, तेव्हा आपण मोठी माणसं त्यांना म्हणतो, ‘चला आता उठा, दुसरं काही तरी करा किंवा आता झोपायची वेळ झाली किंवा आता हे करा आणि ते करा. का आपण असं वागतो? विचार करायला हवा ना? ही मुलं कसं शोधणार त्यांना काय आवडतं ते? ती कशात रमतात हे त्यांचे त्यांनाच कळायला हवे ना? मग आपण तशी संधी त्यांना द्यायला हवी नाही का?’

(Image : Google)

माझ्या डोळ्यांसमोर एक अख्खं शहरच अशा चित्रांनी रंगल्याचे दिसतेय. मग आपोआपच कोणता रंग कोणत्या समाजाशी जोडला गेला आहे, हे विसरायला होईल आणि त्या रंगाची खरी मजा घेता येईल. आपण भाषा, प्रदेश, कपडे आणि रंगाची पार विभागणी केली आहे. ती आपली व्यक्त होण्यातल्या उदारतेला मर्यादा आणते. पण ही मुलं रंगाचा रंग म्हणून वापर करतील. त्यात सगळे जण समान असतील आणि एकमेकांचा मान ठेवतील, आदर करतील. आपले मत वेगळे आहे हे सांगण्यासाठी हातात दगड, बंदूक घ्यावे लागत नाही, हे त्यांना कळेल. कोणताही एकच रंग हे जग सुंदर करणार नाही. सगळ्यांनी एकमेकांचा हात धरला तर आनंदाने फेर धरता येईल, हा विश्वास त्यांना ही चित्रे देतील.मुलांची अशी चित्रं समाजाला नवी उमेद देतील.

ashwinibarve2001@gmail.com

टॅग्स :लहान मुलंपालकत्व