सकाळी दिवसाची सुरुवात कशी झाली, चहा प्यायला की कॉफी, लंच कसं होतं, डिनरला काय होतं, दिवसभरात काय केलं हे सगळं सगळं अनेकांना सोशल मीडियावर पोस्ट करायचं असतं. एखादा सण किंवा आयुष्यातला सुंदर क्षण मनापासून साजरा करण्यापेक्षा तो सोशल मीडियावर कसा शेअर करायचा, त्यासाठी रिल्स कसे बनवायचे याचे प्लानिंग डोक्यात असते. हल्ली तर हॉटेलिंग, पिकनिक या गोष्टीही स्वत:च्या आनंदासाठी करण्याऐवजी सोशल मीडियावर शेअर करायला काहीतरी मटेरियल मिळावं म्हणून केल्या जात आहेत. एखादी गोष्ट सोशल मीडियावर शेअर करून तिथेच थांबत नाही. तर त्याला मिळणाऱ्या लाईक्स आणि कमेंटही खूप गांभिर्याने घेतल्या जातात. त्यावरून मग स्वत:च्या गोष्टींचे मुल्यमापन केले जाते. याच विषयावर ऐश्वर्या रायने बोट ठेवलं असून सोशल मीडियाचा आपल्यावर होणारा परिणाम ही खूप गंभीर बाब आहे, असं ती सांगते आहे.
ऐश्वर्या रायची नुकतीच एक जाहिरात पाहिली. जाहिरात ब्यूटी प्रॉडक्टची असली तरी ती म्हणते ते अगदी खरं आहे. हल्ली सोशल मीडियाचं प्रस्थ एवढं जास्त वाढलं आहे की तरुण मुलांपासून ते वयस्कर व्यक्तींपर्यंत सगळेच त्याच्या आहारी गेले आहेत.
सोशल मीडिया आणि सोशल प्रेशर या गोष्टी जवळपास सारख्याच झाल्या असून आपल्याला सोशल मीडियावर काय कमेंट येते किंवा आपल्या एखाद्या पोस्टला किती लाईक्स येतात यावरून तरुणाई आपण किती लोकप्रिय आहाेत किंवा आपली काय लायकी आहे हे ठरवत आहे.
या गोष्टीची एक स्त्री म्हणून, एक आई म्हणून खूप चिंता वाटतेय, असं ऐश्वर्या म्हणते. ऐश्वर्या म्हणते स्वत:ची किंमत शोधण्यासाठी अशा पद्धतीने साेशल मीडियाचा आधार घेऊ नका.
कमेंट आणि लाईक्स पाहून स्वत:ची लायकी ठरविण्यापेक्षा स्वत:च्या आत डोकावून पाहा आणि स्वत:ला आत्मविश्वासाने म्हणा "I'm worth it. आरशात पाहून स्वत:ला ठणकावून सांगा "I'm worth it आणि त्यावर विश्वास ठेवा..