Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेपेक्षा जास्त निकालाचं टेंशन ? पालकांनो अजिबात करु नका 'या' चुका , ताण येणारच नाही फक्त करा हे उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2026 08:05 IST

Are you more stressed about your results than your exams? Parents, never make these mistakes, you won't get stressed, just follow these steps : निकालाची काळजी करत बसण्यापेक्षा पालकांनी मुलांसाठी करा या गोष्टी.

परीक्षा संपल्यानंतरचा आणि निकाल लागेपर्यंतचा काळ हा अनेक घरांमध्ये एक विचित्र ताण घेऊन येतो. विद्यार्थी अस्वस्थ असतात आणि पालकही तेवढेच चिंतेत. 'काय होईल?', 'मार्क्स किती येतील?' अशा विचारांनी मन भरून जातं आणि नकळत एक प्रकारची Anxiety निर्माण होते. या काळात सर्वात मोठी चूक म्हणजे सतत निकालाचाच विचार करत राहणं. (Are you more stressed about your results than your exams? Parents, never make these mistakes, you won't get stressed, just follow these steps...)प्रत्यक्षात, हा काळ थोडा थांबून स्वतःला समजून घेण्याचा आणि मनाला हलकं करण्याचा असतो.

मुलांच्या बाबतीत पाहिलं तर ते अनेकदा स्वतःवरच दबाव टाकत असतात. त्यांनी दिलेल्या पेपरचा विचार, केलेल्या चुका, इतर मित्र काय म्हणत आहेत, या सगळ्यामुळे मन अधिकच अस्थिर होतं. अशा वेळी स्वतःला दुसऱ्या गोष्टींमध्ये गुंतवणं फार महत्त्वाचं ठरतं. आवडत्या गोष्टी करायला सुरुवात केली की मन हळूहळू शांत होतं. एखादं पुस्तक वाचणं, चित्र काढणं, गाणं ऐकणं किंवा साधं बाहेर फिरायला जाणं या छोट्या गोष्टीही मोठा फरक घडवतात. मित्रांशी गप्पा मारणंही तितकंच उपयोगी असतं, कारण प्रत्येक जण या अवस्थेतूनच जात असतो आणि मन मोकळं केल्याने हलकं वाटतं.

पालकांची भूमिका इथे खूप महत्त्वाची ठरते. अनेकदा पालक नकळतपणे मुलांना निकालाबद्दल सतत विचारत राहतात किंवा इतर मुलांशी तुलना करतात. पण यामुळे मुलांचा ताण वाढतो. त्याऐवजी घरात हलकं, सकारात्मक वातावरण ठेवणं गरजेचं आहे. मुलांशी नेहमीसारखं वागणं, त्यांच्यासोबत वेळ घालवणं, साध्या गप्पा मारणं या गोष्टी मुलांना सुरक्षित वाटू देतात. "काहीही झालं तरी आम्ही तुझ्यासोबत आहोत", हा विश्वास दिला की मुलांची अर्धी चिंता तिथेच कमी होते.

हा काळ पालक आणि मुलांनी एकत्र घालवण्याचा एक वेगळा अवसर म्हणूनही पाहता येतो. एकत्र चित्रपट पाहणं, स्वयंपाक करणं, एखादी छोटी ट्रिप प्लॅन करणं किंवा संध्याकाळी फेरफटका मारणं या गोष्टी केवळ वेळ घालवण्यासाठी नसतात, तर त्या नात्यातील संवाद वाढवतात आणि ताण कमी करतात. शारीरिक हालचालींचाही यात मोठा वाटा असतो. दररोज थोडं चालणं, हलका व्यायाम किंवा योगासने केल्याने मन अधिक स्थिर होतं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकालाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणं. तो आयुष्यातील एक टप्पा आहे, अंतिम सत्य नाही. चांगले मार्क्स आले तर आनंद होणारच, पण अपेक्षेपेक्षा कमी आले तरी आयुष्य थांबत नाही. अनेक संधी पुढे असतात, आणि प्रत्येक व्यक्तीचा प्रवास वेगळा असतो. म्हणूनच, निकालाच्या प्रतीक्षेचा हा काळ तणावात घालवण्यापेक्षा थोडा शांत, थोडा सकारात्मक आणि एकमेकांच्या साथीत घालवला, तर तोच काळ आठवणीत राहील असा बनू शकतो. कारण शेवटी, निकाल काहीही असो, मनाची ताकद आणि एकमेकांची साथ हाच खरा विजय असतो.

English
हिंदी सारांश
Web Title : Ease exam result stress: Tips for parents, calmer kids.

Web Summary : Exam result anxiety? Parents should foster positive home environment. Engage children in activities, avoid comparisons. Open communication, shared activities reduce stress. Focus on effort, not just outcome.
टॅग्स :पालकत्वमानसिक आरोग्यपरीक्षासोशल व्हायरल