शोभना भिडे (शिक्षिका, आनंदनिकेतन, सदस्य, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठीची सुकाणू समिती, महाराष्ट्र)
पत्ता कसा शोधायचा? भाषांतर कसं करायचं? कॉम्पुटर वर लिहिताना स्पेलिंग मधील चुका कशा शोधायच्या? सिरी किंवा अलेक्सा वापरून आपल्याला पाहिजे ते यंत्र चालू किंवा बंद कसं करायचं? हे आणि असे अनेक प्रश्न आता आपल्याला पडेनासे झालेत याचे कारण आहे AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बनवली गेलेली अँप्स. आजच्या काळातील हा अल्लाउद्दीनचा जादूचा दिवा आहे.
इच्छा असो वा नसो कॉम्पुटर, मोबाईल व इतर प्रसार माध्यमांनी ज्या वेगाने आपल्या भावनिक ,सामाजिक आणि शैक्षणिक विश्वाचा ताबा मिळवला तो गरगरून टाकणारा आहे. आज शाळांमध्ये प्रवेशती झालेली पिढी या स्मार्ट आयुधांसह जन्माला आली. ही साधने हाताळण्याचे तंत्र त्यांच्यात हार्ड वायर्ड आहे. पण राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार ‘शालेय शिक्षणात तिसरीपासून AI प्रशिक्षणाचा समावेश’ या बातमीने स्क्रीनच्या दुष्परिणामाविषयी जे काही लिहिलं, बोललं जातंय त्या चिंतेत भर (AI will be taught to children from class three in Maharashtra) पडेल यात शंकाच नाही.
शाळा: काल आणि आज
शालेय शिक्षणात विशेषतः प्राथमिक शिक्षणात शिक्षकांनी शिकवायचे व विद्यार्थ्यांनी शिकायचे ही पारंपारिक पद्धत आपण आजही वापरतो. वाचन,लेखन, मोजणी या सारख्या विविध शैक्षणिक कृतींसोबत सूचना पालन, सामाजिक व्यवहार, संवाद कौशल्य, व्यक्त होणं याचेही शिक्षण शाळेत होते. घराबाहेरचे सामाजिक वर्तुळ तेथे मुलांना मिळते. नवीन जाणून घेण्याची, करून पाहण्याची उत्सुकता काही प्रमाणात का होईना तेथे शमते. या सर्व अंगानी ‘मोठे होण्यात’ शाळेचा व शिक्षकांचा सहभाग आजच्या स्मार्ट युगात मर्यादित होतो आहे का? मुलांच्या शैक्षणिक जडण घडणीत शाळेचा काही वाटा भविष्यात असेल का? मुळात शाळा या ‘संस्थेचे ’ भविष्यात काही प्रयोजन असेल का? किंवा कोणते? या सर्व प्रश्नांसोबत ‘आजच्या मुलांच्या’ संदर्भात काही प्रश्न आपल्याला पालक म्हणून , शिक्षक म्हणून किंवा शिक्षण क्षेत्रातील बदलांविषयी सजग नागरिक म्हणून अस्वस्थ करतात.
नवे तंत्रज्ञान, नवी पिढी
चैत्रा, केवळ दुसरीत आहे.शाळेत तिला बोअर होतं. लिहायचा कंटाळा येतो. कागदकामात घड्या घालायला जमत नाहीत म्हणून ते आवडत नाही. गणितातील कृती तिला आवडतात पण लगेच तिच्या करून होतात. गोष्टीत ती रमत नाही कारण कित्ती तरी वेळ ताई बोलतच राहतात.
अमोघ वय वर्ष ६, आज शाळेला सुट्टी असल्याने बाहेर जाऊ या अशी घरात चर्चा आहे. पण जाणार कुठे? बागेत सर्व खेळण्यांवर गर्दी असते. चित्रपट त्याला दाखवण्यासारखा नाही. गावात सर्कस आली आहे. आईबाबानी त्याचे रसभरीत वर्णन केले आहे. अमोघने आईच्या फोनवर विदेशी सर्कशींची झलक पाहिली आहे. प्रत्यक्षात मात्र सर्कशीत एकही प्राणी नाही. सारख्या कसरती पाहून कंटाळलेल्या अमोघने घरी जाऊ म्हणून धोशा लावलाय.
दहावीत ‘सामाजिक आरोग्य’ या विषयावर प्रश्नपत्रिकेत ‘चांगल्या मैत्रीचे जीवनातील स्थान’ असा प्रश्न आहे. मित्र कोणाला म्हणावं? त्याची काय भूमिका आणि यावर सामाजिक आरोग्याच्या अंगाने काय लिहायचं असा मानसला प्रश्न आहे कारण त्याला कोणी मित्रच नाहीये. आईबाबा नोकरीवर त्यामुळे तो दिवस भर मोबाईल वर गेम्स , रिल्स यातच मग्न असतो.
ही व अशी अनेक उदाहरणे आजूबाजूला सहज दिसतात.
मुलांची अवधान कक्षा संकोचते आहे. त्यांची कल्पनाशक्ती,तार्किक क्षमता मंदावते आहे. मेंदू सडतो आहे, शाळा,पुस्तके, अभ्यासक्रम त्यांच्यासाठी निरस ठरतो आहे, संवाद व पर्यायाने सामाजिक कौशल्ये कमी होत आहेत, नको तो कन्टेन्ट नको त्या वयात समोर आल्याने मानसिक आरोग्याला धोका निर्माण झाला आहे, नवनव्या शारीरिक व्याधी सतावत आहेत, काही प्रगत राष्ट्रांमधील तरुणाई ध्येय शून्यतेमुळे, तंत्रज्ञानावरील अति अवलंबितेमुळे हिकीकोमोरी (सेल्फ इंपोज्ड सोशल आयसोलेशन) पत्करते आहे. यादी खूप मोठी आहे. अशा परिस्थितीत अभ्यासक्रमाचा भाग म्हणून AI या मुलांच्या हातात आले तर ही परिस्थिती अधिक गंभीर होणार नाही का! पण थोडं थांबून असाही विचार करायला हवा की प्रगतीची गती रोखता येते का? या डिजिटल बदलाची चाके उलटी फिरवता येतील का?
AI धोका की संधी?
AI चा वेग, कार्यक्षमताअचूकता, सर्वसमावेशकता अशा अनेक गुणांमुळे येणाऱ्या भविष्यकाळात हे तंत्रज्ञान अधिकाधिक प्रगत होणार. त्याला बांध घालणं हा विषयच उरणार नाही. राक्षस बाटलीतून बाहेर आलेला आहे. जर आजच्या पिढीचे भविष्य AI च्या हाती असेल तर त्या तंत्रावर हुकूमत कशी मिळवता येईल आणि तारतम्याने व हुशारीने त्याला कसे वापरता येईल याचा अभ्यास विद्यार्थी व शिक्षकांनी करणे अपरिहार्य ठरेल.
शिकणाऱ्याच्या गतीनुसार शिकता येणे, दृक श्राव्य अनुभूती, माहिती अधिकाधिक आकर्षक स्वरूपात आणि सहज उपलब्ध असणे, आवश्यक ते सर्व संदर्भ क्षणात मिळणे, शिकणे हे शिक्षककेंद्री न राहता विद्यार्थीकेंद्री होणे, AI मुळे काय काय बदल घडू शकतात याची अनुभूती घेऊन बदलत्या जगात टिकून राहण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा वेध घेता येणे ही AI ची बलस्थाने आहेत. मूल्यमापनाचे तंत्र बदलून स्वतःच्या क्षमतांचा स्वतःच वेध घेणे AI च्या वापराने सहज शक्य होईल. आपणच केलेले काम, मग ते शिल्प,चित्रं, निबंध, कविता काहीही असू शकतं. यात कोणकोणत्या बाबतीत प्रगती दिसते आहे, काय सुधारणा हवी आहे याचे फीडबॅक AI सहज देईल. यासाठी या तंत्रज्ञानाशी मैत्री करावी लागेल. सध्या जगभर यासाठी काम सुरु आहे. मुलांना त्यांच्या शाळेच्या प्रारंभिक टप्प्यात तंत्र संवादी कसं बनवता येईल याचा अभ्यासक्रम तयार होत आहे. काळ बदलतो आहे तसे माहिती मिळण्याचे स्रोत बदलत आहेत. त्यामुळे शिक्षकांची भूमिका बदलेल.माहिती मिळवण्याचे काम AI कडे सोपवून शिक्षकांना त्या पुढील टप्प्यासाठी फॅसिलिटेटर बनावं लागेल. हा बदल कसा करावा याची प्रशिक्षणे या टप्प्यावर आवश्यक ठरतील. या विषयाच्या संदर्भात तंत्रज्ञानाशी मैत्री असणाऱ्या एका तरुण शिक्षकाला मी त्याचे मत विचारले. तो म्हणाला,” मुलांना लिहू दे निबंध AI वापरून. मी त्यांना सांगेन की आता त्या निबंधाचे सार मला पाच वाक्यात सांग. एखाद्या तात्कालिक महत्त्वाच्या विषयावर माहिती मिळव आणि तुझे त्यावर मत काय ते सांग. एखादी संकल्पना समजली आहे की नाही हे तपासून पाहण्याचे साधन तयार कर. माझा त्याला माहिती देण्याचा वेळ वाचला त्यामुळे या पुढील कृतींसाठी मी विद्यार्थ्यांना उद्युक्त करू शकेन.” हे ऐकून सहज लक्षात येईल की भविष्यात आमची शिक्षक म्हणून भूमिका किती आव्हानात्मक असणार आहे. अशीच आव्हाने आहेत ‘शाळा’ या संस्थेसमोर! शाळा या गटकार्य, सामाजिक कौशल्य, नेतृत्व गुण, सामाजिक भान, श्रमप्रतिष्ठा, नागरिकत्वाचे संस्कार इत्यादी कौशल्ये आत्मसात करण्यासाठीची केंद्रे बनावी लागतील. AI काय करू शकते व त्याच्या मर्यादा कोणत्या हे मुलांना दाखवावे लागेल. AI वर अवलंबित्व नसलेली पण त्याच्या सह विचार करणारी पिढी घडवावी लागेल.
तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रसराबरोबरच सायबर सुरक्षितता आणि नैतिक वापर, डिजिटल संवादातील जबाबदारी आणि आदर याची जाण उत्पन्न करावी लागेल.
जेव्हा जेव्हा तंत्रज्ञानाने कल्पनेपेक्षा मोठी झेप घेतली तेव्हा तेव्हा ते भयचकित करणारं आक्रमण आहे असं आपल्याला सुरुवातीला वाटलं. कालांतराने आपण रुळलो. ते रुळणं नाईलाज म्हणून न होता विचारपूर्वक असेल तर रुळ बदलतानाचा खडखडाट कमी होईल.
shobhi.61@gmail.com
