Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोर्डाच्या परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर मुलांना 'हे' ५ प्रश्न विचारू नका! नकळत पालकच वाढवतात मुलांचा एग्झाम स्ट्रेस...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2026 18:02 IST

questions parents should not ask after exams : 5 things parents should never ask from child after up board exams : board exam parenting tips : मुले पेपर देऊन आल्यावर त्यांच्याशी संवाद साधताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि कोणते ५ प्रश्न विचारू नयेत...

आपल्याकडे दहावी - बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा म्हणजे केवळ मुलांचीच नाही, तर ती संपूर्ण कुटुंबाचीच जणू परीक्षा असते. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी हा परीक्षेचा  काळ अत्यंत महत्त्वाचा आणि तितकाच तणावपूर्ण असतो. अभ्यासाचा दबाव, चांगले गुण मिळवण्याची अपेक्षा आणि भविष्याची चिंता यामुळे मुलं आधीच मानसिक ताणाखाली असतात. वर्षभराची मेहनत अडीच-तीन तासांच्या पेपरमध्ये उतरवण्यासाठी मुले आधीच प्रचंड मानसिक दडपणाखाली असतात. अशातच पेपर संपवून घरी आल्यावर मुलांच्या मनावरचा ताण हलका करण्याऐवजी, आपल्याकडून नकळत असे काही प्रश्न विचारले जातात, ज्यामुळे त्यांचे उरलेलं मानसिक धैर्यही खचू शकतं(5 things parents should never ask from child after up board exams).

खरंतरं, मुलं परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर त्यांना पेपर कसा गेला अशी उत्सुकता घरातील प्रत्येकालाच असते. पालक म्हणून आपल्या मुलांना पेपर कसा गेला अशी काळजी असणं सहाजिकच आहे. तरी आपल्या चौकस प्रश्नांमुळे मुलांची चिडचिड होऊ शकते किंवा पुढच्या पेपरच्या अभ्यासावर त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. मुलं परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर, पालक किंवा नातेवाईक नकळत काही असे प्रश्न विचारतात, ज्यामुळे मुलांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो (board exam parenting tips) किंवा त्यांचा ताण आणखी वाढू शकतो. या परीक्षेच्या काळात मुलांना चौकशीपेक्षा आधार, समजून घेणं आणि सकारात्मक वातावरणाची जास्त गरज असते. त्यामुळे पेपर झाल्यानंतर काय विचारावं याइतकंच, काय विचारू नये हे जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. मुले पेपर देऊन आल्यावर त्यांच्याशी संवाद साधताना नेमकी कोणती काळजी घ्यावी आणि असे कोणते ५ प्रश्न (questions parents should not ask after exams) आहेत जे विचारणे आपण कटाक्षाने टाळायला हवे ते पाहूयात... 

मुलं परीक्षेचा पेपर देऊन आल्यावर त्यांचा चुकूनही हे प्रश्न विचारू नका... 

१. किती मार्क मिळतील? :- मुले परीक्षा देऊन आल्यावर पालक अनेकदा विचारतात की, "या पेपरमध्ये किती मार्क मिळतील?" किंवा "पास तर होशील ना?". पेपर संपल्यानंतर मार्कांबद्दल विचारणे किंवा दबाव टाकणे यामुळे मुलांना पुढच्या पेपरच्या अभ्यासाचा ताण येऊ शकतो. अशा दबावामुळे तो पुढच्या पेपरची तयारी नीट करू शकणार नाही. त्याऐवजी त्याला सामान्यपणे विचारा की पेपर कसा झाला आणि पुढच्या पेपरच्या तयारीबद्दल चर्चा करा. पेपर संपल्यानंतर लगेच मार्कांचा अंदाज लावायला लावणे मुलांसाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. आधीच पेपरचा ताण असताना अशा प्रश्नांमुळे त्यांच्या मनावर अतिरिक्त दबाव येतो आणि पुढील पेपरसाठी त्यांचा आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. सतत मार्कांवर लक्ष केंद्रित केल्याने मुलं चुका आठवत राहतात आणि पुढच्या अभ्यासावर लक्ष देणं कठीण होतं.

परीक्षा काळात मुलं राहतील अ‍ॅक्टिव्ह! अभ्यासासोबत 'असा' करा संतुलित आहार - मुलांचा मेंदू चालेल सुसाट... 

२. काही चूक तर नाही केली ना? :- परीक्षा देऊन घरी परतलेल्या मुलांना “काही चूक तर नाही केली ना?” असा प्रश्न विचारणे टाळावे. परीक्षा देताना आधीच ताण आणि वेळेचा दबाव असतो, त्यामुळे काही लहान-मोठ्या चुका होणे स्वाभाविक आहे. पण पेपर झाल्यानंतर पुन्हा चुका आठवून दिल्यास मुलं अनावश्यक विचार करत राहतात आणि त्यांच्या मनात भीती किंवा अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. याचा परिणाम पुढील पेपरच्या तयारीवरही होऊ शकतो. त्याऐवजी मुलांना समजावून सांगा, “जरी काही चूक झाली असेल तरी हरकत नाही, आता पुढच्या पेपरवर लक्ष केंद्रित करूया.” असा सकारात्मक दृष्टिकोन मुलांचा आत्मविश्वास वाढवतो आणि त्यांना पुढील परीक्षांसाठी मानसिकदृष्ट्या तयार राहण्यास मदत करतो.

३. ९०% तर मिळतील ना? :- परीक्षा संपल्यानंतर अनेक पालक नकळतपणे “९०% तर मिळतील ना?” असा प्रश्न मुलांना विचारतात. पण अशा अपेक्षांचा दबाव मुलांच्या मनावर मोठा ताण निर्माण करू शकतो. प्रत्येक पेपरनंतर गुण किंवा टक्केवारीबद्दल सतत चर्चा केल्याने मुलं स्वतःवरच शंका घेऊ लागतात आणि पुढील परीक्षेबाबत त्यांची भीती वाढू शकते. परीक्षेच्या काळात मुलांना गुणांपेक्षा त्यांच्या प्रयत्नांची जाणीव करून देणे अधिक महत्त्वाचे असते. त्यांना विश्वासात घेऊन शांतपणे सांगा, “तू प्रामाणिकपणे मेहनत करत आहेस, त्यामुळे निकालाची जास्त चिंता करू नकोस.” अशा सकारात्मक शब्दांमुळे मुलांचा आत्मविश्वास टिकून राहतो आणि ते पुढील पेपरसाठी अधिक उत्साहाने तयारी करू शकतात.

जपानी पालकांच्या ५ सुपरस्मार्ट टिप्स, म्हणून न रागवता-न ओरडताही जपानी मुलं वागतात शिस्तीने-होतात स्मार्ट...

४. इतरांशी तुलना करणे :- बोर्डाच्या परीक्षेदरम्यान आपल्या मुलाच्या अभ्यासाची किंवा मार्कांची तुलना इतरांच्या मुलांशी करण्याची चूक करू नका."अमुक एकाच्या मुलीला इतके मार्क मिळाले" किंवा "तिचा पेपर असा गेला", अशा गोष्टी सांगितल्याने मुलांवरील ताण नकळतपणे वाढण्याची शक्यता असते. तुलनेमुळे मुलांवर विनाकारण दबाव वाढतो आणि त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर किंवा परीक्षेवर होऊ शकतो. 

५. नातेवाईकांची चिंता लादणे :- अनेकवेळा पालक मुलांच्या परीक्षेपेक्षा “नातेवाईक काय म्हणतील?” याचीच जास्त चिंता करताना दिसतात. “चांगले मार्क मिळव, नाहीतर नातेवाईकांमध्ये "आपली बदनामी होईल” किंवा “नाक कापू नकोस” अशा प्रकारची वाक्ये मुलांच्या मनावर नकारात्मक परिणाम करतात. अशा बोलण्यामुळे मुलांवर अनावश्यक मानसिक दबाव येतो आणि ते अभ्यासापेक्षा इतरांच्या अपेक्षांचा विचार करत राहतात. परिणामी, त्यांचे परीक्षेवरील लक्ष  कमी होते आणि आत्मविश्वासही कमी होऊ शकतो. याऐवजी मुलांना समजावून सांगा की परीक्षा ही त्यांच्या शिकण्याचा एक भाग आहे, इतरांना दाखवण्यासाठी नाही. त्यांच्या प्रयत्नांचे कौतुक करा आणि “तू शांतपणे अभ्यास कर, आम्ही तुझ्यासोबत आहोत” असा आधार देणारा दृष्टिकोन ठेवा.

English
हिंदी सारांश
Web Title : Avoid these questions after board exams; parents increase children's exam stress.

Web Summary : Asking about marks, mistakes, or comparisons after exams increases children's stress. Focus on support and a positive environment instead of relatives' opinions. Encourage effort, not just results, for better mental well-being and confidence.
टॅग्स :पालकत्वलहान मुलंपरीक्षा