online learning an opportunity or problem? | ऑनलाइन शिक्षण संधी नव्हे संकट!

ऑनलाइन शिक्षण संधी नव्हे संकट!

- डॉ. श्रुती पानसे

संकट नवी संधी घेऊन येतं असं म्हणतात. पण या संधीतून नवी संकटं  जन्माला येऊ नयेत, याची काळजी घ्यायलाच हवी. 
तसंच काहीसं आताचं वातावरण आहे.  शिक्षणव्यवस्था ही बालकेंद्रित असायला हवी. मुलांना विविध विषयांची माहिती व्हावी. जीवनशिक्षण मिळावं, त्यांच्या वर्तनात आणि बौद्धिक पातळीमध्ये योग्य बदल घडवून यावेत हे शाळेचं काम असायला हवं. मागच्या वर्षातून मूल पुढच्या वर्षात जातं, तेव्हा     त्याच्या आकलनात बदल झालेला असावा अशी अपेक्षा असते.
सध्या उद्भवलेली परिस्थिती मात्र नवी आहे, हे मान्य असलं तरी पूर्वीपेक्षाही   आता शिक्षण व्यवस्थेत दोन भाग पडलेले दिसतात. एकीकडे ऑनलाइनच्या नव्या लाटेवर स्वार झालेला शिक्षणातला वर्ग आहे. त्यांना आताच्या परिस्थितीत एकच उपाय दिसतो आहे, तो म्हणजे  ‘ऑनलाईन एज्युकेशन’.  हा असा वर्ग आहे, ज्या  व्यवस्थापनांच्या शाळांमधल्या सर्व पालकांकडे सर्व इंटरनेट सुविधा आहेत. त्यामुळे आहे त्या साधनांनिशी त्यांनी वर्ग सुरू  केले आहेत. जसं पालक वर्क फ्रॉम करतात. तसं मुलं पण करतील एवढाच विचार त्यामागे आहे. 
दुसरीकडे असा एक वर्ग ज्यांच्याकडे मोबाइलसह अन्य इंटरनेट सुविधा नाहीत. त्यांचं कुठ्ल्याही प्रकरचं शिक्षण सुरू झालेलं नाही. त्यांनी नेमकं काय करायचं याचं उत्तर  अजूनतरी मिळालेलं नाही. टीव्ही हे एक उत्तर  असू शकतं. पण जिथे वीज नाही, तिथे काय?  हा प्रश्नच आहे. शिक्षणात समान हक्क हे जर व्यवस्थेनं मान्य केलेलं आहे. पण तरीही या प्रश्नाचं    उत्तर नाही. या संदर्भात प्रश्नांची जंत्रीच आहे. पण त्याचा विचार या लेखात केलेला नाही.
मुलांची शाळा बुडत असली तरी ऑनलाइन शिक्षणातून अभ्यासक्रम मागे पडता कामा नये याकारणांनी अनेक शाळांनी ऑनलाइन वर्ग सुरू केले आहेत. ऑनलाइन शिक्षणाचा मुलांच्या आकलनावर खरंच काय परिणाम होईल याचा विचार न करता मुलं जशी शाळेत बॅंचवर  बसलेली असतात तशी अनेक शाळांनी मुलांना आता घरात कम्प्युटरसमोर बसणं भाग पाडलं आहे. अशा ऑनलाइन शिक्षणातून मुलांच्या आताचा शिक्षणाचा प्रश सुटला असं वाटत असलं तरी इतर महत्त्वाच्या मुद्यांचा विचारच केला नाहीये. तो विचार ऑनलाइन शिक्षण आणि मुलांचं आकलन या अंगानं होणं गरजेचा आहे. हा विचार न केल्यास ही ऑनलाइन शिक्षण पध्दती मुलांसमोर आणि पालकांसमोर आणखी जटील प्रश्न निर्माण करू शकते. 
इ लर्निंग आणि ऑनलाइन शिक्षण
नव्या शैक्षणिक धोरणातल्या एका मुद्द्यानुसार (2019)  देशात डिजिटल शिक्षणाला प्रोत्साहन द्यावं, असा एक मुद्दा मांडला गेला होता. हा मुद्दा योग्य होता. कारण नव्या डिजिटल तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या करून    सांगता येतात. मुलांना आकलन करून घेताना याची मदत होऊ शकते. शिक्षणात संकल्पना स्पष्टीकरणासाठी इ लर्निंगचा उपयोग होतो, हे लक्षात आलं आहे. परंतु हे इलर्निंग शाळेच्या वातावरणात घडून येतं. मुलांना काय    दाखवायचं आहे हे शिक्षक ठरवतात. तो स्क्रीन जवळपास भिंतभरून इतका मोठा असतो.  त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाला विरोध करण्याचं काहीच कारण तेव्हा नव्हतं.  पण आता कोविड- 19  मुळे बदललेल्या परिस्थितीत सरकारने ऑनलाइन शिक्षण शाळेच्या ऐवजी सुरू केलं आहे. 


ऑनलाइनचं आकलन

* काही शाळा मुलांना तीन-चार तास बसवून ठेवतात, ते वाढीच्या वयासाठी योग्य नाही, असं बालरोग तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
*  मुलं ब -या च अंशी वातावरणातून शिकत असतात. शाळांप्रमाणो शैक्षणिक वातावरण सगळ्याच घरांमध्ये निर्माण होऊ शकत नाही. घरात समजा वादविवाद, ताण असतील तर मूल मुळात एकाग्र होऊ शकणार नाही.  त्यामुळे आकलन करून घेऊ शकणार नाही. शैक्षणिक वातावरणात मित्र-मैत्रिणींचा सहभाग असतो. त्याचा तर सध्या विचारही करू शकत नाही. 
* ऑनलाईन शिक्षणाचे इतर- वैयक्तिक तोटे म्हणजे टीव्हीच्या तुलनेत मोबाइल स्क्रीनचं डोळ्यांपासून अंतर कमी असणं, डोळ्यांवर  मोबाइलमधून बाहेर पडणा-या  किरणांचा घातक परिणाम होणं. यामुळे पुढच्या काळात डोळ्यांवर येणा-या  ताणामुळे, डोळे कोरडे होणं, चष्मा लागणं    यासारखे आजार वाढण्याची दाट शक्यता आहे. 
*  मुलांना जे शिकवलं जात आहे, त्यावर त्यांचं आकलन अवलंबून आहे. पाठ्यपुस्तकं मुलांपर्यंत पोहचलेली आहेत. पण खाजगीकरणातून ज्या कंपन्या शैक्षणिक साहित्य निर्माण करत आहेत, त्यातून मुलांपर्यंत नक्की काय पोहचतं आहे, त्यातून कोणत्या प्रकारचं आकलन होणार आहे? पाठ्यपुस्तकांच्या बाहेर शिक्षण जायला हवं, हे म्हणणं बरोबर असतं. पण जे शिक्षण संविधानपूरक नाही, कन्टेन्ट बनवणा:या कंपन्यांच्या प्रभावाखाली निर्माण झालेलं आहे, ते मुलांचं आकलन कोणत्याप्रकारे करून देतात, हे संस्थांनी, शिक्षकांनी आणि पालकांनीही बघायला हवं. 
*  विशेषत: बालवाडी ते दुसरी या गटाला तर ऑनलाइन शिक्षण नकोच. जडणघडणीच्या महत्वाच्या वर्षात किमान अशा पद्धतीच्या शिक्षणाची सुरु वात होऊ नये.

पालकांची जबाबदारी आणि मर्यादा
ऑनलाइन शिक्षण पध्दतीत या  एकूण प्रक्रियेकडे सर्वांवर लक्ष देण्याचं काम पालकांकडे  सोपवलेलं आहे. प्रत्येकाकडे  या पद्धतीचं शिक्षण, आवड, शिक्षण देण्यासाठी आवश्यक असलेली  कौशल्यं असत नाहीत. पालक घरी असतीलच आणि त्यांना वेळ असेल असंही नाही. त्यामुळे मुलांचे प्रश्न सुटणार नाहीत. याचा आकलनावर थेट परिणाम होईल. 
 सध्या पालकही तणावग्रस्त आहेत. सर्वांवरच कमी आधिक प्रमाणात आर्थिक ताण आहेत. हे ताण मुलांवर निघण्याची शक्यता खूपच जास्त आहे.
 सृजनशील पद्धत आणि कल्पक  प्रयोग 
* पारंपरिक वर्गात ज्या पद्धतीनं शिकवलं जातं. ती पद्धत जशीच्या तशी ऑनलाइन शिक्षणामध्ये आणू शकत नाही.  मात्र  सृजनशील पद्धतीनं ऑनलाइन आणि ऑफलाइन सुरू होऊ शकतं.  यामध्ये कमी वेळासाठी टीव्हीवरचे कार्यक्रम असू शकतात. 
* शिक्षकांनी दहा मीनिटं साध्या फोनवर थोडय़ा गप्पा मारल्या, मुलांना उपक्र म दिले. याशिवाय संध्याकाळी पुन्हा पाच मिनिटं मुलांशी एकत्र, साध्या फोनवर कॉन्फरन्स कॉलवर बोलले तर हे शक्य होईल. किंवा रोज ठराविक क्र मानं काही मुलांशी बोलायचं अशा काही गोष्टी निश्चितच सुचवता येतील. 
* जिथे शाळा सुरू नाहीत, अशा शाळांमधले शिक्षक अशापद्धतीनं मुलांपर्यंत पोहचू शकतात.
* काही शाळांनी अत्यंत कमी वेळ ऑनलाइनला दिला आहे. याशिवाय अनेक कल्पक उपक्र म मुलांकडून करवून घेण्यावर त्या भर देतात. इथे धोका कमी आहे. केवळ स्क्रीनसमोर बसावं लागत नाही. विविध उपक्र मात गुंतून राहिल्यामुळे त्यांच्या बुद्धीला चालनाही मिळते आहे. अशा परिस्थितीत मुलांना योग्य प्रकारे आकलन होऊ शकतं. 
नव्या संधीतून अधिक नव्या संधीकडे जाण्यासाठी हे आवश्यक आहे. 

 


-----------------------------------------------------------

मोबाइल किती हाताळावा?
 ‘अमेरिकन अकॅदमी ऑफ पेडियाट्रिक’ यांनी प्रत्येक वयोगटात क्तिी वेळ मोबाइल हाताळावा, यासाठी वेळ मर्यादा आखून दिली आहे. त्यानुसार 
* दोन वर्षांखालील मुलांना मोबाईल मुळीच द्यायचा नाही. 
* तीन ते पाच वयाच्या मुलांना एक तासाच्या वर कोणतीही इलेक्ट्रॉनिक गॅङोट्स द्यायची नाहीत. 
* त्यावरच्या मुलांनी दोन तासांहून वापरू नये. 

-------------------------------------------------------

मोबाइलचा अतिरेक आणि दुष्परिणाम
मुलांनी वयानुसार मोबाइल मर्यादा पाळणं अतिशय गरजेचं आहे. याचं कारण अतिशय महत्वाचं आहे. केवळ शैक्षणिक संदर्भातच नाही, पण एकूण मुलांच्या भविष्याच्या दृष्टीनं निर्णयक्षमता ही अतिशय महत्वाची आहे.  मेंदूतला निर्णयक्षमतेसाठी आवश्यक असलेला  ‘ग्रे मॅटर’  हा भाग इ गॅझेट्सच्या सतत वापरानं संकुचित होऊ शकतो. ही खूपच मोठी समस्या पुढच्या  काळात निर्माण होऊ शकते. याचा आकलनक्षमतेवर थेट परिणाम होऊ शकतो. मोबाइलचं नको ते व्यसन लागू शकतं. चिडचिड वाढणं, अस्वस्थता वाढणं हे घडून येऊ शकतं. 

( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत)
ishruti2@gmail.com

 

 

 

Web Title: online learning an opportunity or problem?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.